Home > मॅक्स कल्चर > वर्णवर्चस्व ही विकृती

वर्णवर्चस्व ही विकृती

वर्णवर्चस्व ही विकृती
X

एखादी वेबसाइट सुरू करायची तर त्यासाठी सर्व्हर लागतो. शिवाय डोमेन नावही लागते. ‘दि डेली स्टॉर्मर’ला डिजिटल ओशन व ड्रीम व्होस्ट या कंपन्या २०१४ पर्यंत सर्व्हर वापरू देत होत्या. १८ ऑगस्ट २०१७ पासून त्यांनी या वादग्रस्त वेबसाइटबरोबर काम करणे बंद केले. त्याचबरोबर ‘क्राउड फ्लेअर’चे सीईओ मॅथ्यू प्रिन्स यांनी जनआंदोलनापुढे गुडघे टेकले आणि डेली स्टॉर्मरबरोबरचे संबंध तोडले.

डेली स्टॉर्मर हे अत्यंत वर्चस्ववादी असून निओनाझींचे मुखपत्र आहे. हा नाझीवाद २०१५ पासून हिंसेच्या मार्गाने जगापुढे येत आहे. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे समर्थन जाहीररीत्या केले आहे. निवडणुकीच्या काळातही ‘Make American great again’ या घोषणेची दिशाही तीच होती व तेव्हापासून जगात विशेषत: अमेरिकेत गोऱ्यांचे वर्णवर्चस्व (white supremacy) स्थापन करा, असाच नारा ट्रम्प यांनी लावला आहे. अध्यक्षाचा कल पाहून निओनाझीवादी आता मशाल मोर्चे काढत आहेत. ही लाट शैक्षणिक संस्थांत पसरत चालल्याने अमेरिकेतील पुढची पिढी पक्की भेदभाव- वर्चस्ववादी बनण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शंभर वर्षांपूर्वी अशीच विचारधारा पश्चिमेकडे सुरू झाली आणि हिटलरच्या रूपाने नाझी भस्मासुराचा जन्म झाला. त्याची परिणती जर्मन लोकांचे आर्यरक्त शुद्ध आहे नि तेच जगात सर्वश्रेष्ठ आहे... इतर सर्व माणसे क्षुद्र असून ते नष्ट केले गेले पाहिजेत, अशी राक्षसी वृत्ती बळावली. डोनाल्ड ट्रम्पच्या रूपाने शंभर वर्षांनंतर हिटलर पुन्हा जन्मला आहे. सध्या ते अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन, रिगन, बिल क्लिंटन यांसारख्या भूतपूर्व अध्यक्षांनी वर्चस्ववाद जपल्याचे पुरावे देण्यात गर्क आहेत. व्हर्जिनियातल्या हिंसाचाराचे त्यांनी समर्थन केले. आणि निओ नाझी त्याबद्दल कौतुक करत, ट्रम्पमध्ये खरे बोलण्याचे धाडस आहे, असे म्हणत आहेत.

जगातली सुपरपॉवर ज्याच्या हातात आहे तो अमेरिकन अध्यक्ष केवळ अमेरिकेलाच नव्हे तर जगाला विनाशाच्या दिशेने नेत आहे हे अमेरिकन कल्चर आहे का? असा सवाल उपस्थित करणाऱ्या आम्हा भारतीयांनी, आपल्या पायाखाली काय जळत आहे व त्याचा संबंध ट्रम्प यांच्या या धोरणाशी लागतो का, हेही पाहणे आवश्यक आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलर, मुसोलिनी, जपानचा टोजो हे त्रिकूट जमले होते. आता ट्रम्प, मोहन भागवत, इस्रायल, जपान ही चौकडी तयार झाली आहे.

