Home > मॅक्स ब्लॉग्ज > पाकिस्तानी मोगँबोंवर बहिष्कार घाला

पाकिस्तानी मोगँबोंवर बहिष्कार घाला

पाकिस्तानी मोगँबोंवर बहिष्कार घाला
X

काल रात्री, टीव्ही पहात असताना मला काही नेहमीचेच परिचित पाकिस्तानी चेहरे भारतीय वृत्त वाहीन्यांवरुन भारत आणि भारतीय लष्कराविरुद्ध गरळ ओकताना दिसले. स्वतःचीच शैली निर्माण केलेले ‘राजकीय-लष्करी विश्लेषक’ सय्यद तारीक पिरझादा यांनी तर आपल्या वाहीन्यांवरुन भारत आणि भारतीय लष्करावर अर्वाच्य टीका करणे हाच आपला धंदा बनवला आहे. जेंव्हापासून भारतीय उपखंडामध्ये फाजिल देशाभिमानाच्या स्पर्धेची लाट आली आहे, तेंव्हापासून तर टोकाच्या पाकीस्तानी दृष्टीकोनाचे हिरीरीने प्रतिनिधित्व करणारे पिरझादा हे एक आदर्श पाहुणे ठरले आहेत. कालसुद्धा त्यांनी मला मुळीच निराश केले नाही. त्यांच्याकडून अपेक्षित होते अगदी त्याप्रमाणेच त्यांनी आपल्या अतिउत्साही निवेदकांना जे हवे तेच केलेः आक्षेपार्ह भाषेत भारतीय लष्कराला लक्ष्य केले, भारताला युद्धाचे आव्हान दिले आणि अण्वस्त्र सज्ज पाकिस्तान भारताला चांगलाच धडा शिकवेल अशी धमकीही दिली. त्यांच्या हा भांडखोर सूर पाहून मला एका जुन्या हिंदी गाण्याची आठवण आलीः ‘ आ देखे जरा किसमे कितना है दम!’. कार्यक्रमात भारताची बाजू मांडणाऱ्या वृद्ध मेजर जनरलनीदेखील तेवढ्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले. निवेदकाला अखेर नाईलाजानेच कमर्शियल ब्रेक घ्यावा लागेपर्यंत पुढील अर्धा तास ही तूतूमैमै सतत सुरु होती. या अतिशय संवेदनशील समस्येबाबत परिपक्व साधकबाधक चर्चा गरजेची असताना, हा सगळा प्रकार म्हणजे केवळ एक हास्यास्पद नाटक बनून राहीला. एलओसीवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या हिंसक कारवायांमागील कारणमिमांसा शोधण्याचा कोणताही प्रयत्न न करता, हा सगळा प्रकार म्हणजे आरोप प्रत्यारोपांचा एक वेडगळ प्रकार बनला. एलओसी तर विसरुनच जा, इथे तर पडद्यावरच एक ‘टीव्ही युद्ध’ पहायला मिळाले (यात कमी होती ती केवळ पडद्यावरच्या गोळीबाराची!).

टीआरपीसाठी काहीही करणाऱ्या वृत्त वाहीन्यांच्या जगात अतिरंजितपणा हे अति-राष्ट्रवादासारखेच चलनी नाणे आहे. तसेच पराकोटीच्या अहंकारालाच महत्त्व देणाऱ्या आजच्या युगात नेमस्त आवाज हा दुर्बलतेचे लक्षण मानला जातो. आणि अशा वेळी थोडेसे थांबून, आपण काही प्रश्न विचारलेच पाहिजेतः तारीक पिरझादा आणि त्यांच्या पठडीतील लोक खऱ्या अर्थाने कोणाचे प्रतिनिधित्व करतात? किंवा एके४७ नाचविणाऱ्या आणि भारताचे तुकडे झाल्याचेच पहाण्याची इच्छा असलेल्या रक्तपिपासू अतिरेक्यांचे प्रतिक म्हणजेच पाकिस्तान, असेच चित्र रंगविण्याची आपली मानसिकता झाली आहे का? पाकिस्तानी लष्कर हे शत्रुच्या सैनिकांची विटंबना करण्यासारखे रानटी कृत्य का करत आहेत, याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊ शकतील, असे संवेदनशील आवाजच पाकिस्तानात राहीले नाही आहेत का? की शेजारी देशाबद्दलचा द्वेष एवढा वाढला आहे की त्यातून सातत्याने हा समाज आपली दुष्कृत्ये नाकबुल करत आहे आणि अगदी गंभीर पाकिस्तानी विश्लेषकसुद्धा आता विवेकाचा पर्याय स्वीकारताना दिसून येत नाहीत? जेंव्हा आपण दहशतवाद आणि काश्मिर यासारख्या समस्यांवर चर्चा करतो, तेंव्हा भारतीय वृत्तवाहिन्या अहमद रशीद यांच्यासारख्या जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त तज्ज्ञांना किंवा नजम सेठी किंवा हमीद हरुन यांच्यासारख्या वरीष्ठ संपादकांना बोलवण्याचे प्रयत्न का करत नाहीत? की कदाचित ते काहीतरी अर्थपूर्ण बोलतील आणि त्यामुळे चर्चेच्या बाजारात चालणारच नाहीत?

