Home > मॅक्स एज्युकेशन > व्यक्तीनिष्ठता अभ्यासात नको

व्यक्तीनिष्ठता अभ्यासात नको

व्यक्तीनिष्ठता अभ्यासात नको
X

इयत्ता सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ‘’मध्ययुगीन भारताचा इतिहास’’ यातील महाराष्ट्राचे योगदान हा उद्देश ठेवून पुस्तकात नव्याने अभ्यास मंडळाने जी इतिहासाची मांडणी केली आहे ती अधिकाधिक शिवकाल व त्यापूर्वीची परिस्थिती, तदनंतरची परिस्थिती असे स्वरूप आहे. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासावर अधिक भर दिला गेला आहे. एखाद्या घटनांचे वा व्यक्तीचे जरी अधिक विवेचन असले तरी त्यात वस्तुनिष्ठतेऐवजी व्यक्तीनिष्ठता येऊ नये.

पण अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते आहे की, त्या शिवपूर्वकालाचा विचार करताना अनेक ऐतिहासिक व्यक्ती व घटनांचे केवळ उल्लेख आले आहेत. शालेय पातळीवर जरी अगदी समग्र इतिहास विवेचन आणता येणे शक्य नसले तरी निव्वळ उल्लेख हे देखील विद्यार्थ्यांची इतिहास व तत्कालीन राजवटींविषयी समज वाढणे, ही क्रिया खंडित होते. ‘माहित आहे का तुम्हाला?’ यासारख्या चौकटी आहेत. त्यात अकबर, रझिया, तुघलक इ. उल्लेख आले आहेत. या चौकटीतील उल्लेखांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालक यांच्या मदतीने मिळवायची असा जरी अभ्यासक्रमाचा उद्देश असला तरी तो साध्य होईलच असे नाही. त्यामुळे कमीत कमी शिवाजीसारख्या राजकर्त्यांचा अभ्यास करताना तत्कालीन कोणत्या राजवटी होत्या, शिवकालापूर्वी कोणत्या राजवटी होत्या व त्या त्या राजवटीतील राज्यकर्त्यांनी कसा कारभार केला, सुधारणा केल्या, यांचा उल्लेख येणे गरजेचे आहे.

एखादा राज्यकर्ता जाऊन दुसरा राज्यकर्ता येणे या घटनांसाठी कोणकोणती कारणे वा घटना कारणीभूत ठरल्या हा प्रक्रिया किंवा हा इतिहास मुलांना कळणे आवश्यक आहे. त्यातूनच त्यांची इतिहासाची जाण अधिक प्रगल्भ होते.

पण आपल्याकडे एकूणच इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी ही व्यक्तीनिष्ठ त्यात वस्तूनिष्ठता येतच नाही. त्यामुळे जे शासनकर्ते येतात त्यांना जसा इतिहास हवा तसा इतिहास ते समाजाला अभ्यासायला लावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तुलनात्मक अभ्यास करणे. हा गुण विकसितच होत नाही. इतिहास म्हणजे जे जसे आहे तसे मांडणे. त्यानंतर त्याचा वा त्या घटनांचा अभ्यास वा विश्लेषण चिकित्सक, सत्यान्वेषी दृष्टीतून करणे. असेच खरे तर घडायला हवे पण तसे घडताना दिसत नाही. विद्यर्थीदशेतच जर इतिहास या विषयाकडे एकांगी दृष्टीकोनातून विद्यार्थी तो विषय अभ्यासणार असेल तर इतिहासाविषयी कळकळ, आत्मीयता त्यांच्या मनात उत्पन्न होणार नाही. एक पालक म्हणून मला ही चिंतेची बाब वाटते. आपण आपल्या भावी पिढीला पूर्वग्रहदूषितच इतिहास विचार देणार का? ही भीती एका चांगल्या शिक्षकाला माझ्यासारख्या पालकांना वाटणे चुकीचे आहे का?

- स्मिता भाटवडेकर

शिक्षक, इतिहास अभ्यासक

Updated : 8 Aug 2017 7:57 AM GMT
Next Story
Share it
Top