Home > मॅक्स एज्युकेशन > पेपरचं सुपरविजन आणि कॉपी 

पेपरचं सुपरविजन आणि कॉपी 

पेपरचं सुपरविजन आणि कॉपी 
X

मास्तरीन झाल्यावर सुरुवातीला अगदी जीवावर येणारे काम म्हणजे हे! दोन अडीच तास हे अतिशय कंटाळवाणे काम करत बसायचे. त्यात वर्गात बसलेल्या मुलांना आपण आज्जीबात तिथे नको असतो. एखाद्या विलन सारखी एंट्री मारायची आणि पेपर संपेपर्यंत ती भूमिका निभावायाची. अक्षरशः सांगते मुलं खाऊ की गिळू ह्या भावाने बघत असतात आपल्याकडे..

पण वेळ जाईल तसं सगळं बदलत जातं.. लोणची मुरतात असं म्हणा किंवा निब्बरपणा येतो असं म्हणा.. पण आता हे काम करताना पूर्वी इतकी चिड चिड होत नाही.

आणि खरं सांगायचं तर मजा येते हल्ली.

हे तर एखाद्या खेळासारखं आहे.. आलिबाबा आणि समोर बसलेले 40 चोर.. हो, 40 चे40 विद्यार्थी चोर असतात! प्रामाणिकपणे एकही लिहीत नाही हे माझं गेल्या 4 वर्षातले निरीक्षणातून काढलेले अनुमान आहे. किंवा लपाछपी चा खेळ.. प्रॉब्लम फ़क्त एवढाच असतो की राज्य कायम आपल्यावर. इकडे कॉपी हा प्रकार भन्नाट चालतो...मी विद्यार्थी असताना कॉपी म्हणजे पाप होतं! महापाप होतं!! पण हे लोक सर्रास करतात. फारच रूटीन आहे इकडे कॉपी. 60 ते 70 टक्के लोकांकडे चिठ्या चट्या असतातच. त्यात हे काम रिडक्शन xerox ने बरच सोप्पे केलय. एका मुलांची अशी एक चिठ्ठी पकडली.. हा तयारच नाही द्यायला पेपर.. जबरदस्ती काढून घेतला.. हा म्हणे मैडम तो कागद परत द्या पाच रूपये घालवलेत xerox साठी आणि मुली पण ह्याच्यात काही कमी नाहीत! स्त्री पुरुष समानता कुठे असेल तर या क्षेत्रात आहे! कुठे ठेवतात ह्या चिठ्या?ब्रह्मदेवाला ही सापड़णार नाहीत...ज्यूनियर सुपरवाइजर काय चीज आहे? अगदी अशक्य ठिकाणी ठेवलेल्या असतात.

बरं कॉपी करून पास होतात का? तर ते ही नाही.. ह्यांना कुणीतरी समजावून सांगितलं पाहिजे.. की बाबानो 35 टक्के मार्क्स पडायला कॉप्या करून काही उपयोग होत नाही. म्हणजे आख्ख पुस्तक किंवा गाइड जरी खिशात भरून आणलं तरी चोरून चोरून बघून लिहायला कुठले उत्तर कुठे आहे हे माहीत असण्यासाठी ते वाचलेले असावे लागते आणि वाचलेले असेल नीट तर ते खिशात आणायची गरजच राहत नाही. पण लक्षात कोण घेतो??

आणखी एक मजेदार प्रकार म्हणजे चूळबुळ..प्रश्नपत्रिका वाटल्यापासून ही एखाद्या संगीतिकेसारखी चालू होते.. सुरुवातीला आख्या वर्गात कुठून तरी एखादा सूर येतो. कोपऱ्यातून.. मग दुसऱ्या कोपऱ्यातून.. हळूहळू दोन्ही कोपऱ्यातून.. मग यांचीfrequency वाढत जाते.. स्पीड वाढतं.. वेळ संपत जाईल तसं मुलांचं desperationवाढत जातं.. सूर तीव्र होतात.. शेवटच्या दहा मिनिटांची बेल होईस्तोवर आपल्याला हा गोंधळ control करणं अवघड होऊन जातं.. आणि शेवटची दहा मिनिटे तर अशक्य.. एक इकडून एक तिकडून.. वर्गातल्या त्यातल्या त्यात हुशार मुलाभोवती एक अदृश्य नेटवर्क तयार होतं.. आणि प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असतात..

data-href="https://www.facebook.com/MaxMaharashtra/"

data-width="380"

data-hide-cover="false"

data-show-facepile="false"

data-show-posts="false">

कधी कधी एखादा सूर बेसुर लागतो.. कालच मला एक मुलगा म्हणाला..

"ओ मैडम तुम्ही तुमचे काम करा मी माझे करतो"

माझे काम काय तर ह्याच्या चुळबुली कड़े लक्ष न देता खाली मान घालून मला दिलेलं पेपरवर्क पूर्ण करणे!

