Home > मॅक्स ब्लॉग्ज > कट्टर हिंदुत्ववादी झुंडीचा नवा आयकॉन 'योगी'

कट्टर हिंदुत्ववादी झुंडीचा नवा आयकॉन 'योगी'

कट्ट्ररवादी विचारधारा ही मेंदू बधिर करणारी असते. तिथे स्वतः विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण अशा विचारधारा या समोर शत्रू निश्चित करून तयार केल्या जातात आणि रुजवल्या जातात. त्याचाच वेध घेणारा राजकीय विश्लेषक डॉ. बाळासाहेब पवार यांचा लेख...

कट्टर हिंदुत्ववादी झुंडीचा  नवा आयकॉन योगी
X

कट्ट्ररवादी विचारधारा ही मेंदू बधिर करणारी असते. तिथे स्वतः विचार करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण अशा विचारधारा या समोर शत्रू निश्चित करून तयार केल्या जातात आणि रुजवल्या जातात. त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. त्यांना दिलेले उदिष्ट पूर्ण करणे हा त्यांचा महत्वाचा भाग असतो. त्यांना एकदा ठरवून दिलेला शत्रू व त्यांचा नेता निश्चित असतो. परंतु जर त्या नेत्या पेक्षा जास्त कट्ट्रवादी नेता मिळाला व तो आपल्या शत्रूंना धडा शिकवत असेल तर कट्ट्रवादी लोक आपला जुना नेता सोडून देऊन नवीन आक्रमक नेतृत्वाकडे वळतात. तो त्यांचा आयकॉन होतो, असेच काहीसे चित्र निर्माण होताना दिसत आहे.

'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) मुद्दा घेऊन बाहेर पडलेले कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) ,काजल हिंदुस्थानी (Kajal Hindusthani),संजय जाट (Sanjay Jat) व अशाच काही अतिशय प्रक्षोभक तथा कथित धर्मरक्षकांवर गुन्हे दाखल होत असताना, त्यांना अटक होत असताना, भक्त निश्चित नाराज झाले होते.

आपले सरकार असताना आपल्या धार्मिक नेत्यांना अटक ही बाब त्यांना सहन होत नाही. त्यामुळे वरील मानसिकतेतून त्याचा फोकस नरेंद्र मोदीवरून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे शिफ्ट होताना जाणवत आहे.

मी हा लेख लिहित असताना काही घटना घडत आहेत. अनेक कट्टर हिंदुत्ववादी लोकांवर कारवाई होत आहे. त्यामुळे भक्त मोदी शहावर नाराज झाले आहेत. त्यातच प्रयागराजला माफिया अतिक अहमद Atiq Ahmed) याच्या मुलाचे एन्काऊंटर झाले. त्यानंतर लगेच अतिक अहमद व आश्रफची हत्या झाली. भक्त खूश झाले.

किंग ऑफ नॉर्थचा योगीच्या (Yogi) फोटो सह ट्रेंड सुरु झाला. हा उन्माद माफिया मारला म्हणून नव्हता तर तो मुस्लिम असल्याने होता. जर हिंदू माफिया मारला असता तर काहीच झाले नसते. अतिकची हत्या कट्टर हिंदूत्ववादींसाठी आनंदाची गोष्ट होती. आता हा हिंदुत्ववादी उन्माद आता अतिशय टोकाचा झाला आहे.

