Home > मॅक्स कल्चर > धर्म ही अफूची गोळी आहे का ?

धर्म ही अफूची गोळी आहे का ?

धर्म ही अफूची गोळी आहे का ?
X

कार्ल मार्क्स या तत्त्वचिंतकाचे नाव जरी काढले तरी धर्माचा ठेका ज्यांनी भारतात वंशपरंपरेने घेतला आहे ते विंचू चावल्याप्रमाणे दंगा करू लागतात. वास्तविक मार्क्सचे तत्त्वज्ञान हे आधुनिक भारताच्या राज्यव्यवस्थेचा पाया असलेल्या लोकशाही व समाजवादी विचारधारेस पुष्टी देणारेच आहे, असे मला वाटते. मार्क्सने कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत १६९ वर्षांपूर्वी धर्म या संकल्पनेवर कठोर टीका केली होती. पण अखेर ‘ही अफूची गोळी आहे...’ एवढेच मार्क्सचे विधान प्रत्ययाला येत आहे. हे व्यसन तरुणांना लावणारे सत्तेत आल्यावर दुसरे कोणते चित्र दिसणार? धर्मरूपी मादक द्रव्य ११० कोटी जनतेच्या गळी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून उतरवले जात आहे.

दैनंदिन जीवनातील आव्हानं पेलणं अवघड जायला लागलं की सर्वसामान्य माणूस तथाकथित धार्मिक बाबी करून पाहातो. कर्मकांडे आणि स्वर्ग-नरकाच्या कल्पना त्याला पेचप्रसंगातून मार्ग निघत असल्याचे भासवतात. या भ्रामकतेच्या मुळावर, म्हणजे ‘धर्म’ या संकल्पनेवर घाव घाला, असे मार्क्सने म्हटले होते. याची आठवण होण्याचे कारण म्हणजे ‘पुरोहित’ हे कोणतेही शारीरिक श्रम न करता धर्मवृक्षावर-समाजवृक्षावर बांडगुळासारखे वाढतात, हे आसपास दिसत आहे. आता ही बांडगुळे छाटल्याशिवाय समाजवृक्षाची निकोप वाढ होणार नाही, हे सत्य भूमीपुत्रांना समजले आहे. श्री अंबाबाई मंदिरातील पुरोहितांची जळमटं त्वरित हटवा, अशी मागणी करत असे जनआंदोलन गेले काही महिने कोल्हापुरात सुरू आहे. त्यानं आता उग्र रूप घेतले आहे. ‘तुम्ही या भ्रष्टाचाऱ्यांना हटवून सहा हजार कोटींचे काळे धन सरकारजमा करता का आम्ही ते काम करू?’ असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला. हजारो पानी पुरावे सरकारच्या हवाली केल्यावर आता तरी न्याय मिळावा, यासाठी अटीतटीचे प्रयत्न चालले आहेत.

श्री अंबाबाई मूर्तीवर वज्रलेप समिती १९५४ मध्ये झाली. महिनाभर वादविवादाच घोळ चालला होता. छत्रपती शहाजी राजेंच्या हस्ते पूजाविधी संपन्न झाला होता. त्याची पुनरावृत्ती सातत्याने होताना दिसते. अलीकडेही वज्रलेप, रासायनिक प्रक्रिया यांवर समिती नेमली गेली होती, पण पुरोहितांनी सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. दोष मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या माथी मारला. या वेळी मात्र जनक्षोभ असा उसळला की भ्रष्ट पुजाऱ्यांना महिलांनीही चपलांनी बडवले. कोल्हापूरच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते.

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म ठिकाणाहून (कागल) अंबाबाई मंदिरापर्यंत २२ कि.मी. अंतराची दिंडी काढणाऱ्या १०० तरुणांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मंदिरातील भ्रष्ट पुजारी त्वरित हलवा, पंढरपूरप्रमाणे येथे लायक सरकारी पुजारी नेमा, अशा मागण्या झाल्या.

‘हे मंदिर आम्हा भक्तांचे… नाही कोणाच्या बापाचे!’

‘भ्रष्ट पुजाऱ्यांचे करायचे काय?... खाली डोके वर पाय!’

अशा घोषणाही झाल्या. देवाच्या नावाखाली फोफावलेल्या भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा क्षोभ वाढतच चालला आहे आहे. प्रशासनाने गांभीर्याने हा प्रश्न सोडावायला हवा. सरकारने आपले अधिकार त्वरित वापरावेत हे बरे.

असाच क्षोभ थोड्याफार फरकाने देशात सर्वत्र आहे. कोलकात्यात राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे राजभवन हा आरएसएसचा अड्डा बनला आहे, असा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला असून आपल्याशी अत्यंत अवमानजनक भाषा वापरून राज्यपाल बोलले, हा त्यांचा आरोप ही घटना ताजे उदाहरण आहे. असाच माज करवीरच्या अंबाबाई मंदिर पुजाऱ्यांना आला आहे. बंगालमध्ये शोषित जनता रस्त्यावर उतरली तेव्हा ‘हिंदू धर्म खतरे में है’ च्या जुन्या व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापुढे जातीय, धार्मिक दंगली रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचारी सायबर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षित करावे लागतील.

श्री अंबाबाई मंदिर प्रकरणी हार मारण्याच्या धमक्या देणारे मोकाट आहेत. त्यापूर्वीच्या पुरोगाम्यांचे आरोपी जामीनावर सुटले आहेत. जिल्हाधिकारी महामंत्र्याच्या आदेशाला बेकायदा म्हणणारे पुजारी, देवीला घागरा-चोळी घालणारे सार्वजनिक कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्यांना अजुनही अटकाव नाही. इकडे छत्रपती उद्यनराजेंना अटक होते. आम्ही सारे हिंदू एक आहोत म्हणायचे पण बहुजन समाजातील तरुणांना मुस्लीम समाजाविरूद्ध भडकावणे, वारकऱ्यांत तलवारी, मशाली घेऊन घुसणे हे चालूच आहे. असे करणाऱ्यांनी हे विसरू नये की, टाळ वाजवणाऱ्या हाताला खुरप्याचीही सवय आहे.

डॉ. सुभाष के. देसाई

Updated : 27 July 2017 6:56 PM GMT
Next Story
Share it
Top