Home > मॅक्स ब्लॉग्ज > समाधान 2 - व्यसनाधीनता

समाधान 2 - व्यसनाधीनता

समाधान 2 - व्यसनाधीनता
X

"व्यसनाधीनता" या विषयावर सर्च गडचिरोली च्या योगेश दादा च लेक्चर होतं…

स्थळ: सोमनाथ श्रमसंस्कार छावणी

वेळ: दुपारी अडीच तीन ची

आणि विदर्भातलं रणरणतं ऊन (ज्यानी अनुभवले आहे तेच जाणतील)

गोरा गोमटा उंचापुरा आणि किड़किडित.. ब्लू जीन्स आणि सूती हाफ शर्ट.. डॉ योगेश कालकोंदे।

सहसा सोमनाथ मधले लेक्चर्स म्हातारे खादीच्या झब्बे वाले लोक घेत। पण हा handsome तरुण डॉक्टर हा एक आश्चर्याचा छोटासा धक्काच होता।

खूप अभ्यासपूर्ण प्रेजेंटेशन होतं त्याचे… विदर्भातल्या विकासाचं "फुटकं मड़कं मोडेल" अतिशय कळकळीने आणि आकडेवारीनिशी समजावून सांगत होता. ही आपल्याकडच्या विकास मॉडल्सची irony आहे. शोकांतिका! महाराष्ट्र शासन प्रती माणशी विकासासाठी जेवढा खर्च करतं त्याच्या दुप्पट पैसे लोक तम्बाखू मावा, खर्रा किंवा तत्सम पदार्थावर खर्च करतात! हे लोक आपल्या कष्टाच्या कमाइच्या निम्मा ते तीन चतुर्थांश भाग नीरनिराळ्या व्यसनावर उडवतात.. ही वस्तुस्थिती आहे..

आणि ह्यावर उपाय काय? व्यसनांचा विळखा समाजाला असा पडलेला आहे. त्यातून सोडवणूक प्रयत्नपूर्वक आणि नेटाने करावी लागेल.

व्यसनांचा आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे पांढरपेशा एकच प्याला टाइप. ह्या लोकांचे असे म्हणणे असते की थोडीशी वाइन घेतली तर त्यातून विटामिन्स आणि एंटी ऑक्सीडेंट्स वगैरे मिळतात. आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. आणि ह्यासाठी हे लोक मोठ मोठ्या साइंटिफिक जर्नल्स मधला रिसर्च quote करतात. पण त्याने स्टैटिस्टिकल डाटा दाखवून आम्हाला हे disprove करून दाखवलं. आम्ही बघतच बसलो.

खरच असे तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत म्हणून आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून टेम्भा मिरवु शकतो नाही? योगेश दादा च्या लेक्चर मुळे आम्ही खरच हादरून गेलो होतो.. आणि शेवटी तो बोललाच.. कदाचित हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होताच.. 'मी व्यसन करत नाही किंवा करणार नाही.. मग मी का ह्या गोष्टींची काळजी करू??"

तो म्हणाला.. तुम्ही नाही करत.. ठीक आहे पण तुम्ही टैक्स भरता न.. तुमचा हार्ड अर्नेड मनी हा शासन अशा फुटक्या मडक्यात टाकत असताना तुम्ही असे बघत बसणार का?? आणि त्याचा परिणाम काय.. हातात कॅन्सर सारख्या व्याधी.. आणि किती दिवस तुम्ही हा व्यसनांचा राक्षस घराच्या उम्बऱ्याबाहेर थोपवू शकाल?? पुढे तुमचा भाऊ, तुमचा काका,तुमचा मामा ह्याला बळी पडूच शकतो ना.. म्हणून तम्बाखू आणि दारु बंदी साठीच्या लढाईत सगळ्यानी उतरणे ही काळाची गरज आहे.

हे होइतो व्याख्यानाची वेळ संपली आणि संयोजकानी tea ब्रेक announce केला. चहा झाला की आम्ही रमत गमत जागेवर येऊन बसलो आणि रवी सरांनी माइकचा ताबा घेतला. आणि अचानक ठरलेल्या कार्यक्रमात बदल घोषित केला. आणि एक वेगळाच सेशन चालू केला. रवी सरानी योगेश दादाशी मोकळ्या गप्पा करायचं ठरवलं. सुरुवातीला त्याची ओळख करून देताना त्यानी आम्हाला सांगितलंच होतं की तो डॉक्टर झाल्यावर immunology मध्ये रिसर्च करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. तिकडे तब्बल 10 वर्षे राहिला. आणि मग तिथून उठून तो गडचिरोलीला व्यसनाधिनतेवर काम करण्यासाठी आला. कोणता शहाणा माणूस हा असा निर्णय घेईल..किंवा असं काय झालं की त्याला असा निर्णय घ्यावासा वाटला?

