Role of Writers in Democracy : साहित्यिकांनो, लोकशाहीचा पाचवा खांब व्हा!
आपल्या लोकशाहीच्या चारही स्तंभांची स्थिती पाहता भारतीय लोकशाही टिकवण्याची जबाबदारी कोण घेईल? नव्या परिस्थितीतील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी साहित्यिकांनी पाचवा स्तंभ बनून कार्य केलं पाहिजे. कशा पद्धतीने काम केलं पाहिजे सांगताहेत किसानपुत्र आंदोलनाचे सर्वेसर्वा अमर हबीब
X
Mahatma Jyotiba Phule महात्मा जोतिबा फुले यांनी 1885 साली दुसऱ्या साहित्य संमेलनात भाग घेण्यास नकार दिला होता, कारण त्या संमेलनात मानवी हक्कांचा विचार केला जात नव्हता. त्यांनी एका पत्राद्वारे हे स्पष्ट केले होते. म. फुलेंनी संमेलनाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, ‘तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित human rights होईल याचे बीज नाही.' म. फुले यांचे पत्रातील वाक्य पुढील प्रमाणे होते-
‘... ज्या गृहस्थाकडून एकंदर सर्व मनुष्याच्या मानवी हक्काविषयी वास्तविक विचार केला जाऊन ज्यांचे त्यांस ते हक्क त्यांच्याने खुशीने व उघडपणे देववत नाहीत व चालू वर्तनावरून अनुमान केले असता पुढेही देववणार नाहीत, तसल्या लोकांनी उपस्थित केलेल्या सभांनी व त्यांनी केलेल्या पुस्तकांतील भावार्थांशी आमच्या सभांचा व पुस्तकांचा मेळ मिळत नाही.'
महात्मा फुले यांनी त्या वेळेस जे बजावले होते, ते फार महत्वाचे होते. एवढेच नव्हे तर साहित्य चळवळ कोणत्या दिशेने जायला हवी; याचे त्यांनी सुतोवाच केले होते.
हा विषय 1885 सालचा आहे. त्यावेळी महात्मा फुले यांची भूमिका रास्त आणि सडेतोड होती. त्यानंतर 1947 ला देश स्वतंत्र झाला. नागरिकांच्या स्वातंत्र्याची हमी देणारे संविधान आले. सर्व जाती धर्मांना शिक्षणाचे द्वारे खुली झाली. मुली मोठ्या प्रमाणात शिकू लागल्या. 1980 पासून संगणकाचे नवे तंत्रज्ञान आले. छपाई स्वस्त आणि मुबलक झाली. या काळात दलित साहित्य उदयाला आले. स्त्री साहित्य आले, ग्रामीण साहित्य आले. एके काळी साहित्य मूठभर लोकांच्या हातात होते, धर्मग्रंथ किंवा धर्मग्रंथांवर भाष्य ही त्याकाळी साहित्याची मर्यादा होती. ती मर्यादा आता संपुष्टात आली आहे. वेगवेगळ्या विषयांवर लोक लिहू लागले आहेत. बदललेल्या नव्या जगात समस्या नाहीत असे नाही; पण 1885 आणि 2025 मध्ये खूप मोठा फरक पडला आहे. आज साहित्य चळवळीत कोणता समाज नाही? सगळे आले आहेत. कोणासाठी दार बंद केलेले नाही. उगमस्थानी जे पाणी नदीत असते तेवढेच घेऊन ती नदी जात नाही. रस्त्यात अनेक उपनद्या तिला येऊन मिळतात. पात्र विस्तीर्ण होते. उगमस्थानी असलेले पाणी नदीत कोठे आहे हे ओळखता येत नाही. बदलेल्या परिस्थितीत आपण नवा विचार करायला हवा. साहित्याची ही सरिता खळाळती रहावी. तुम्ही तुमच्या साहित्य संमेलनाला सिंदफणा हे सार्थक नाव दिले आहे. साहित्याच्या गंगेत जाऊन ती मिळणार आहे. अशी आपण अपेक्षा करू.
