बाहेरच्या शत्रूची गरजच नाही !

438

मुंबईतील दादर पश्चिम येथील आमची बालक विहार विद्यालय ही मराठी माध्यमातील शाळा पुरेसे विद्यार्थी नसल्याने व अन्य काही कारणांनी येत्या दोन वर्षांत संपूर्ण बंद होत आहे. एकेकाळी दिमाखात उभी असलेली आमची शाळा, तिला आता पडक्या वाड्याची रया आली आहे. (याच नावाची शाळा कांदिवली पश्चिम येथे असून दोघींचे संचालक मंडळ वेगवेगळे आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही. पण दोन्ही मराठी शाळांत विद्यार्थी संख्येला लागलेली घरघर हे साम्य आहे.) बालमोहन या मराठी माध्यमाच्या शाळेने इंग्रजी अंगरखा टोपडे चढवायला सुरुवात करुन काही वर्षे झाली. संपूर्ण वेश नटूनथटून घालायला काही वर्षे लागतील. दादर पश्चिममधीलच आयडियल बुक डेपोच्या गल्लीतील छबिलदास या सुप्रसिद्ध मराठी शाळेत सीबीएससी बोर्डाचे प्री-प्रायमरी वर्ग यंदाच्या जूनपासून सुरु होत आहेत. त्याची जाहिरात करणारा मोठा फलक टिळक ब्रिजवर लावलाय. तो डोळे भरुन बघता येईल. प्री-प्रायमरीपासून पुढे ते सीबीएसइचे 10 वीपर्यंत वर्ग वाढवत नेतील असे समजते. छबिलदासमध्ये झालेली नाट्यचळवळ, त्याचप्रमाणे मधु दंडवते, नरेंद्र जाधव यांच्यापासून असलेले तेथील अनेक विद्यार्थी आता फक्त आठवायचे. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळाही इंग्रजीच्या कच्छपी लागल्या आहेत. खिलनानी तसेच महागरपालिकेच्या मराठी शाळाही पंतजंत राजकारण्यांनी दादरमध्ये फुंकून टाकल्या. हे दादरमधले चित्र असले तरी मुंबईतील बाकीचा भाग व महाराष्ट्रासाठी प्रातिनिधीक आहे. मराठी विद्यार्थी मिळत नसतील पुरेसे तर आम्हाला शिक्षणसंस्था जगविण्यासाठी मराठी शाळेचे इंग्रजी शाळेत रुपांतर करणे व्यावहारिकपणे आवश्यकच आहे असा युक्तिवाद या शाळांचे संचालक करतील. तो एका परीने योग्य आहे. मराठी माणूस मराठी भाषा उकीरड्यावर आणायला निघाला आहे. बाहेरचे शत्रू मराठी भाषेला नकोच आहेत. मराठी शिकून पोट भरता येईल अशी ती भाषा राहिलेली नाही तो दर्जा इंग्रजीला आहे म्हणून इंग्रजी शाळा वाढत आहेत हा युक्तिवाद मराठी माणसांकडूनच केला जातो. पण तो पूर्णपणे खरा नाही.

मुंबईतील महाविद्यालयांत कनिष्ठ महाविद्यालय स्तरांवर मराठीचे वर्गच बंद केले जात आहेत. तेथील शिक्षकांना सेवामुक्त केले जात आहे. पदवीस्तरावरील मराठी वर्ग लवकरच बंद पडण्याच्या रांगेत आहेत. एकेका महाविद्यालयाच्या मराठी विभागाची दुरवस्था सांगायची म्हटले तर तो मोठा विषय होईल. पदव्युत्तर स्तरावर मुंबई विद्यापीठापासून ते गोवा व महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांत जिथेजिथे मराठीचे विभाग आहेत ते सारे ओढगस्तीला लागलेले आहेत. मी आता नाव घेत नाही पण मराठी भाषा दिनाच्या दिवशीच मुंबईतील एका महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापिकेला त्या विषयासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर पुरेसे विद्यार्थी नाहीत असे कारण देऊन काढण्यात आले आहे. मराठी विभाग बंद पडण्याचे हे लोण ग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या विभागापर्यंत येईल. तोवर आपण गप्प बसणार का? मराठी भाषेच्या आजच्या गतीला मराठी माणसाचीच कुमती कारणीभूत आहे.

– समीर परांजपे