आणि मग योगेश दादा खुलला.. मनामोकळेपणाने हसून त्याने सुरुवात केली. तो म्हणाला ही खूप मोठी स्टोरी आहे... हा निश्चितच खूप मोठा निर्णय होता पण तो का आणि कसा घेतला हे सांगायला मला माझ्या शाळेच्या दिवसांपासून सुरुवात करावी लागेल.. म्हणजे मी डॉक्टर व्हायचं ठरवलं तेव्हापासून.. त्याने रीतसर आमची परवानगी विचारली.. आम्ही लांब रुंद होकार भरला आणि योगेश दादाची गोष्ट ऐकायला कान सरसावून बसलो.

मी आठवी मध्ये असताना निर्णय घेतला की मला डॉक्टर व्हायचं आहे.. तो सांगू लागला.. माझे बाबा बँकेत नोकरी करायचे. त्यांच्या सारख्या बदल्या होत असत. बदली होणारे पालक असतील तर त्याचा एक तोटा असा होतो की तुम्हाला कायमचे मित्र मिळत नाहीत. ते सारखे बदलत जातात. पण एक फायदा असा होतो की तुम्हाला खूप वेगवेगळ्या जागा, लोकं बघायला मिळतात आणि त्यांचं जगणं अतिशय जवळून अनुभवता येतं. तर मी आठवीत असताना आम्ही मराठवाड्यात नांदेड जवळच्या एका गावात होतो. तिथे आमच्या शेजारी एक डॉक्टर रहायचे. मी कायम त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसायचो. डॉक्टर स्वतः खूप अभ्यासू होते. त्यांच्याकडे एक माइक्रोस्कोप होता. पेशेंट्स नसतील तेव्हा ते मला त्या माइक्रोस्कोप खाली काहीबाही दाखवत असत. त्यावेळी मी पहिल्यांदा माइक्रोस्कोप खाली रक्त पाहिलं आणि ते बघून माझी जिज्ञासा चाळवली गेली. आणि तेव्हा मी ठरवलं की आपणही डॉक्टर व्हायचं. नंतर ही बाबांच्या बदल्या होत गेल्या. शाळेत हुशार होतो त्यामुळे मेडिकल ला सहज admission मिळाले. आणि मी mbbs झालो. पोस्ट ग्रेजुएशन ला विषय निवडायची वेळ आली तेव्हा मला दोन विषयामधे खूप जास्त इंटरेस्ट होता त्यातून एकच सेलेक्ट करायचा होता. एक म्हणजे पब्लिक हेल्थ आणि दूसरा immunology. पब्लिक हेल्थ ह्यासाठी की ती भारताची इथल्या लोकांची काळाची गरज होती आणि immunology ह्यासाठी की ते माझं passion होतं. मला मनापासून तो विषय आवडायचा. मी खूप लोकांशी बोललो. आणि मला बरेच उलट सुलट सल्ले मिळाले. ह्याच्या मला किती फ़ायदा झाला माहिती नाही. पण शेवटी passion चा विजय झाला. मी immunology घ्यायचं ठरवलं. मला पाहिजे त्या विषयाला पाहिजे तिथे एडमिशन मिळाले कोर्स पूर्ण झाला पण माझे समाधान नाही झाले. immunology हा विषय असा आहे ना. त्यात रोजच्या रोज काही ना काहीतरी अद्ययावत संशोधन चालु असतं. immunology म्हणजे रोगप्रतिकार शक्तिचा अभ्यास करणार विज्ञान. माझी ह्या विषयातली जिज्ञासा कोर्स पूर्ण झाल्यावर सुद्धा संपली नाही. मग मला त्यात संशोधन करायचे वेध लागले. मी जरासा आढावा घेतला तर माझ्या असे लक्षात आले की भारतात ह्या विषयात अद्ययावत रिसर्च खूप कमी ठिकाणी चालतो. तरीही चंडीगढ़ला aiims मधे एक डॉक्टर ह्यावर काम करायचे. मी त्यांना जाऊन भेटलो. सुरुवातीला त्याना विश्वासच बसेना की एक पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर इथे फुल टाइम काम करायचं म्हणतो. त्यानी मला खूप प्रश्न विचारले. त्यांचे कितपत समाधान झाले माहिती नाही. पण, मी तिथे रोज जाऊ लागलो. काम करू लागलो. लवकरच मला असे लक्षात आले की माझ्या प्रश्नांची उत्तरं मला इथे मिळू शकत नाहीत. एकन्दरच भारतातली रिसर्च 'system' गंजलेली आहे. आणि मी बाहेरच्या संधी शोधू लागलो. आणि मला पाहिजे तशी संधी मिळाल्यावर मी ती 'grab' केली. मी अमेरिकेला गेलो. सुरुवातीला तिथल्या प्रशस्त चकाचक पॉश आणि वेल एक्विप्पड़ lab बघून भारावून गेलो. हळूहळू तिथे स्थिरावत गेलो. गाडी बंगला आणि बायको! माझं लग्नं ही झालं. मुलं झाली. बायको डॉक्टर होती आणि तिचं सुद्धा पोस्ट ग्रेजुएशन चालु होतं. ह्या सगळ्या गोष्टींचे म्हटलं तर एवढं आकर्षण नव्हतं. म्हणजे ही विरक्ती वगैरे प्रकार नव्हता. पण फुलफिल्मेंट जी बाकीच्या इंडियन लोकांना वाटायची तशी मला नव्हती वाटत.