पाचवा_खांब fifth pillar
नव्या परिस्थितीतील आव्हान कोणते आहे, हे समजून घेण्यासाठी परिस्थिती समजावून घ्यावी लागेल. आपल्या लोकशाहीचे चार खांब आहेत असे सांगितले जाते. कायदे मंडळ (संसद), कार्यकारी मंडळ,(प्रशासन), न्याय मंडळ (न्यायालये) आणि पत्रकार (मीडिया) असे चार स्तंभ मानले जातात. संविधानात पहिल्या तीनचा उल्लेख आहे. पण जाणकार चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेचा उल्लेख करतात. legislature (Parliament), executive (administration), judiciary (courts), and journalists (media)
कायदे मंडळाची काय अवस्था आहे? संसद आणि विधानसभांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी आपल्या लक्षात येते की, त्यात गुन्हेगारांचा भरणा अधिक झाला आहे. गंभीरपणे त्याग, सेवा, समर्पण भावनेने कोणी आमदार किंवा खासदार झालेला दिसत नाही. ‘राजकारण हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान असते' अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याची साक्ष पटते. निवडणुका ह्या सामान्य माणसाच्या आवाक्यात राहिल्या नाहीत. निवडून येण्यासाठी अमाप पैसा खर्च केला जातो. जाती धर्माच्या झुंडी खेळवणारे लोक या खेळात पुढे जातात. निवडून येण्यासाठी सत्ताधारी पक्ष विविध संवैधानिक संस्थाचा गैरवापर करू लागले आहेत. तसेच लाडकी बहिण सारख्या योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर सरकारी तिजोरीतील पैसे वाटले जात आहेत. कायदे मंडळ हे आता ‘कायदे मंडळ' राहिले नाही. त्याचे रुपांतर ‘योजना मंडळा'त झाले आहे. विधानसभा असो की लोकसभा येथे फक्त योजना तयार केल्या जातात. कायद्याचा जो काही विचार होतो, तो समाजाचे, देशाचे भले करण्याऐवजी राजकारणाची सोय बघण्यासाठी केला जातो. विकासाच्या नावाखाली अब्जावधी रुपयांची लूट केली जाते. एकंदरीत पहिला खांब भुईसपाट झाला आहे.
दुसरा खांब कार्यकारी मंडळ अर्थात कार्य पालिका आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे सरकारी अधिकारी. आमची नोकरशाही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. सरकारी कचेरीत हजर राहण्याचा त्यांना वारेमाप पगार मिळतो आणि कायदेशीर किंवा बेकायदेशीर काम करण्याचे त्याना वेगळे पैसे द्यावे लागतात. बेकायदेशीर काम करण्यासाठीच ते लाच घेतात असे नाही, तर कायदेशीर काम करण्यासाठी सुद्धा पैसे खातात. भरपूर पगार, काम कमी, नोकरीला कायद्याचे संरक्षण, कोणतेही मूल्यमापन नाही. जनते प्रती उत्तरदायित्व नाही. यामुळे भारताची नोकरशाही मातलेल्या पांढऱ्या हत्ती सारखी झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेची बांधिलकी संविधानाला असली पाहिजे. कायद्याप्रमाणे त्यांनी काम केले पहिजे असे अपेक्षित आहे पण आज सरकारी यंत्रणा सत्ताधाऱ्यांची बटीक बदली आहे. अशा प्रकारे लोकशाहीचा दुसरा खांब देखील ध्वस्त झाला आहे.
तिसरा खांब न्याय मंडळ आहे. न्याय मंडळ म्हणजे न्यायालये. खालच्या न्यायालयांबद्द्ल सोडून द्या. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांची काय अवस्था आहे? पहिली घटना दुरुस्ती 18 जून 1951 ला झाली. अनुच्छेद 31 ए व बी मध्ये बदल करून संविधानाला परिशिष्ट नऊ जोडण्यात आले. या परिशिष्टात टाकलेले कायदे (भले ते मुलभूत हक्कांचे उलंघन करीत असले तरी) त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली. संविधानातील या घटना दुरुस्तीला पुढे मान्यता देण्यात आली. ही मान्यता खुद्द सर्वोच्च न्यायालयाने दिली. अनुच्छेद 32 हे न्यायालयांना असलेल्या अधिकारांचे आहे. अनुच्छेद 31 मध्ये बदल करून न्यायालयांना सीमित करण्यात आले. न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. लाखो लोक निकालाची वाट पहात तुरुंगात सडत आहेत.
अमेरिकेत न्यायाधीश निवृत्त झाला तरी पूर्ण पगार दिला जातो. पण त्यांना कोणत्याही सरकारी पदावर जाता येणार नाही, असा तेथे कायदा आहे. आमच्याकडे नेमके उलटे आहे. सरकारच्या बाजूने निकाल दिलेल्या अनेक न्यायाधीशांना ते निवृत्त झाल्यानंतर सरकारी पदे दिली जातात. कोणाला राज्यपाल केले. कोणाला राजदूत केले, कोणी खासदार झाला तर कोणी कोणत्या कमिशनचा अध्यक्ष झाला. निवृत्तीनंतर सरकार सोय करणार असेल तर सरकारच्या बाजूने निकाल लागत राहतील. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढलेले दिसते. न्यायमूर्ती भूषण गवई सारखा एखादा अपवाद असतो. जो स्वत: म्हणतो, मी कोणतेही सरकारी पद घेणार नाही. म्हणूनच त्यांच्या निकालात एक वेगळी धार दिसून येते. न्यायपालिका निष्पक्ष असायला हवी. ती जर पक्षपाती झाली तर कठीण परिस्थिती निर्माण होते आणि ती जर सरकारच्या बाजूने कलू लागली तर मोठा अनर्थ होतो. आज नेमकी अनर्थाची परिस्थिती निर्माण झाली आहे. न्या. भूषण गवई सारख्या लोकांनी किंचित आशेची धुकधुकी ठेवली आहे एवढेच.
