Home > मॅक्स एज्युकेशन > पॉर्न आणि कॉन्डोमच्या पलिकडे......

पॉर्न आणि कॉन्डोमच्या पलिकडे......

पॉर्न आणि कॉन्डोमच्या पलिकडे......
X

भारता देशापुरतं बोलायचं तर हा विषय थोड्या थोडक्यांचा नाही, तर सुमारे चोवीस कोटी मुलामुलींचा आहे. आता या विषया बद्दल त्यांच्याशी बोलायचं की नाही हा प्रश्न मागे खरे तर मागेच पडायला हवा आहे. कसं बोलायचं हा प्रश्न पुढे यायला हवा. पुढच्या काही म्हणजे पाच ते दहा वर्षांच्या काळात "का" नाही तर "कसे" या प्रश्नावर लोक बोलू लागतील अशी मला खात्री आहे. जनरेटा नाही पण तरुण होणाऱ्या मुला मुलींचा रेटा त्या दिशेनेच असेल. तो त्यांचा मूलभूत मानवी हक्क मानला जाईल असेही निश्चित वाटते. पण काही जुनाट नैतिकतावादी, संस्कृती रक्षक ,समाज धुरीण, नेते, संसद सदस्य, आमदार, खासदार यांचा आजही लैंगिकता शिक्षणाला विरोध आहे. परंतु चांगली बातमी ही आहे की हा विरोध झपाट्याने बदलणाऱ्या वास्तवाच्या पुरात वाहून जाणार आहे.

पुढच्या पंचवीस वर्षांच्या काळात या बाबत काय घडेल याची थोडी कल्पना आज निश्चित पणे करता येईल.

या देशाने आज पर्यन्त हाती आलेल्या तीन खूप मोठ्या वास्तविक संधी हकनाक गमावल्या आहेत. याला कारण अर्थातच हे तीनही प्रकारचे वास्तव आपण नीट ओळखलेच नाहीत.

सर्वांना नैतिक रीतीने छळणारे एक वास्तव म्हणजे कुमारी मातांचे वाढते प्रमाण किंवा असे म्हणू या की कुमारी मुली गरोदर राहाण्याचे प्रमाण. त्यांच्या गर्भपातांचे वाढते प्रमाण. या बरोबरीने ग्रामीण आदिवासी मुलींची लहान वयातच होणारी लग्ने हाही विषय होताच. पण लग्न झाल्यावर वय किती का लहान असेना मुलगी गरोदर राहिली आणि मूल झालं तरी हरकत नाही अशी आपली गुप्तसुप्त नैतिक धारणा आहे. त्याबद्दल आपण कायदा आणणे आणि त्याची अंमल बजावणी न करणे इथपर्यंतच मजल गाठली आहे. तरुण होणाऱ्या मुलग्यांचे शिक्षण राहूनच गेले. म्हणूनच बावीस पंचवीस वर्षांचा तरुण पंधरा सोळा वर्षांच्या मुलीशी बिन्धास्तपणे लग्न करतो. दुसरे वास्तव म्हणजे एच आय व्ही चा प्रसार आणि त्याचा लैंगिकतेशी असलेला संबंध. कुमारी वयातले गरोदरपण आणि एच आय व्ही चा प्रसार हे दोन्ही प्रकारचे वास्तव आपल्याला लैंगिकता शिक्षणाबद्दल एकदम जोरदार धक्के मारून जागे करू लागले त्यालाही आता काही वर्षे उलटून गेली आहेत. आपण आणि आपल्या बरोबर सरकारही या बाबतीत एकदम खडबडून जागं झालं. युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था देखील झपाटून कामाला लागल्या. ही दुसरी संधी होती. तिथेही आपण जे काम केले ते कंडोम पुरते केले. आज काल तिसरा बाका प्रसंग आपल्यासमोर आहे. तो म्हणजे वाढते बाल लैंगिक शोषण आणि मुली आणि स्त्रियां वरचे वाढते लैंगिक हल्ले.

या तीनही गोष्टी भीषण म्हणाव्या अशाच आहेत यात शंका नाही. लैंगिकतेचे असे भयाण आविष्कार आणि तिचे परिणाम जसे आपल्या समोर येत गेले तसे आपण झोपेतून जागे होत गेलो. आणि अनेक संस्था माणसे कामाला लागली. आता संसद, विधान सभा आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून होणारा विरोध मावळत गेला आहे ही जमेची बाजू म्हणावी लागेल.

परंतु आपण आज पर्यंतच्या या साऱ्या कामाचं स्वरूप नीट पाहिलं तर असं दिसतं की 1. हे काम मुख्यत: प्रतिबंधात्मक होतं. 2. हे काम disaster management सारखं होतं. 3. आणि महत्वाचं म्हणजे हे काम धमकी वजा म्हणजे कसल्या न कसल्या 'थ्रेट' च्या छायेखाली केलेलं होतं आणि म्हणून एका अर्थानं मानवी लैंगिकतेची बदनामी आणि अवमूल्यन करणारं होतं.