एकदा काय झालं.. माझ्या superviser/ गाइड ने मला एक एक्सपरिमेंट सांगितला. मी तो व्यवस्थित डिज़ाइन केला.. आणि रन केला.

आणि तो एक्सपेरिमेंट fail गेला. ही खूप normal गोष्ट होती. पण एक प्रोटोकॉल म्हणून आम्ही त्या प्रयोगाचे कॉस्टिंग केले. अमेरिकन लोकांचे हे एक भारी आहे. प्रत्येक गोष्टींचे प्रोटोकॉल तयार करतात आणि ते कटाक्षाने पाळतात. आपण भारतीय लोक मात्र शॉर्ट कट शोधायच्या मागे असतो. जसे की सिग्नल ला मामा नाही ना.. काढ़ा गाडी.. (आम्ही सगळे ह्याला जोक समजून हसलो.. काय दैवदुर्विलास आहे ना?) तर कॉस्टिंग नंतर माझ्या असे लक्षात आले की त्याची किम्मत काही लाखांच्या घरात होती. मी काही मिनिटांत अगदी सहज काही लाख रुपये पाण्यात घातले होते. ती गोष्ट तिथेच संपून गेली. पण मला मात्र चुटपुट लागून राहिली. भारतात या पैशांचे काय काय करता आले असते?? किती लोक ऐन वेळी योग्य मदत न मिळाल्याने मरतात.. मला काय अधिकार आहे असा लाखो रुपयांचा चुराडा करण्याचा?? असे प्रश्न मला वारंवार पडू लागले.

तरीही इकडे येण्याचा निर्णय एका रात्रीत वगैरे घेतला नाहीच. त्या आधीच्या सुट्टीत मी सर्च (गडचिरोली मधली अभय बंग यांची संस्था )ला भेट देऊन गेलो होतो. आणि डॉ अभय बंग यांच्यासोबत माझा पत्रव्यवहार तेव्हापासून सुरु होता. त्यात मी त्यांना अशी गोष्ट बऱ्याच वेळा बोललो होतो की मला भारतात परत येऊन काम करायचं आहे. त्यावेळी त्यांचा attitude खूप casual होता. म्हणजे आता माझ्या अनुभवा नुसार असे म्हणणारे बरेच भेटतात. पण एखादाच खरोखर काम करायला येतो. आणि त्या उप्पर ही एखादाच टिकून राहतो.

तेव्हा ते मला अशी उत्त्तरे देत की ये.. तुझी गरज ही आहे आणि स्वागत असेल.

पण तरीही अजून निर्णय होत नव्हता. पण निर्णय प्रक्रिया सुरु झाली होती असे मी म्हणेन.