एखादी विचारधारा रुजवताना ती रुजवणाऱ्याने विचार करायला हवा की, ती आपल्यावरच उलटणार नाही. मोदी व शहा यांच्यावर ही परिस्थिती ओढवणार आहे. त्यांची भक्तावरील मोहिनी कमी होत आहे. गोध्रातील रामभक्तावर नेमका हल्ला कोणी केला? त्यानंतर नरसंहार घडून आणला गेला. त्यातून हे दोन्ही नेते पुढे आले. गुजरात मॉडेल म्हणून जो प्रचार झाला. तो सामान्य माणसासाठी विकासाचे मॉडेल होता. पण त्यातील बोगसपणा उघड झाला. मात्र मुस्लिम विरोधी गुजरात मॉडेल मात्र देशातील विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात जन्मलेल्या नुकतच शहाणा होऊ घातलेल्या व मीडियाची शिकार झालेल्या नव मतदाराने मात्र स्वीकारले. देशात सत्तांतर झाले व मोदी निवडणूक जिंकणारे यंत्र बनले. पण आपला चहाता वर्ग हा व्यक्तिगत चाहाता नाही तर तो कट्ट्रवादी हिंदू आहे. तो अतिशय व्यवस्थित व मोठया प्रमाणात बनवला आहे, याचा मेंदू आता कोणाच्याही नियंत्रणात राहिला नाही. तो अशांत व अस्वस्थ आहे. हिंदू मुस्लिम (Hindu Muslim) यांच्यात वाद होईल, दंगली होतील, अशा बाबी तो आपला राग व्यक्त करण्यासाठी शोधत आहे. तो शांत करण्याची गरज संघाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे मोहन भागवत मस्जिद मध्ये जात आहेत. मौलानाशी चर्चा करत आहेत. जेणे करून हा अतिशय कट्टर होत गेलेला हिंदुत्ववादी (Hindutvavadi supporter) समर्थक हिंस्त्र होऊन आपल्या हातातून जाणार नाही, याची काळजी त्यांना वाटू लागली आहे. संघ फार पुढचा विचार करतो. हा कट्टर मोदी भक्त संघाच्या शाखेतून तयार झालेला नाही. संघ शाखेतला स्वयंसेवक कधीच रस्त्यावर उतरत नाही. प्रक्षोभक बोलत नाही. तो त्याचे प्रक्षोभ निर्माण करणारे विचार दुसऱ्याच्या गळी उतरवतो व त्याचा वापर करून घेतो. तो स्वतः काही करत नाही, याची जाणीव मोहन भागवत यांना झाली असल्याने ते मुस्लिम विरोध कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात मोदी काहीच बोलत नाहीत. अमित शहांनी मात्र काही कट्ट्रवादी धार्मिक नेत्यांना थोडा झटका देत इशारा दिला असला तरी योगी आदित्यनाथ यांचा बुलडोजर व थेट पोलिसी हत्या यांना मोहन भागवत किंवा शहा आवर घालू शकत नाहीत. योगी फक्त पन्नास वर्षाचे आहेत किंवा थोडे जास्त. पण ते अतिशय आक्रमक आहेत. ते संघाचे नाहीत व राम भक्त पण नाहीत. नाथ पंथी लोक नाथांना सोडून कोणत्या देवाला मानत नाहीत. कोणतेही कर्मकांड करत नाहीत, अशा पंथाचा हा तरुण नेता स्वतः च्या संघटनेतून पुढे आला आहे. त्याला धर्माचे पांघरून आहेच. पण ते संघाच्या पठडीतील नक्की नाहीत.

योगी आदित्यनाथ ज्या पद्धतीने कामकाज करत आहेत. त्यामुळे अतिशय आक्रमक मुस्लिम द्वेष पसरेल, अशा घटना घडत आहेत. माफिया फक्त मुस्लिम आहेत, असे नाही. पूर्वांचलमध्ये अनेक हिंदू माफिया आहेत, अशा ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी स्वतः चा वरचष्मा निर्माण केला. तिथे धार्मिक आधार त्यांना आहेच. पण ते हिंदू आयकॉन म्हणूनच पुढे आले आहेत. इथे एक गोष्ट महत्वाची आहे. गोदी मीडियातून पसरवलेला टोकाचा कट्ट्ररवाद आक्रमक आहे. त्यांच्या भावना सारासार विचार व विवेक हरवून बसल्या आहेत. त्या गोजारणे मोदी व शहा यांच्या अवाक्या बाहेर जाईल. तेव्हा हे कट्ट्रवादी विवेकशून्य लोक नवीन नेता म्हणून योगी आदित्यनाथला पसंती देतील. सध्या देऊ लागले आहेत. संघाने साध्वी ऋतुंभरा सारख्या अनेक डोईजड होत चाललेले लोक खड्यासारखे बाजूला काढले. मग ते प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल ,गिरीराज किशोर, संजय जोशी गोविंदाचार्य असे खूप मोठी यादी होईल. पण हे सर्व संघाचे लोक होते. योगी आदित्यनाथ संघाचे नाहीत. त्यांची स्वतंत्र शैली आहे. संघ नेहमी कोणीही असो त्याला आपला शिक्का मारतो व जवळ घेऊन संपवतो. पण हे प्रकरण थोड वेगळं आहे. मोदींचे वाढते वय दीर्घ कारकीर्द ही या भक्तांच्या आक्रमक पणाला पुरणार नाही. त्यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरु झाले आहेत. लोक आदित्यनाथ यांना आपला नेता मानतील तशी प्रतिमा तयार केली जात आहे. थेट भगवा घातलेला आरपारची भाषा करणारा हा राजपूत नेता त्यांना जास्त जवळचा वाटू लागला आहे. एकूणच आता या वर्गाचा फोकस मोदीकडून आदित्यनाथ यांच्याकडे वळत आहे. हे भारताच्या भविष्याला कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. अनियंत्रित नेता व अनियंत्रीत फौज फारच विध्वंसक ठरू शकते. याला संघ, मोदी शहा काहीही करू शकणार नाहीत. पण योगी हे कट्टर हिंदूत्ववादी झुंडीचे आयकॉन म्हणून पुढे येत आहेत.

Updated : 19 April 2023 5:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top