Home > मॅक्स कल्चर > दलाई लामा आणि बिशप टूटू यांची शिकवण

दलाई लामा आणि बिशप टूटू यांची शिकवण

दलाई लामा आणि बिशप टूटू यांची शिकवण
X

केनियाची राजधानी नैरोबी येथे १९८४ साली एक जागतिक धर्म आणि शांतता परिषद भरली होती. मी भारताचा प्रतिनिधी म्हणून परिषदेला उपस्थित होतो. होमर ए जॅक बिशप, डिसमोनड एमपिलो टू टू या दोघांनाही भेटता आले. (पुढे त्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार मिळाले होते.) जागतिक शांतता ही मानवाच्या सहअस्तित्वावर अवलंबून आहे. केवळ मानवाच्या शांतीवर ती अवलंबून नाही. वनस्पती, पशुपक्षी, जलचर या साऱ्यांशी आपले जितके प्रेमाचे संबंध तितकी शांती चिरस्थायी. भारतीय संस्कृतीत वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे... म्हणणारे संत तुकाराम आहेत. डॉ. जगदीशचंद्र बोस या नोबेल पुरस्कार विजेता शास्त्रज्ञाने ‘वनस्पतींना भावना असतात’ हे प्रयोगाने सिद्ध केले. अशा तऱ्हेचे माझे विवेचन अनेक देश विदेशातल्या तज्ञांना आवडले. भारताचे मेजर जनरल डब्बान डॉ. विशाल सिंग यांनाही माझे व्याख्यान आवडले. शेवटच्या समारोपाच्या समारंभात नैरोबी डिक्लेरेशनमध्ये मी एक दुरुस्ती सुचवली. ती परिषदेने मान्य केली. ती अशी होती : मथुरेच्या एका संस्कृत प्राध्यापकाने, डॉ. राधाकृष्णन हे थोर संत होते असा मजकूर घातला होता. मी त्यात बदल सुचवला. डॉ. राधाकृष्णन हे थोर भारतीय तत्त्वज्ञ होते, विद्वान होते, हे खरे. पण संत हे त्यापेक्षा आध्यात्मिकदृष्ट्या थोर असतात असे आम्ही मानतो.

यावर आर्चाबिशप टू टू, होमर ए जॅक या साऱ्यांनी माझे विवेचन मान्य केले व तशी दुरुस्ती झाली. पण त्याचा राग मथुरेच्या प्राध्यापकाला आला. तर जे.एन.यू.चे प्राध्यापक विशाल सिंग म्हणाले, you spoke the truth.

सभा ओपन स्टेडियममध्ये होती. सभा संपवून पायऱ्या चढून मी वर आलो तर हात बांधून रागाचा पारा चढलेला प्राध्यापक म्हणाला, तुम्ही भारताची बदनामी जागतिक पातळीवर केली. मी विचारले, ते कसे? तो म्हणाला, ‘मूळ मसुदा मी तयार केला त्यात मी राधाकृष्णनना संत म्हटले होते. तुम्ही ते पूर्ण पुसून टाकले. मी खोटा ठरलो.’

मी विचारले, ‘तुम्ही वृंदावन मथुरेत राहता. चैतन्य महाप्रभू संत होते की नाही?’

‘हो,’ …

‘राधाकृष्णन मोठे की चैतन्य महाप्रभू?'

‘महाप्रभू’

‘मी नेमके स्पष्ट केले. संत हा विद्वान, तत्वज्ञापेक्षा मोठा असतो, असे भारतीय मानतात.’ यावर प्राध्यापक गप्प झाले.

डिसमंड टूटू हे दक्षिण आफ्रिकेतील स्वतंत्र्यलढ्यातले नेल्सन मंडेला यांचे सहकारी. ते आर्चबिशप होते आणि न्याय आणि वर्णभेदाच्या राजवटीविरोधाचे स्वातंत्र्यसैनिक होते. 1994 साली चेअर ऑफ ट्रुथ आणि समन्वय कमिशनर म्हणून त्यांची निवड झाली. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यानंतर नागरी संघर्ष आणि सांस्कृतिक दंगे सुरू झाले त्या वेळी शांतता प्रस्थापित करण्यात बिशप टू टू यांचे कार्य मोलाचे ठरले. साऱ्या जगात इतर देशांनाही हे कार्य मार्गदर्शक ठरले. ‘दि एल्डर्स’ नावाची एक जागतिक संघटना त्यांनी स्थापन केली. शांतता आणि मानवी हक्क याबाबत ते काम करतात. दक्षिण आफ्रिकेत केप टाऊनला ते राहतात.