मग मी बायकोशी डिस्कस केलं.. आम्हाला लगेच अमेरिका सोडता येणार नव्हतं. तिचं पोस्ट ग्रेजुएशन चालू होतं. मग आम्ही बऱ्याच गोष्टी वर बोललो. एक महत्वाचा मुद्दा होता की मुलांचे शिक्षण.. आता गडचिरोली मधल्या शाळेत राहून काय शिकतील असे वाटायाचे. मग आम्ही विचार केला की जास्तीत जास्त काय होईल.. एक्सट्रीम म्हणजे मुलं मोठी झाल्यावर शिव्या देतील की हे तुम्ही आमच्या आयुष्यासोबत काय केलं..तर त्याची ही मनाची तयारी केली. आणि मी तरी जिल्हा परिषदेच्याच् शाळेत शिकलो होतो ना..

आणि मग कुठेतरी जाणीव झाली की काही गोष्टी ह्या फ़क्त तुमच्या स्वतःच्या असतात. त्या तुम्ही कुणासोबतही शेयर करू शकत नाही. तुम्ही एकटे असता. अगदी बायको जरी असेल प्राणांची सोबतीण, प्रेम करणारी असेल तरी तुमचं डोकं दुखत असेल तर ती वेदना तुमची स्वतःची असते. आणि ते तुम्हाला स्वतःला डील करावे लागते.

हे सगळं होता होता आम्ही इकडे शिफ्ट झालो. लोक मला म्हणायचे की तुझे स्पेशलायझेशन काय.. immunology.. त्याचा इकडे काही म्हणजे काहीच उपयोग नव्हता. मी पोस्ट ग्रेजुएट आणि डॉक्टरेट जरी असलो आणि पोस्ट डॉक्टरल फेलो जरी असलो तरी त्या शिक्षणाचा इथे उपयोग नव्हता. पण मी त्याना सांगतो की अरे मी पोस्ट ग्रेजुएट व्हायच्या आधी MBBS सुद्धा आहे. त्या डिग्री चा खूप उपयोग होतो इकडे. आणि मुख्य म्हणजे ह्यांना गरज आहे माझी. अमेरिकेतले ते प्रयोग माझ्याशिवाय ही कुणीतरी केले असते. आणि मग पब्लिक हेल्थ मध्ये मला काम करायला मिळालं. हे माझे दूसरे आवडते क्षेत्र होते.

इथे ही खूप बरे वाईट अनुभव आले. एकदा एक पेशेंट आला, त्याची urethra ब्लॉक झालेली त्यामुळे त्याला लघवी करता येत नव्हती, वास्तविक हे urologist चे काम पण इकडे कुठे तसा डॉक्टरच नाही. मग मी गूगल ओपन केलं तर मला असे लक्षात आले की ह्यासाठी एक स्पेशल इंस्ट्रूमेंट लागणार आहे. आस पास चौकशी केली तर ते इंस्ट्रूमेंट सरकारी दवाखान्यातच फ़क्त अवेलेबल होतं. आम्ही patient ला तिकडे घेऊन गेलो. तर तिथे ते कसे वापरायचे हे कुणालच माहिती नव्हते. कशी बशी माहिती मिळवली. पण इतक्या वर्षात ते चालूच न केल्याने ते चालू होईना. आणि एवढं सगळं समोर असून त्या pateint ला डोळ्यासमोर दगावताना पाहिल. ती एवढी frustrating मोमेंट होती. अशा कितीतरी गोष्टी घडल्या. कधी कधी बायका येतात आणि मला न कळणाऱ्या आदिवासी भाषेत बोलतात.अशा वेळी दुभाषी लागतो सोबतिला. पण life goes on..

इकडे समाधान वाटते. आपला काहीतरी उपयोग होतो लोकांना ही समाधानकारक गोष्ट आहे.

बघता बघता 7 वाजत आले. योगेश दादा गेले 4 तास बोलत होता.. आणि अजूनही बोलतच होता..आणि आम्ही ऐकतच होतो आणि त्यालाही किती बोलू आणि किती नाही असे झालेले. माझ्या मनात राहून राहून विचार येत होता.. हा डॉक्टर समाधानाच्या शोधात अमेरिकेतून गड़चिरोली ला येतो.. आणि आमचे वारकरी समाधनाच्या शोधात पायी पंढरपुरला जातात.. ह्यातले कोणते समाधान खरे आहे? कोणते शाश्वत असेल? आणि कोणते चिरंतन??

स्नेहलता जाधव

Updated : 2 Feb 2017 7:57 PM GMT
Next Story
Share it
Top