या कामाचं स्वरूप वैज्ञानिक माहिती देण्यावर भर होता. हे अतिशय चांगलं होतं. अपसमज, गैरसमज, अंधश्रद्धा नाहीशा होण्याच्या दिशेने या शिक्षणाचा अतिशय चांगला उपयोग झाला यात काही शंका नाही. मुख्य म्हणजे या विषयातली गोपनीयता नाहीशी झाली. काही लोक बोलू लागले.

दुसऱ्या बाजूला लैंगिकता "शिक्षणा"चा भार मनोरंजन इंडस्ट्रीने मनापासून उचलला आहे. अनेकदा ते शिक्षण अतिशय भ्रष्ट रूपात समोर येत असते. टी व्ही सारखी माध्यमें, सिनेमा, जाहिराती आणि आता इन्टरनेट, सोशल मीडिया सुद्धा या क्षेत्रात उत्साहाने उतरली आहेत. यांचा जोर येत्या काही वर्षात खूप आक्रमक रीतीने वाढणार आहे. पंचवीस वर्षात यांचा उद्योग करोडो अब्जावधीचा होईल. दुःख त्याचे नाही. दुःख माणसाच्या, विशेषत: स्त्री च्या लैंगिक प्रतिमेच्या अवमूल्यनाचे आहे.

आध्यात्मिक धार्मिक ताकदी सुद्धा या क्षेत्रात भयानक स्वरूपाचे काम करत आल्या आहेत. आजही ब्रह्मचर्य आणि त्याचे महत्व, विशिष्ट धर्माच्या लोकांची संख्या वाढणे, कमी होणे यावर चवीने होणारी निष्फळ चर्चा यांमुळे तरुणांचा बुद्धीभेद होत आलेला आहे. नेत्यांना याचे कसलेच भान नाही. येत्या काही वर्षात या ताकदींना अच्छे दिन येणार असे दिसते आहे.

एक अतिशय आक्षेपार्ह बाब म्हणजे मनोरंजनाचे मार्केट आणि आध्यात्म या दोन्ही ताकदी स्त्री विरोधी आहेत. बाईची वस्तू करणे आणि तिच्या लैंगिकतेचे आविष्कारावर कडक बंधने आणणे हे त्यांचे उद्देशच आहेत. एकूण राजकीय आणि सामाजिक वास्तव या शक्तींच्या बाजूचे आहे असे आज तरी दिसते आहे. पण ते समूळ बदलायला हवे.

लैंगिक 'शिक्षणा'चे आणखी एक मार्केट जे पालकांना आणि शिक्षकांना अलीकडे स्पष्ट दिसले आहे ते म्हणजे पॉर्न मार्केट. या मार्केटचे परिणाम अनेकविध रीतीने समोर येणार आहे. कदाचित येत्या काही वर्षांत पॉर्न आणि त्याचा वेगाने सर्वदूर प्रसार आणि त्याची सहज उपलब्धता हा आपल्या देशासमोर येणारा चौथा मोठा बाका प्रसंग असेल. तेव्हा इथले सर्व भगव्या पांढऱ्या रंगांचे राज्यकर्ते, शिक्षण मंत्री, आध्यात्मिक गुरू, शिक्षण तज्ञ आणि न्यायालये गाढ झोपेत असतील !

पुढच्या पंचवीस वर्षांचा काळ कल्पना करण्यासाठी अवघड आहे हे मान्य आहे. पण अशीच घोर निद्रा चालूच राहिली तर मात्र या पंचवीस तीस कोटी तरुण लोकसंख्येचे काही खरे नाही.

वैज्ञानिक माहितीचे महत्व आहेच. पण ती कितीही दिली तरी तेवढे पुरेसे नक्की नाही हे यूरोप अमेरिकेतील अनुभवाने सिद्ध झालेले आहे.

आपण एक अतिशय नवी सुयोग्य भूमिका आणि कालानुरूप रीत अंगी बाणवायला हवी आहे. आपल्या डोक्यातली सारी कोळीष्टके झाडून साफ करायला हवी. जुनाट पौराणिक ऐतिहासिक तथाकथित आदर्श पुरुष प्रधानतेचे संदर्भ सोडून द्यायला हवेत. नव्याच संवाद प्रक्रियेची रचना करायला हवी.

एक गोष्ट अशी झाली आहे की तुम्हाला आवडो न आवडो येथील मुलामुलींनी आपली लैंगिकता बहुतांशी स्वीकारलेली आहे. ख़ास करून शहरी मुला मुलींनी. ग्रामीण भागात देखील या बाबत स्वीकार होतो आहे. "सैराट" सारख्या चित्रपटाचा चांगला परिणाम झाला आहे. या सिनेमातील मुलीच्या लैंगिकतेच्या प्रसन्न आविष्काराचे तरुण वर्गाने मना पासून स्वागत केलं आहे. तसं आपण देखील करायला हवं.

