विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन
X
तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!
विज्ञानाची सुरवात झाली आग पेटवून ती टिकवण्याच्या शोधातून. कोरडी पडलेली दोन झाडाची खोडं पडताना एकमेकावर घासली गेली आणि त्यातून जाळ पेटला हे एकंदर निरीक्षण. घर्षणामुळे आग पेटली असावी हा तर्क. दोन कोरडया कठीण वस्तू एकमेकांवर जोरात घासल्या गेल्या तर ठिणगी पडू शकते, हे प्रत्यक्ष प्रयोगानंतरचं अनुमान. वेगवेगळया परिस्थितीत पुन्हा प्रयोग. यातून पाहिजे तेव्हा आग निर्माण करण्याची आणि इंधन घालून ती टिकवण्याची पद्धती. या आगीचा थंड हवेत शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि मांस आणि कंदमुळं भाजून खाण्यासाठी उपयोग हे उपयोजन. जेम्स वॅटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. ती खरी नसली तरी वैज्ञानिक विचारपद्धती समजून घ्यायला उपयोगी आहे. जेम्स वॅटनं उकळणाऱ्या चहाच्या किटलीवरचं झाकण उडताना पाहिलं, तेव्हा तो असं म्हणाला नाही, की आतमध्ये भूत-पिशाच्च आहे. त्यानं या निरीक्षणावरून असा तर्क केला, की चहा उकळण्याच्या क्रियेतून, काहीतरी शक्ती तयार झाली आहे, आणि त्यामुळे ते झाकण उडतंय. त्यानं झाकण उचललं, बाहेर येणारी वाफ पाहिली, आणि अनुमान काढलं, की वाफ ही ती शक्ती आहे. ही शक्ती आणखी कुठे वापरता येईल, याचा त्यानं विचार केला, प्रयोग केले, आणि त्यातूनच वाफेवर चालणारं इंजिन अस्तित्वात आलं.
आज आपण 28 फेब्रूवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळतो, कारण भारताचे विज्ञानाचं पहिलं नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ, सी.व्ही.रामन यांचा संशोधनाचा नोबेल मिळवणारा प्रबंध, 28 फेब्रूवारी या दिवशी प्रसिद्ध झाला होता. हा प्रबंध होता प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी. झालं असं की, परदेश प्रवासाला निघालेले रामन, जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो ? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं! निरीक्षणातून विचार पुढे जातो तो असा.
Follow @MaxMaharashtra
आपल्या आजूबाजूला, असंख्य घटना घडत असतात, त्यांचं निरीक्षणही आपल्याकडून कळत-नकळत होत असतं. आपल्याला लांबून एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर तिथे आग पेटली असणार, हा तर्क आपण करतो. तो आपल्याला पूर्वीच जाणवलेल्या, आग आणि धूर यातील कार्यकारणसंबंधामुळे. आपण काही त्याला दिव्याचा राक्षस, चमत्कार किंवा म्हणत नाही.'उद्या सकाळी मी अमुक करीन.....' असं आपण म्हणतो, तेव्हा हा प्रश्न आपल्याला पडतो का, की उद्या उजाडेलच कशावरून? कारण आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे, आपण असं अनुमान काढलेलं असतं, की ज्या अर्थी गेली 460 कोटी वर्षं सूर्य उगवतोय, त्याअर्थी तो उद्याही उजाडणारच.
अनुमानानंतरची पुढची कडी म्हणजे प्रचितीची किंवा अनुभवांची. आगीत हात घातला की चटका बसतो, यासारखा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, कोणी जर आग अगदी थंडगार असते असं म्हटलं तर त्याला मूर्खात काढतो. कारण ते प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य असतं; पण योग्य शिक्षणाअभावी, किंवा अगदी वशिल्याअभावी म्हणा, आपल्याला नोकरी मिळत नाही, हे लक्षात आलं तरीही, एखादी सर्व समस्या सोडवणारी अंगठी घ्यायला, आपण चटकन तयार होतो. समजा हजार सुशिक्षित बेकारांनी, आज याप्रकारच्या अंगठया घेतल्या, तरी त्यातल्या 50% लोकांना तरी नोकऱ्या मिळतील का? नाही. कारण मुळात ती गोष्ट, ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. कोणत्याही वैज्ञानिक सत्याचा अनुभव, सप्रमाण म्हणजे पुराव्यांसह, वारंवार म्हणजे पुन्हापुन्हा, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे येत असतो, यायला हवा. गुरुत्वाकर्षण ही वस्तुस्थिती आहे म्हणून वर फेकलेली वस्तू खालीच येणार, मग तुम्ही ध्रुवावर असा नाहीतर विषवृत्तावर असा.
कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे हे तर विज्ञानाचं आधारतत्त्वं. 'ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते' असं म्हटलं तर ते सिद्ध करता आलं पाहिजे. मेणबत्ती पेटवून ती उपडया हंडीखाली ठेवली तर हंडीतला ऑक्सिजन संपल्यावर ती विझते, याचाच अर्थ तो वायू ज्वलनाला मदत करतो. 'पदार्थाचं आकारमान वाढलं किंवा वाढवलं तर त्याची घनता कमी होते' असं म्हटलं तर आपल्याला हे करून बघता येतं की लोखंडाचा पातळ पत्रादेखील पाण्यात बुडतो; पण तो वाकवून त्याला होडीचा आकार दिला की तो पाण्यावर तरंगतो. बर्फ हे पाण्याचं घनरूप; पण ते तयार होताना त्याचं अनियमित प्रसरण होत असल्यामुळे त्याची तुलनात्मक घनता कमी होते आणि तेही पाण्यावर तरंगतं.
अशी अनेक निरीक्षणे करणे आणि त्यातून प्रयोगसिद्ध निष्कर्षावर येणे ह्या विज्ञानिक विचाराच्या पायऱ्या आहेत. म्हणून अभ्यासाने तंत्रज्ञानात त्यामागील विज्ञान कळून पारंगत झालो, तरी जो पर्यंत वैज्ञानिक दृष्टी येत नाही तो पर्यंत माणूस परंपरावादीच राहातो. दुर्दैवाने भारतीय मानसिकता अशी दुभंग राहिल्यामुळे प्रसिद्ध वैज्ञानिकही अंधश्रध्देच्या आहारी जातांना दिसतात.
Follow @MaxMaharashtra
पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली; पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही.
विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही आपल्याकडे रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोन माणसाला विवेकी बनवते. असा माणूस कोणत्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारायला तयार असतो. लोकांशी सौहार्दाने वागायला देवाधर्माची गरज त्याला लागत नाही. कारण विवेकामुळे ऋजुता हा त्याचा स्थायीभाव बनतो. तसेच तो प्रत्येक गोष्टीचा साधकबाधक विचार करून मगच निर्णय घेतो, त्याचबरोबर त्याचे होणारे परिणाम स्वीकारायलाही तयार असतो. अपयश आले तर परखड आत्मपरीक्षण करून चुका दुरुस्त करतो. थोडक्यात चुका स्वीकारायला घाबरत नाही. परिणामी तो स्वतःची प्रगती तर साधतोच पण त्याच वेळेस समाजालाही आपल्या विचारांनी प्रगतीपथावर नेतो. एकदा का वैज्ञानिक दृष्टीकोनाने माणूस जगायला लागला की, एवढे बदल त्याच्यात घडतात. तेव्हा आता आपणच ठरवायचे की, ईश्वरी अस्तित्व झुगारून विज्ञान जवळ केल्यावर माणसाला समाजात माणूस म्हणून सक्षमपणे जगता येईल की नाही ते. त्यामुळे समाज व्यवस्था खिळखिळी तर होणारच नाही उलट उन्नत अवस्थेत पोहोचेल.
शास्त्रज्ञ होण्यासाठी संयम आणि कामावर निरतिशय प्रेम असावं लागतं. तुम्हाला अपयश येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी खचून न जाता स्वत:वर, परिस्थितीवर प्रसंगी हसता यायला हवं. कारण बऱ्याचदा अर्ध्यावर गेल्यानंतर आपण चुकीच्या दिशेने संशोधन करतोय, असं लक्षात येतं. दशकात एखादा शोध लागतो, जो खूप मोठा असतो. बाकी अभ्यास होत असतोच. तो महत्त्वाचा असतोही, पण त्याचं महत्त्व किती हे भविष्यातच लक्षात येतं. संशोधनाला वेळ तर द्यावा लागतो, पण तुम्ही केलेलं सगळंच संशोधन लोकांच्या लक्षात राहीलच असं नाही. पण शास्त्रज्ञ काम करतो, ते त्या एका ध्येयासाठी.. ते म्हणजे शोध! जेव्हा शोध लागतो, एखादी गोष्ट प्रयोगांती पहिल्यांदा आपल्यासमोर येते, त्या वेळी, काही क्षणांसाठी का होईना पण ती गोष्ट जाणणारे अख्ख्या पृथ्वीवर आपण एकमेव आहोत. आपल्याला ही गोष्ट सर्वप्रथम कळली, ही भावना विलक्षण प्रेरणादायी असते. असे क्षण फार क्वचित येतात, पण तो अनुभव पुन:पुन्हा अनुभवता यावा असंच वाटत असतं. तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या आणि उत्तर शोधणाऱ्या अशा कम्युनिटीचा भाग असता. त्यामुळे तुम्ही भूतकाळातल्या आणि भविष्यकाळातल्या लोकांशी कायम जोडलेले राहता. ही किती अद्भुत गोष्ट आहे!
Follow @MaxMaharashtra
थोडक्यात विज्ञान म्हणजे काय तर निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles). वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं. आपल्याला ज्याचं कारण चटकन सांगता येत नाही, ती गोष्ट दैवी किंवा अतिमानवी मानणं चुकीचं आहे. निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. 'पुरावा तेवढा विश्वास' या पद्धतीनं विचार केला, तर जगात चमत्कार शिल्लकच उरत नाहीत. उरतात ती, कदाचित सोडवायला कठीण, अशी कोडी! एखादी घटना त्याच पद्धतीनं का घडते हे शोधून काढण्याची, सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाची पद्धत!
बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे.
जगदीश काबरे