हे श्रेष्ठत्ववादाचा पुरस्कार करणारे येरे गबाळे नव्हेत. यांची संस्कृती हायटेक आहे. यांची आर्मी ही डिजिटल आर्मी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी जातीअंताची शिकवण दिली ती यांच्यामुळे स्वप्नवत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यानंतर समतेचे राज्य येईल असे भारतातल्या सर्वसामान्यांना वाटत होते. हिंदू संस्कृतीची महानता जगाला पटेल, असे वाटले होते. परंतु ते स्वप्नवतच ठरले. स्वाती चतुर्वेदीचे I am a troll हे पुस्तक वाचले की भारतीय डिजिटल आर्मीचे अंतरंग दर्शन होते. उजव्या विचारसरणीचे लोक देशात जातीयवाद कसा पेटवतात, तणाव कसा निर्माण करतात, त्यांना सवाल करणाऱ्यांचा मानसिक, लैंगिक छळ कसा करतात, विरोधी राजकीय पक्ष, विचारवंत, पत्रकार यांचा छळ कसा आरंभतात, याचे सविस्तर वर्णन यात आहे.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखली होती त्यात निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारे जातीयवाद पसरणार नाही, याची काळजी राज्यकर्ते व मीडिया यांनी घ्यावी, असे स्पष्ट केले होते. कायद्याने सर्वांना प्रचारावरचा खर्च निवडणूक आयुक्तांना देणे बंधनकारक होते. पण डिजिटल मीडियाच्या खर्चावर कोणतेच बंधन नव्हते. ‘न्हाणीला बोळा दरवाजा उघडा’ असा हा प्रकार होता. त्याचा सर्वाधिक फायदा भाजपने उठवला. त्याचे प्रशिक्षण आरएसएसकडून मिळाले. जातीजातीत द्वेष पसरवण्यावर, भडकावू विचार मांडण्यावर, डिजिटल जगतावर भारतीय निवडणूक आयुक्त काही करू शकत नाही, हे कुरेशींनी कबूल केले. याबाबत पोलीस कारवाई करू शकतात पण सत्तारूढ पक्षाविरुद्ध फक्त तक्रार दाखल करण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत. येत्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी याबाबत जागरूक राहायला हवे.

एका समूहाने दुसऱ्याला गुलाम करण्याची रीत मानवजातीला नवी नाही. ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी गौतम बुद्ध आणि सॉक्रेटिस यांचा काळ होता. त्या वेळीसुद्धा एक जात स्वत:ला दुसऱ्याहून श्रेष्ठ मानत होती. वास्तविक ही सामाजिक मनोविकृती आहे. शरीरापेक्षा मनामनात या अनुवंशिक रोगाचे जंतू जिवंत आहेत.

गौतम बुद्धांकडे एक तरुण ब्राम्हण विद्वान येतो. त्याला त्याच्या जातभाईंनी, बुद्धाला वादविवादात पराभव कर म्हणून पाठवले होते. तो बुद्धांना सांगतो,‘ब्राम्हणच श्रेष्ठ.’

तेव्हा बुद्ध त्याला काही प्रश्न विचारतात…

“लाकडाच्या घर्षणाने अग्नी तयार होतो. हा ब्राह्मणाने किंवा शूद्राने तयार केला तर त्यात समानता असते का?”

उत्तर आले, “होय.”

“शूद्र मुलगा, ब्राह्मण मुलगी विवाह झाला व त्यांना मूल झाले तर त्यातून मानवच निर्माण होईल की नाही?”

उत्तर आले, “होय.”

“जर ब्राह्मण पुत्र व्यभिचारी, असत्यवचनी, चोर निघाला व शूद्र पुत्र सदाचारी, सत्यवचनी निघाला तर पूजेचा प्रसाद प्रथम कोणाला द्याल?”

“अर्थात सदाचारी पुत्राला.”

“जर ब्राह्मण व शूद्र या दोघांनीही उटणे लावून नदीवर स्नान केले तर अंगावरील मळ जाऊन शरीर स्वच्छ होईल की नाही?”

“होईल.”

“याचा अर्थ जातीवर श्रेष्ठत्व अवलंबून नाही. तसेच ते जन्मावरही नाही.”

आज ट्रम्प वा संघवादी ज्या वर्णवर्चस्वाचा प्रचार करतात त्यातून त्यांना हवे तसे काहीही साध्य होणार नाही. तिसरे महायुद्ध लादले गेले तर स्टिफन हॉकिंग्ज म्हणतात त्याप्रमाणे ही ठिसूळ पृथ्वी उद्ध्वस्त होईल. मग तुम्ही आम्ही नामशेष होऊच. पण ट्रम्प अथवा भागवतही त्यातून वाचणार नाही.

-डॉ. सुभाष देसाई

Updated : 25 Aug 2017 4:30 AM GMT
Next Story
Share it
Top