चौथा खांब पत्रकारितेचा मानला जातो. त्याबद्दल बोलण्यासारखे आता काही शिल्लक राहिलेले नाही. लोकशाही देशाचा पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाही. खाजगी वृत्तसंस्था ह्या सरकारी वृत्तसंस्थांपेक्षा जास्त प्रचारकी झाल्या आहेत. युद्धासारख्या नाजूक क्षणी देखील क्रिकेट मॅच सारख्या बेजबाबदार बातम्या दिल्या जातात. स्वातंत्र्य आंदोलनाच्या गर्भातून जन्माला आलेली भारतीय पत्रकारिता एवढी सत्तेला कधीच शरण गेली नव्हती. सामान्य माणसांच्या वेदनाना आवाज देण्याची जबाबदारी जणू आजची पत्रकारिता विसरून गेली आहे. एकंदरीत भारतीय लोकशाहीचा चौथा खांब आडवा झाला आहे.
या परिस्थितीत भारतीय लोकशाही टिकवण्याची जबाबदारी कोण घेईल? असा खरा प्रश्न आहे. त्यासाठी पाचव्या खांबाला पुढे यावे लागेल. पाचवा खांब साहित्यिकांचा आहे. साहित्यिकांनी इतिहासात मोठी लखलखती जबाबदारी पार पाडली आहे. स्वातंत्र्य आंदोलनात रवीन्द्रनाथ ठाकूर, नजरूल इस्लाम, साने गुरुजी यांच्या सारखी देशभरच्या अनेक साहित्यिकांची नावे घेता येतील. आजही अनेक साहित्यिक सत्तेच्या विरुद्ध लेखणी घेऊन उभे राहिलेले दिसतात. नुकतेच वारलेले राहत इंदौरी आणि मुनव्वर राणा ही दोन नावे सर्वाना माहित आहेत. हिंदीचे प्रसिद्ध व्यंगकार संपत सरल, भोजपुरी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री नेहासिंग ठाकूर आज तीच कामगिरी बजावत आहेत. रवींद्रनाथ टागोर, सानेगुरुजी, शाहीर अमर शेख यांनी परंपरा ते चालवीत आहेत. आज वैयक्तिक रित्या हे काम सुरु झाले आहे. ते साहित्यिक चळवळ म्हणून पुढे यायला हवे.
आपण मराठवाडा साहित्य परिषदेचे आहोत. या परिषदेचा इतिहास पहा. मसापने घालून दिलेल्या आदर्शला उजाळा द्यावा लागेल. निजाम काळात मसापने स्वातंत्र्यासाठी मोठे काम केले होते. तीच वेळ पुन्हा आली आहे. ही वेळ लोकशाही म्हणजेच आपला देश वाचविण्यासाठी पाचवा खांब म्हणून पुढे येण्याची आहे, असे मला वाटते.
पाचवा खांब होण्यासाठी काय करावे लागेल? लोकांना जागे करावे लागेल. हीच साहित्य चळवळीची भूमिका असू शकते. लोकजागरणासाठी अशी छोटी संमेलने भरली पाहिजेत. मी मोठ्या संमेलनांचा विरोधक नाही. या काळात तर ते जास्त गरजेचे आहेच; पण आपली दुबळी बाजू स्थानिक संमेलनांची आहे. प्रत्येक तालुक्यात दोन चार साहित्य संमेलने होऊ शकतात अशी आज परिस्थिती आहे. नवनवे लेखक आणि कवी पुढे येत आहेत. त्यातील कित्येक जण हे 1980 नंतर जन्माला आले आहेत. त्यांचे बालपण अगदी वेगळ्या परिस्थितीत गेले आहे. त्यांना नव्या तंत्रज्ञानाचा लाभ मिळतो आहे, ते आपला आवाज जगात पोचवू शकतात. या नवीन साहित्यिकांना नव्या पद्धतीची छोटी-छोटी साहित्य संमेलने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिरूरच्या या सातव्या सिंदफणा साहित्य संमेलनात अशी संमेलने करण्याचा आपण संकप करूया.
