Home > मॅक्स ब्लॉग्ज > या पायऱ्या कुठे जातात?

या पायऱ्या कुठे जातात?

या पायऱ्या कुठे जातात?
X

प्रत्येकाच्या आयुष्यात पायऱ्यांना खूप महत्त्व असतं. माझ्याही आयुष्यात पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. लहानपणी माडीवर जाणाऱ्या पायऱ्यांवर बसून मैत्रिणीशी कितीतरी वेळा गुजगोष्टी केल्या आहेत. उन्हाळ्यात आईला चोरून लोणच्याच्या फोडी इथेच खाल्या आहेत. या जिन्यातल्या पायरऱ्यांना टेकून तासंतास बसून गोष्टीची पुस्तके वाचली आहेत. पायऱ्यां म्हणजे त्या चढल्यावर कुठेतरी पोहोचणार हे मात्र नक्की असते. मराठवाड्यात खूप बारवा आहेत. बाराव म्हणजे चौकोनी विहीर. चहु बाजूने बांधलेली पायऱ्या उतरत उतरत थेट पाण्यापर्यंत जायची वेगळीच मजा यायची त्यावेळी.

देवीच्या दर्शनासाठी माहूरगडावर जाताना शेकडो अवघड पायऱ्या चढाव्या लागायच्या. “कष्ट केल्याशिवाय देवाचे दर्शन नाही.” असे आई म्हणायची या पायऱ्या भोवती हळूहळू भावविश्व तयार व्हायचे मग कॉलेजला गेल्यावर वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या पाहण्यासाठी अनेक पायऱ्या चढलो. पुढे मुंबईला आल्यावर आणि राजभवनला राहायला लागल्यावर खूप पायऱ्या असायच्या. बाणगंगेच्या तलावात उतरण्यासाठी असलेल्या प्रशस्त रेखीव पायऱ्या, वरळीला राहत असताना ऍनि बेझंट रोडवरून पोलीस कॉलनीत जायला एक छोटा रस्ता होता त्याच्या पायऱ्या, ब्रिटीशकालीन पेडर रोडकडे जाणाऱ्या हिरव्यागार वेलींनी लगडलेल्या पायऱ्या. हिंदी सिनेमामध्ये दाखवलेल्या कोर्टाच्या पायऱ्या आणि त्यावरचे बुलंद डायलाग.

तरुणपणी तर असे वाटायचे एशियाटीक वाचानालायाच्या पायऱ्यांवर बसून दिवसेंदिवस फक्त पुस्तकच वाचावे आणि खिशाला परवडली तर भेळ खावी. जाता येता बस मधून या पायाऱ्या दिसत असतं. मग पुढे मुंबईला आले आणि बघता बघता मुंबैकर झाले.

पण, आता मंत्रालय जळल्यानंतर नवीन मंत्रालयाचे बांधकाम झाले आणि भारदस्त मंत्रालयाचा दर्शनी भागाच्या जागी बांधल्या गेल्या पायऱ्या. या पाया-या मुळीच शोभत नाहीत. कारण पूर्वीचे भव्य गेट आता लुप्त झाले आहे. बर या पाय-यारून कुठेच जाता येत नाही. त्या कुठे पोहोचतच नाही. बरे या पायऱ्यांवर कुणी बसतही नाही कारण इथे जाणारे कडक इत्रीचे लोक पायऱ्यांवर बसणे योग्य समझत नाही आणि तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक तिथे पायरीवर जाऊ शकत नाही.

कशासाठी बांधल्या असतील या पायाऱ्या? कोणासाठी बांधल्या असतील? की वर्षानुवर्ष फिरत असलेल्या फायली आणि त्यातले विषय कधीच तडीस जात नाही त्याचे प्रतिक दाखविण्यासाठी बांधल्यात या पायऱ्या? की इथे काम करणा-यांना कुठलीच गोष्ट तडीस न्यायाची नाही हे सांगत आहे या पारऱ्या?

  • श्रद्धा बेलसरे-खारकर

Updated : 21 April 2017 5:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top