बिशप टू टू आणि बुद्ध धर्मीय नोबेल पारितोषिक विजेते दलाई लामा या दोन महात्म्यांची अलीकडे भेट झाली. हिमालयातल्या धरमशाला येथे ही ऐतिहासिक भेट झाली. मी तिबेटमध्ये दोन वेळा जाऊन कैलास- मानस यात्रा केली. जिथे गौतम बुद्धांना बुधत्व प्राप्त झाले ती बोधगया. त्यांचे कुशीनारा निर्वाण ठिकाण, जन्माचे लुंबिनीवन, त्यांनी केलेला संचार, राजगृह, श्रावस्ती, वैशाली, सारनाथ अशा जवळजवळ सर्व ठिकाणी जाऊन आलो. नुंब्रा व्हॅली, सियाचिन, गँगटोक, लाहुल, स्पिती, संगला, नाको आणि नेपाळ या ठिकाणी अनेक बुद्ध स्तूप, मॉनेस्ट्रीत जाऊन आलो. तेथल्या अनेक लामांशी चर्चा केली. या सर्व ठिकाणी माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे दलाई लामांना आजच्या काळात गौतम बुद्धांसारखे अढळ स्थान आहे. करुणा, अहिंसा आणि शांतीचा बुद्ध संदेश जगभर पसरवत ते फिरत असतात. सर्वधर्माबद्दल आदर, निसर्गावर प्रेम, जागतिक शांतता ते पसरवतात. ते भारतात धरमशाला येथे तिबेटियन लोकांची राजधानीत राहतात. चीनने तिबेट गिळंकृत केल्यावर आज जवळजवळ साठ वर्षे त्यांची मातृभूमीपासून ताटातूट झाली म्हणून ते दु:खीकष्टी आहेत का? आध्यात्मिक असूनही त्यांनी सतत हसतमुख, आनंदी राहण्याची कला कशी जोपासली?

शिक्षण चंगळवाद शिकवते

दलाई लामांनी बिशप टू टू ना चर्चेत सांगितले की, आजचे सारे जग, शिक्षणप्रणाली भौतिक, लाह्य मूल्यावरच लक्ष केंद्रित करते. आपल्या आंतरिक मूल्याची आपण दखलच घेत नाही. अशी संस्कृती माणसाचे खरे प्रश्न सोडवू शकत नाही. मन आणि हृदयासाठी गरज असणारी शांती आणि आनंद चंगळवाद देऊ शकत नाही. आनंद आणि शांतीचा शोध आपण पैसा, मोठ्या गाड्या, मोठी घरे यात शोधतो पण तो शोध व्यर्थ असतो.

इंस्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्स अँड सायकॉलॉजी या ग्लासगो विद्यापीठाच्या संस्थेने केलेल्या वैज्ञानिक प्रयोगात असे आढळते की, माणसात फक्त चार मूलभूत भावना असतात. त्यातल्या तीन नकारात्मक असतात. भीती, राग व दु:ख. एकच भावना सकारात्मक आहे ती म्हणजे आनंद आणि सुख. आनंदामुळे समाधान लाभते. सुखाची भावना दु:खाच्या अनुभवानंतरही येऊ शकते. बिशप टू टू नी उदाहरण दिले. स्त्रीच्या प्रसूतीचे.

त्यांनी तिबेटियन गुरू दलाई लामांना विचारले 56 वर्षे झाली... घर सोडून, देश सोडून. तुम्ही दु:खी आहात का? दलाई लामांनी सांगितले ते फार मोलाचे. ते म्हणाले, 1950 मध्ये चीनच्या आक्रमणानंतर रक्तपात टाळण्यासाठी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. वयाच्या 15 व्या वर्षी 60 लाख तिबेटी लोकांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. त्यापूर्वी बालपणी जन्मदात्या आईवडिलांपासून धर्मगुरूंनी त्यांना दूर केले व नवे नेतृत्व दिले. 9 वर्षे चीनची समजूत काढली पण रक्तपात होईल म्हणून देश सोडून भारताच्या आश्रयाला आले. पण त्यामुळे साऱ्या जगाचा परिचय झाला. इतर देशातील जनतेची दु:खे समजली. हेही कळले की चीनमध्येही सारे सुखी नाहीत. आमच्यापेक्षाही गंभीर प्रश्न आहेत. स्वातंत्र्याची फार मोठी किंमत अनेकांनी मोजली आहे.

नेल्सन मंडेला, बिशप टू टू यांनीही अशी किंमत मोजली आहे. तेव्हा हे दोघे नोबेल पारितोषिक विजेते एकमेकाच्या हातावर टाळी देऊन बराच वेळ हास्यकल्लोळात रमून गेले आणि तेथेच खरा JOY खरे Happiness जगाला दिसले. जीवनाकडे पहाण्याचा positive दृष्टिकोनाचा तो उत्तम धडा होता.

डॉ. सुभाष देसाई

Updated : 6 Oct 2017 9:50 AM GMT
Next Story
Share it
Top