आणि अहाहा..काय ते मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव.. सगळ्यात जास्त एंटरटेनमेंट कुठे होत असेल तर इथे..एक तर चोरी करायची असते.. त्यात अंगात टिळक आलेले असतात.. मी कॉपी केली नाही, मी बोललो नाही मी पेपर देणार नाही. किंवा परीक्षेत बोलणे हा माझा फॉर्म फी भरल्यावर सिद्ध झालेला अधिकार आहे.. आणि तो मला मिळायलाच पाहिजे..

जूनियर supervisor बिचारा ब्रिटिश असतो.. विलन असतो. नाहीतर मग आळोखे पिळोखे..किंवा एखादा डोळे मिटून समाधी लागल्यासारखं त्याला न येणारे उत्तर आठवायचा प्रयत्न करत असतो. किंवा एखादी टक लावून आपल्याच चेहऱ्याकडे बघत असते.. थांबा हूरळून जाऊ नका.. आपल्या चेहऱ्यातून तिला इंस्पिरेशन वगैरे काही मिळत नाहीये.. आपले लक्ष कधी दुसरीकडे जाते आणि त्या वेळेत तिचा कार्यभाग तिला कसा उरकून घेता येतो यावर लक्ष आहे तिचे.

एखादा मान मोडेस्तोवर समोरच्या पेपर मधे डोकावून पाहत असतो.. आणि आपण त्याला पकडले की मानेचे व्यायाम करून दाखवतो आपल्याला. आँखों ही आँखों में इशारे होतात.. sign लैंग्वेज डेवेलोप झालेली असते.. हो नाही हे तर फारच कॉमन आहे...ह्या मुलांची भाषा बरीच पोचलेली असते. बोटांची भाषा असते.. आपल्यापासून 3 बेंचेस किंवा लाइन्स लांब असणाऱ्या आपल्या मित्राला मैत्रिणीला बरोबर उत्तर पोहोचवायाची क्षमता या भाषेत असते.

एखादा चस्मिस मुलगा पहिल्यादा दिसतो तेव्हा खूप sincere वगैरे भसतो. पण थांबा.. वर्गातला सगळ्यात जास्त धोकेबाज हाच माणूस असू शकतो. काही दिवसात लांबच्या पेपर मधले व्यवस्थित दिसावे अशी भिंगे बाजारात आल्यास नवल वाटायला नको.. वरुन असे भिंग वापरु नये असे कुठे लिहिलय यूनिवर्सिटी च्या नियमावलीमध्ये असं म्हटलं की जूनियर supervisor चाट! बोलती बंद!!

भरारी पथकाचे लोक आले तर काय घाबरून गांगरुन जातात ही मुलं..वाघ आला की गोंधळलेल्या पाडसासारखी दिसतात. मघाच्या टिळकांचा शक्ति कपूर झालेला असतो.. आहे की नाही जादू? मग सॉरी मॅडम.. चुकलं मॅडम.. पहिल्यांदाच केली मॅडम.. जाऊ द्या की मॅडम ह्यावेळी...पुन्हा नाही करणार मैडम वगैरे चालू होतं...अरे.. मॅडमची पार्टी बदलली?? आणि हे भरारी पथकातले लोक तर काय करतात तर मुलांच्या समोरच सांगतात.. नवीन पेपर द्या त्याला लिहू द्या.. आणि नॉमिनल केसेस करायच्या आणि सोडून द्यायचं.. कसा धाक वाटेल त्याना? फर्स्ट इयरला आलेली मुलं थर्ड इयरला जाईपर्यंत कोडगी आणि अतिशय निर्लज्ज झालेली असतात.

काही समाजसेवक असतात. आपला पेपर लवकर जमा करतात आणि मग बाहेर जाउन बरोबर उत्तरे आपल्या मित्रांना खिड़कीतून पुरवतात..किंवा तुकोबांचे "एकमेका साह्य करू.." एरवी कुणी मनावर घेणार नाहीत इथे मात्र त्याचा वस्तुपाठ मिळतो..थोडक्यात काय.. दोन तासांच्या पेपरमध्ये जगातल्या बऱ्याच गोष्टी एका वर्गात घड़तात..

आणि रिकाम्या जागा भरा हा प्रश्न तर विद्यापीठाने ख़ास त्या मुलांसाठी कमीत कमी10 मार्क्स तरी पडावेत या योजनेने ठेवला आहे. पण कितीतरी वेळा मुलं स्वतः लिहिलेलं बरोबर उत्तर खोडून दुसऱ्याचं ऐकून चुकीचं उत्तर लिहीताना मी पाहिली आहेत. काय म्हणायचं याला.. lack of self confidence? की मैत्रिसाठी काय पण?? कीव येते हो मुलांची..

कसं थांबवायचं हे? हताश वाटतं कधी कधी

आणि शेवटची पेपर जमा करायची बेल झाली की हा chaos कण्ट्रोल करण्यात काही अर्थ ही राहत नाही. पण एकदा का सगळे पेपर जमा झाले आणि मुलं बाहेर गेली की कसं शांत वाटतं.. संपलं एकदाचं सगळं..

उद्या पुन्हा हाच खेळ!

Updated : 16 Feb 2017 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top