Home > मॅक्स एज्युकेशन > एकच संकल्प सव्वाशे करोड

एकच संकल्प सव्वाशे करोड

एकच संकल्प सव्वाशे करोड
X

ग्रामिण भागातल्या शिक्षणाची स्थिती सुधारण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी लढा दिला आहे. पण, उस्मानाबादच्या सचिन सूर्यवंशी यांनी फक्त लढा न उभारता त्यातून देशव्यापी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्यातून आर्थिक मदत उभी करणं हा त्याचा मुख्य हेतू आहे.

माझं बालपण अगदी छोट्या खेड्यात गेलं. दोन्हीकडे आजी-अजोबा आधीच वारले होते. आई थोरली, तीन बहिणी आणि एक छोटा भाऊ, आजी लग्नापूर्वी वारल्यानं तशी ती पालकच होती. तर इकडे माझ्या वडिलांचंही लहान असताना पितृछत्र हरवलेले होते. त्यामुळे माझं लहानपण मामाच्या गावाला म्हणजेच केम, तालुका करमाळा इथंच गेलं. दुसरी पर्यंतचं शिक्षण तिथंच झालं. नतंर मावशी (कुसुमताई) जवळ गेलो. तिथं तिसरी चौथी आणि डोंजामध्ये पायी चालत जाऊन 5 वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केली. 6वी आणि 7वीसाठी परत मामाच्या गावाल गेलो. 8 वी ते 10 पर्यंत तांदुळवाडीला गावातून सायकलवर ये-जा केली. त्यानंतर वडलांनी आणि केमिस्ट्रीचे प्राध्यापक कुंभार सर यांनी कर्जत जिल्हा अहमदनगर इथल्या दादा पाटील महाविद्यालयत 11वी science साठी बळेच प्रवेश घ्यायला लावला. नववीत असतानाच मावशी वारली. ग्रामीण जीवन जगत असताना अनेक अनुभव आले. त्यात बारावीला असतांनाच हाताने स्वयंपाक करणे, रॉकेल नसेल तेव्हा चुल पेटवणे असं सगळं करावं लगालं.

बारावीनंतर चांगले मार्क मिळाले म्हणून मेडिकलला प्रवेश मिळत होता. पण, पुरेशी माहिती नसल्यानं डीएडला प्रवेश घेतला. सप्टेंबर 1998 मध्ये शिक्षण पूर्ण झालं. पण 2002 पर्यंत सुशिक्षित बेरोजगार म्हणूनच वावरलो. त्याच दरम्यान बहिणीच्या लग्नासाठी शेती विकण्याची वेळ आली. माझे काही वर्गमित्र शिक्षणाधिकारी, BDO झाले. पण मी मात्र ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित केल. एव्हाना माझ्या शिक्षणाची झालेली फरफट तुमच्या लक्षात आलीच असेल आणि मी शिक्षक होण्याचं का ठरवलं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल. पण परिस्थिती फक्त एवढीच नाही...

ग्रामीण भागात भावकीचे वाद, गैरसमज, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष न देणे, तसंच शेती, मजुरी, शेळीपालन अशा अनेक कारणांमुळे मुलं शाळा बुडवतात. त्यात अनेक गावांमध्ये शिक्षकांची अनास्था सुद्धा आहे. अनेक ठिकाणी शिक्षक हा नोकरीच्या गावी न रहाता भलतीकडेच राहत असतो. परिणामी तो कायम घाईतच असतो. असे एक-ना-अनेक अडसर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येत असता.

त्यात मोडकळीस आलेल्या खिडक्या आणि दारं, अस्वच्छ स्वच्छतागृह अशी स्थिती ग्रामीण भागातल्या शाळांच्या इमारतींची झालीय. स्थानिक पुढारी फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच शाळांचा वापर करताता असा माझा थेट आरोप आहे.

