Home > मॅक्स एज्युकेशन > ऑनलाईन चालणारी ॲमिटी युनिव्हर्सिटी

ऑनलाईन चालणारी ॲमिटी युनिव्हर्सिटी

ऑनलाईन चालणारी ॲमिटी युनिव्हर्सिटी
X

महाराष्ट्रातलं पहिलं खासगी विद्यापीठ असलेल्या ॲमिटी युनिव्हर्सिटी मुंबईत अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. कोरोना कालावधीत ॲमिटी युनिवर्सिटीत ऑनलाईन पध्दतीनं वर्ग घेतले जात आहेत. आता तर ॲमिटी ग्रुपने ऑनलाईन विद्यापीठच सुरु केलं आहे. बुधवारी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही के शर्मा यांनी नवीन विद्यार्थ्यांना ॲमिटी विद्यापीठात सुरु असलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसची तोंडओळख करुन दिली. सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीनं यात भाग घेतला. सध्या ॲमिटी युनिवर्सिटीच्या मुंबई कॅम्पसमध्ये सुमारे १६ विभागात ३००० हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत.


कोरोनामुळं गेल्या दोन वर्षांपासून कॅम्पस शिक्षण बंद आहे. पण यावर तोडगा काढून ॲमिटीनं सर्वात आधी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. आता हे कॅम्पस ऑनलाईन भरत आहेत. ऑनलाईनमुळं शिक्षणाच्या सर्वच बाबी बदलल्या आहेत. त्यामुळं आपला कोर्स निवडणे, त्यावर काम करणं याचा निर्णय घेण्याची जबाबदारी आता थेट विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. चॉईस बेसड् क्रेडिट सिस्टमद्वारे हे करण्यात येतं.


विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही के शर्मा यांच्या म्हणण्यानुसार "आजच्या विद्यार्थांना देशात आणि जगात काय चाललं आहे हे नेमकं माहितेय. जीवनात पुढे काय करायचं हे ही त्यांनी पक्क केलेलं असतं. या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन देशाचे कर्तव्यदक्ष नागरीक बनावं. यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना सर्वोत्कृष्ठ पध्दतीचं प्रशिक्षण देत आहोत."


विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवाय दोन वर्षे परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परदेशात न्यूयॉर्क, पॅरीस कॅनडा आदी आठ ठिकाणी ॲमिटी कॅम्पस आहेत. तिथं हे विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतात. शैक्षणिक संशोधनावर जास्त भर देण्यात येत आहे.

ॲमिटीतर्फे २०३० पर्यंत आपल्या देशाला Knowledge Superpower अर्थात ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनवण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. ॲमिटीचे भारतात १२ ठिकाणी विद्यापीठे असून ११ कॅम्पस आहेत. येत्या काळात देशभरात ३५ विद्यापीठं आणि १०० कॅम्पस सुरु करण्याचं उद्दीष्ट आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अगदी काही अंतरावर ॲमिटी युनिव्हर्सिटीचं मुंबई कॅम्पस आहे. लॉकडॉऊनच्या काळात सर्व काही ऑनलाईन झालेलं असताना इथं तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या जोरावर संशोधन आणि प्रशिक्षणाचं काम सुरु आहे.

Updated : 2 Sep 2021 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top