जर आपण या प्रश्नांवर गंभीरपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपण टीव्ही माध्यमातले लोक भविष्यातील भारतीय आणि पाकीस्तानी पिढ्यांचे किती नुकसान करत आहोत ते आपल्या लक्षात येईल. जर पिरझादा सारखे काहीही बरळणारे लोकच नेहमी पाकीस्तानी दृष्टीकोनाचे प्रतिनिधित्व करणार असतील, तर मला भेटणारा जवळपास प्रत्येक भारतीय तरुण हा पाकिस्तानचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो किंवा त्याला पाकिस्तानी कलाकारांना येथे पहाण्याची किंवा पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळू देण्याची इच्छा नसते, यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? पाकिस्तानच्या आयएसआय आणि लष्कर या दोघांनाही कदाचित नेमके हेच करायचे आहेः भारतीय आणि पाकिस्तानी लोकांमध्ये एवढे द्वेषाचे वातावरण निर्माण करा की सामान्य परिस्थिती निर्माण होणे अशक्यच होऊन बसेल. दुःखाची गोष्ट म्हणजे आपणही अशा माथेफीरु पाकिस्तानी लोकांना बोलवून या घातक खेळात सामील होत आहोत. हे असे लोक आहेत ज्यांच्याकडून टीव्हीवर एक ‘विशिष्ट भूमिका’ पार पाडली जाण्याचीच अपेक्षा आहेः मोगॅंबोसारख्या खलनायकाप्रमाणे दृष्टपणे आणि भितीदायकपणे ते वागत असतात. जर हे एवढे दुःखद आणि धोकादायक नसते तर ते विनोदीच वाटले असते.

यावर काही उपाय आहे का? मला वाटते एक उपाय आहे. भाषण स्वातंत्र्याशी संपूर्ण बांधिलकी ठेवूनही मला अगदी मनापासून असे वाटते की दोन्ही बाजूंकडील अशा युद्धखोर स्टुडीयो योद्ध्यांना एकाकी पाडण्याची, त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची वेळ आली आहे. खास करुन, हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आणि अशा वेळी सामान्य नागरीकांवरील हल्ल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना आपण हवा देता कामा नये. निःशस्त्र नागरीकांविरुद्ध हिंसेची चिथावणी देणाऱ्या कोणालाही भाषण स्वातंत्र्यात कोणतेही स्थान असता कामा नये.

मी ही सुरुवात करण्याचे ठरविले आहे. दहशतवादी कृत्यांमधील पाकिस्तानची भूमिका नाकारणाऱ्या आणि त्याउलट भारताविरुद्ध अणुयुद्धाची मागणी करणाऱ्या पिरझादासारख्या पाकिस्तानी लोकांना मी निवेदन करत असलेल्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये बोलवण्याचे इथून पुढे टाळणार आहे. कदाचित त्यामुळे मी निवेदक असलेली ती चर्चा कमी वादग्रस्त बनेल (आणि कदाचित कमी प्रेक्षक पहातील). पण, सध्याच्या बातम्यांच्या चक्रात विचित्र अंदाधुंदीत संपत चालेलली विश्वासार्हता कदाचित पुन्हा मिळविता येईल. आज पिरझादा आहे, उद्या कोणत्याही देशातील धर्मांध असेलः द्वेष आणि हिंसेचा प्रसार करण्याचाच धंदा सुरु केलेल्यांचे तोंड बंद करण्याची वेळ आली आहे. आता खूप झाले.

ता.कः कार्यक्रम संपताना पिरझादा गालातल्या गालात हसत असल्याचे मला स्पष्टपणे दिसले. मला याचे मुळीच आश्चर्य वाटले नाही. काल ते सुमारे अर्धा डझन भारतीय वृत्तवाहीन्यांवर स्काईपच्या माध्यमातून सहभागी झाले असणार. मला मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार यासाठी या वाहीन्यांनी पिरझादाने दुबईमध्ये उघडलेल्या खात्यात डॉलरच्या स्वरुपात मजबूत मोबदला जमा केला आहे. हे एक खूपच उपयुक्त बिझनेस मॉडेल आहेः भारतीय वाहीन्यांवरुन भारतावर आर्वाच्य टीका करा आणि बदल्यात चार शब्द ऐकून घ्या. आणि ज्या वाहीन्या स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेतात, त्यांनीच सर्वाधिक मोबदला त्यांना दिला आहे. टीआरपी मिळविण्यासाठी स्यूडो (छद्म) राष्ट्रवादाची देवणघेवाण करणाऱ्यांपासून देवानं या लोकशाहीला वाचवावं!

  • राजदीप सरदेसाई

अनुवाद - सुप्रिया पटवर्धन

Updated : 3 May 2017 6:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top