हा विषय केवळ प्रजनन आरोग्याचा किंवा त्या बाबतीतल्या वैज्ञानिक माहितीचा नाही. हा विषय मुळात मानवी नातेसंबंधांचा आहे हे एकदा तरी अतिशय सूज्ञ पणे आपण ध्यानात घ्यायला हवे आहे.

आता या संवादात कोणताही 'थ्रेट' नको आहे. धमकीवजा काहीही नको आहे. संवादावर सातत्याने एच आय व्ही किंवा गरोदरपण किंवा रेप यांचे सावट नको आहे. याने काहीही चांगले साध्य होत नाही. भय निर्माण करणे हा कोणत्याही शिक्षणाचा हेतू असू शकत नाही.

लैंगिकता हे स्वत:शी आणि दुसऱ्या व्यक्तीशी मानुष नाते आहे. आणि ते संपूर्ण जीवनाला व्यापून असते. यात परस्पर संमती, विश्वास, शरीर आणि मनाचा सन्मान, आकर्षण, आनंद, सुख आणि जबाबदारी यांचा समावेश असतो हे आवर्जून यायला हवे.

यात जसे शरीर आहे तसे मनही असते. फक्त शरीर शास्त्र, बायोलॉजी उपयोगाची नाही. फक्त मासिक पाळीची स्वच्छता सांगूनही चालत नाही. आपल्या कंपनीची सेनेटरी पैड्स विकणे हा फक्त धंदा झाला. ज्ञान नाही.(असे काही शैक्षणिक प्रयोग उद्योगपती आपल्या निव्वळ आर्थिक फायद्या साठी करत असतात.)

प्रजनन आरोग्या बद्दलचा संवाद मुला मुलींशी एकत्रित पणे व्हावा. हे माझे मत धक्कादायक वाटेल. पण आमचा अनुभाव असे सांगतो की याने संवाद अधिक सन्मानपूर्वक होत राहातो. (अर्थात काही वैयक्तिक स्वरूपाच्या शंका, प्रश्न हे प्रश्नपेटीत टाकायला सांगावे. त्याची योग्य उत्तरेही ज्याची त्याला द्यावी) पण एकूण स्त्री पुरुष प्रजननाची वैज्ञानिक माहिती एकत्र बसवून द्यावी. या पद्धतीच्या असंख्य कार्यशाळा आमच्या "आरोग्य भान" समूहाने देशभर विविध ठिकाणी घेतल्या आहेत.

या संवादामधे पुरुषाची माचोगिरी किंवा स्त्रीची पारंपारिक शरम यांचे बिलकुल गौरवीकरण होता कामा नये.

लैंगिकतेचे चुकून देखील सवंग उल्लेख नको आहेत. लैंगिकतेचे चांगले आविष्कार देखील असतात याची उदाहरणे जरूर पुढे आणावीत. अर्थात लैंगिकते संदर्भात समाजात अवती भवती काय काय चाललं आहे हे वास्तव सुद्धा मुलां समोर जरूर आणावे. त्यावर सांगोपांग चर्चा व्हावी. स्त्री पुरूष नाते संबध लैंगिकतेसह कसे असावेत, कसे असू नयेत यावर देखील सविस्तार बोलावे. या संवादामधे समलिंगी नाते संबंधा विषयी नॉर्मल रीतीनेच बोलणे व्हायला पाहिजे. या प्रकारचे नाते हे नैसर्गिक रीत्या आणि सहजते ने समजावून घ्यायला आणि द्यायला हवे. या बाबतचे बोलणे मुळीच टाळू नये.

पॉर्नोग्राफी विषयी केवळ नैतिक भूमिका घेऊन चालणार नाही. अशा साहित्या मधे विडियोज मधे स्त्रीचे, मुलीचे शोषण असते. खरे तर त्या पुरुषाचेही शोषण असते. शिवाय त्यात दाखवलेली लैंगिक पॉवर ही अतिशय अवास्तव आणि तद्दन खोटी असते, त्यामुळे ते पाहाणाऱ्याला अकारण एक प्रकारचा न्यूनगंड येऊ शकतो. आणि त्याची बिलकुल गरज नाही हेही मुलांशी बोलायला हवे आहे.

अशा अनेक गोष्टी ध्यानात घेऊन काही निश्चित आणि दमदार पावले उचलली तर लैंगिकता शिक्षणाचे भवितव्य उजळेल.

नाही तर आजचा अंधार अधिक गडद होत जाईल.

डॉ मोहन देस

Updated : 25 Jan 2017 9:44 PM GMT
Next Story
Share it
Top