डिसेंबर 2002 मध्ये मी शिक्षकाच्या नोकरीत रुजू झालो. गणगाव(खु)मध्ये ही शाळा आहे. शाळा सुधरवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले. मुलांना पुढच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. 6 वी आणि 7वीचे वर्ग वाढवले. आठ वर्ष तिथं काम केलं. नंतर स्वतःच्या गावात बदली झाली. तिथं सुद्धा जोमानं काम सुरू केलं. गाव सुधरवण्यासाठी प्रयत्न केले. गावकऱ्यांना राळेगण सिद्धी, हिवरे बाजार गाव दाखवलं. शाळेसाठी २ एकर शेती तयार केली. हैद बांधला. 6 वी ते ८ वीचे वर्ग सुरू केले. ई-लर्निंगसाठी पुढाकार घेतला. पण एवढं करून सगळं भागणार नव्हतं. म्हणून स्वतःची तीन एकर शेती विकून शाळा आणखी सुधरवण्याचा निर्णय घेतला. शेती विकण्यासाठी वर्तमानपत्र, टीव्हीवर बातम्या सुद्धा दिल्या. पण तरीसुद्धा शेती विकत घेण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी स्थानिकांनी शाळेला तारांच कुंपण सुद्धा घालू दिलं नाही.

गावात आठवीचं शिक्षक पद रिक्त आहे. आमच्या अडवळणी गावात कुणी शिक्षक येण्यास तयार नाही. म्हणून शेवटी आंदेलन म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेसमोरच शाळा भरवली. तरीही पद रिक्तच राहीलं. शेवटी गावातल्या एका डीएड झालेल्या तरुणाला स्वखर्चानं नेमलं.

आदर्श आमदार दत्तक शाळा योजना मंत्री महोदयांनी मंजूर केली. पण, त्यासाठी आमच्या शाळेचा अजून विचार झालेला नाही. समाजातली लोकं राजकीय सभेला गर्दी करतात, पण शाळेच्या या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष करतात त्यामुळे मला वाटतं हे निकोप समाजाचं लक्षण नाही

शाळा आणि गाव सुधरवण्यासाठी मी अनेक ठिकाणी गेलो. अनेक समाजसेवक, पुढारी लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. चर्चा केल्या. पण हाती काहीच आलं नाही. हा, पण अनुभव मात्र फार मजेशीर आले. पण, म्हणून आपण इथेच थांबण योग्य नाही ही खूणगाठ बांधली आणि पुढच्या कामाला लागलो.

ग्रामीण भागातल्या शाळा या समाज, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या ऐक्यातून दर्जेदार आणि सर्व सोयीयुक्त असाव्यात असं मला वाटतं. पण तसं काही होतांना दिसलं नाही. निदान आपल्या स्वतःच्या घरापेक्षा शाळा आणि चावडी दर्जेदार असावी अशी भावना व्यक्त करत मी स्वतःची जमीन विकायचा निर्णय घेतला होता. देवस्थानापेक्षा शाळा श्रीमंत करायला हव्यात हे माझे वैयक्तिक मत आहे. आणि म्हणूनच मी आता तो विचार रुजवण्यासाठी सव्वाशे कोटी उभे करण्याची चळवळ सुरू केलीय. ज्यात देशातल्या प्रत्येक नागरिकानं १ रुपयाचं योगदान देणं अपेक्षित आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवसापासून हा "एकच संकल्प सव्वाशे करोड"उपक्रम सुरू केलाय. त्यासाठी शिक्षाणाची संघर्ष यात्रा हा आगळावेळा मोर्चा दिल्लीला नेण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. जनजागृती करण्यासाठी लोकांना स्टीकर आणि पत्रक वाटत आहे. याकामासाठी कुटुंबाच्या शेतीला दुष्काळी अनुदान आणि पिक विमा म्हणून मिळालेले 83 हजार रुपये खर्ची घातले. मी माझं काम करत आहे पण, लोकं याला आता किती प्रतिसाद देतात त्यावर याचं यश-अपयश अबलंबून आहे. माझे मात्र १०० टक्के प्रयत्न सुरू आहेत.

- सचिन श्रीराम सुर्यवंशी, देऊळगाव ता.परंडा, जि.उस्मानाबाद

Updated : 16 Jan 2017 8:59 AM GMT
Next Story
Share it
Top