Mayor of Mumbai युसूफ मेहरअली : मुंबईचे पहिले समाजवादी आणि मुस्लीम महापौर !
कोण आहेत युसूफ मेहरअली? मुंबईच्या महापौरपदी कशी कशी झाली होती त्यांची निवड? वाचा
X
नुकत्याच राज्यातल्या महानगरपालिका निवडणुका पार पडल्या. आता चर्चा आहे ती म्हणजे Mayor of Mumbai श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? महापौरसंदर्भात सुरु असलेल्या चर्चाच्यानिमित्ताने एक असे मुंबईचे महापौर ज्यांनी इंग्रजांविरोधात दिलेला ‘चले जाव’ चा Quit India Movement नारा महात्मा गांधी यांना आवडला आणि ती ऐतिहासिक घोषणा झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी आणि विसरले गेलेले नाव म्हणजे Yusuf Meherally युसूफ मेहरअली. हे नाव फक्त 'क्विट इंडिया' आणि 'सायमन गो बॅक' Simon Go Back या इतिहासप्रसिद्ध घोषणांपुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्यांनी १९४२ मध्ये तुरुंगात असतानाच मुंबई (तत्कालीन बॉम्बे) चे महापौर म्हणून निवडणूक जिंकली आणि मुंबईच्या इतिहासात ते पहिले समाजवादी महापौर तसेच प्रमुख मुस्लीम महापौरांपैकी एक ठरले.
युसूफ मेहरअली यांचा जन्म २३ सप्टेंबर १९०३ रोजी मुंबईत एका संपन्न खोजा मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब कापड गिरण्या व्यवसायाशी संबंधित होते. एल्फिन्स्टन कॉलेजमधून इतिहास आणि अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होते. पण त्यांचे मन स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. १९२८ साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता. याचा संताप व्यक्त करण्यासाठी युसूफ मेहरअली यांनी बॉम्बे युथ लीगची स्थापना केली. कमिशन बॉम्बे बंदरावर उतरताच त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी 'Simon Go Back!' अशी घोषणाबाजी करून इतिहास घडवला. ही घोषणा इतकी लोकप्रिय झाली की आजही ती स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रतिष्ठित नारा मानली जाते.
१९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टी (CSP) ची स्थापना केली. महात्मा गांधींशी त्यांचे १९२७ पासून जवळचे संबंध होते. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला, शेतकरी आणि कामगार चळवळींमध्ये भाग घेतला.
'क्विट इंडिया' नारा आणि महापौरपद
१९४२ मध्ये 'क्विट इंडिया' आंदोलन सुरू होण्यापूर्वी गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये स्वातंत्र्याचा नारा काय असावा यावर चर्चा झाली. अनेक सूचना नाकारल्यानंतर युसूफ मेहरअली यांनी 'Quit India' हा नारा सुचवला आणि गांधीजींनी लगेच मान्य केला. त्याच वर्षी एप्रिल १९४२ मध्ये, लाहोर तुरुंगात असतानाच त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पाठिंब्याने त्यांनी ही निवडणूक सहज जिंकली आणि ते मुंबईच्या इतिहासातील सर्वांत तरुण महापौर (वयाच्या ३९व्या वर्षी) बनले.
महापौर म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारच्या एअर रेड प्रिकॉशन (ARP) योजनेच्या २४ लाख रुपयांचा निधी नाकारला. त्यांचे म्हणणे होते की, शहराचे रक्षण ब्रिटिशांवर सोपवता येणार नाही, कारण संकटकाळात ते पळून जातील (जसे मलाया आणि बर्मा येथे झाले). त्याऐवजी त्यांनी भारतीय स्वयंसेवकांची 'पीपल्स व्हॉलंटियर ब्रिगेड' स्थापन केली. ऑगस्ट १९४२ मध्ये 'क्विट इंडिया' आंदोलन सुरू झाले तेव्हा महापौर म्हणून त्यांनी गांधीजींचे मुंबईत आगमन स्वागत केले.
स्वातंत्र्यलढ्यातील अनेक तुरुंगवासांमुळे त्यांचे आरोग्य बिघडले. २ जुलै १९५० रोजी अवघ्या ४७ वर्षांच्या वयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण मुंबई शोकाकुल झाली. युसूफ मेहरअली हे समाजवादी विचारांचे होते, पण त्यांचा समाजवाद केवळ आर्थिक नव्हता. एकदा त्यांनी सांगितले होते... “मला कुरूपता आणि क्रूरतेचा तिटकारा आहे. म्हणून मी समाजवादी आहे. माझा समाजवाद केवळ अर्थकारणावर नाही, तर सौंदर्य आणि नीतिमूल्यांवर आधारित आहे.”
मुंबईने १९३४ ते १९६३ या काळात सहा मुस्लीम महापौर पाहिले, पण युसूफ मेहरअली हे त्यांच्यातील सर्वांत वेगळे आणि प्रेरणादायी नाव आहे. आजच्या काळात जेव्हा मुंबई अधिक संकुचित होत चालली आहे, तेव्हा त्यांच्यासारखा समाजवादी, देशभक्त, विद्वान आणि सर्वधर्मीयांचा आदर करणारा नेता पुन्हा होणं कठीण वाटते.






