Home > मॅक्स एज्युकेशन > ‘रेयान’ प्रकरणानंतर पालक धास्तीत

‘रेयान’ प्रकरणानंतर पालक धास्तीत

‘रेयान’ प्रकरणानंतर पालक धास्तीत
X

मुलांसाठी घरानंतर जर कुठली हक्काची आणि सुरक्षित जागा असेल तर ती म्हणजे शाळा.... मात्र आता याच शाळांमध्ये जायला मुलांना भीती वाटावी अशा घटना घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाच्या घटनावाढत आहेत. आणि आता तर लैंगिक शोषण करून विद्यार्थ्याची हत्या करण्याची घटना घडली आहे.

दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये रेयान इंटरनॅशनल शाळेत प्रद्युम नावाच्या 7 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण करुन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणावर शाळेने अत्यंत बेजबाबदार आणि असमाधानकारकर उत्तर दिल्यामुळे संतप्त पालक रस्त्यावर उतरले.. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देत आरोपीला कडक शिक्षा दिली गेली पाहिजे असे म्हटले. तसेच रेयान शाळेच्या मुख्याध्यापकाचे निलंबन करण्यात आले. याप्रकरणी 7 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लवकर याप्रकरणी न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय…आरोपी बस कंडक्टरला तीन दिवसांच्या रिमांडवर ठेवण्यात आले आहे. या हत्येमागे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत याची कसून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील एका शाळेत मुलीवर बलात्कार करण्यात आलाय..

आपल्याकडे महाराष्ट्रातही लैंगिक अत्याचाराची प्रकरणं गेल्या काही दिवसात घडली आहेत. मुंबईमध्ये अंधेरीतल्या शाळेत 3 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या आवारातच शिक्षकाने बलात्कार केल्याप्रकरणी 57 वर्षांच्या जुन्या शाळेच्या ट्रस्टीवर मुलीच्या आईने कलम 376 (2) गुन्हा दाखल केला होता त्यावर अजून चौकशी सुरूच आहे. अशा प्रकारांमुळे पालकांच्या मनात धास्ती निर्माण होत आहे.

देशात वारंवार मुलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चाललेल्या आहे. यामुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. यावरुन आता पालकांना प्रश्न पडला आहे की आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, कारण शाळेमध्ये जर अशा घटना होत असतील तर शाळा आपल्या पाल्यासाठी असुरक्षितच वाटू लागल्यात.

सरकारने यामध्ये लक्ष घालून काही गाईडलाईन्स तयार करण्याची गरज आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करायला हवे. शाळांमध्ये सुरक्षारक्षकांची संख्या वाढवायला हवी. या सगळ्या गोष्टी तातडीनं करण्याची गरज आहे. तरच पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत आश्वस्त राहू शकतील.

Updated : 11 Sep 2017 8:11 AM GMT
Next Story
Share it
Top