शब्दांचे_गौडबंगाल
भावानों आणि बहिणीनों,
शेतकरी, स्त्री आणि साहित्यिक यांनी एकत्र यायचे म्हणजे काय करायचे? असा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाला असेल. हे साहित्य संमेलन असल्यामुळे साहित्यिकांनी काय करायचे या विषयी मी बोलणार आहे. शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांनी काय करायचे ते सांगेन तसेच महिला मेळाव्यात महिलांनी काय करावे हे स्पष्ट करीन. साहित्यिक मंडळी शब्दांशी खेळतात. नेमके शेतकरी आणि स्त्रियांविषयी चुकीचे शब्द वापरले जातात. जाणीवपूर्वक वापरले जातात तसेच अजाणतेपणी देखील वापरले जातात. जाणतेपणी जे वापरतात त्यांचा वेगळा बंदोबस्त करावा लागेल पण अजाणतेपणी जे वापरतात त्यांना समजावून सांगावे लागेल.
शब्दांचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण म. गांधी यांच्याशी संबंधित आहे. महात्मा गांधींचा वध झाला की खून झाला? वध आणि खून हे दोन शब्द सारखे दिसत असले तरी ते समानार्थी नाहीत. त्यांच्यात जमीन आस्मानचा फरक आहे. घरावर दरोडा पडला. दरोडेखोराने घरमालकाचा खून केला, असे आपण म्हणतो. घरमालकाचा वध केला असे म्हणत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा एखादा गुन्हेगार हत्या करतो, तेव्हा त्याला खून केला असे म्हटले जाते. वध हा शब्द पुराणात अनेकदा आला आहे. देवाने राक्षसाचा वध केला, असे म्हटले जाते. वध राक्षसाचा होतो आणि कोण करतो? देव करतो. आपण जेंव्हा गांधीजींचा वध झाला असे म्हणतो तेंव्हा, गांधीजी राक्षस होते आणि मारणारा नथुराम गोडसे देव होता असा त्याचा अर्थ निघतो. हाच अर्थ निघावा म्हणून वध हा शब्द जाणीवपूर्वक योजला गेला असावा. ज्या काही लोकांना गांधीजी राक्षस वाटायचे व नथुराम गोडसे देव वाटायचा. त्यांनीच जाणीवपूर्वक हा शब्द प्रचारात आणला. आपण गांधीजींच्या बाजूने आहोत की गोडसेच्या बाजूने आहोत, हे ठरवा आणि योग्य शब्द निवडा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही शब्दांचा खेळ झाला आहे. शेतकरी आणि स्त्रियांच्या बाबतीत असे प्रकार केले जातात. ते साहित्यिकांनी डोळसपणे पाहावेत आपल्या लिखाणात दुरुस्ती करून योग्य शब्द लोकांपर्यंत पोचवावा. अशी माझी अपेक्षा आहे.
शेतकरी हा शब्द बराच रुळलेला आहे. पण या शब्दाची व्याख्या आपण कधी समजावून घेतली आहे का? माझे प्राध्यापक मित्र म्हणाले, ‘आमचे काय? आम्ही शेतकरी माणसं.' मी म्हणालो, ‘तुम्ही कसे शेतकरी?'ते म्हणाले, ‘आमचे बापजादे शेतकरी होते. वंशपरंपरेने दोन एकर शेती माझ्या वाट्याला आली. नोकरीवर लागल्यावर चार एकर लगतची जमीन मी विकत घेतली. सहा एकर शेतीचा मी मालक आहे.' न राहून मी विचारले. ‘शेतीत कमाई किती होते का हो?.' ते म्हणाले, ‘कमाई कसली होते. पगारातून टाकावे लागतात.' तरी हे शेतकरी! शेतीतून कमाई होत नाही हे खरे असले तरी ह्यांनी चार एकर शेती का घेतली असावी. माझा मित्र प्राध्यापक आहे. नोकरी हे त्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. शेती त्याच्याकडे आहे पण ते त्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नाही.
आजा शेती करत होता, बाप शेती करत होता म्हणून पोरगा आपोआप शेतकरी होत नाही. पोरगा शिकला. डॉक्टर झाला. तर तो शेतकरी म्हणून ओळखला जाणार नाही. तो डॉक्टर म्हणून ओळखला जाईल. शेतकरी ही जात नाही की ती जन्माने मिळेल. बाप आमक्या जातीचा म्हणून पोरगा त्याच जातीचा असे शेतीक्षेत्रात होत नाही कारण शेती हा व्यवसाय आहे. जात नाही. सात-बारा म्हणजे मालकी. सात-बारा असणारी व्यक्ती शेतमालक असते. ती शेतकरी असेलच असे नाही. अनेक पुढाऱ्यांकडे सुद्धा सात-बारा असतो. ते शेतकरी म्हणायचे का? फिल्मस्टार लोकांकडे सात बारा असतो. त्यांना कोणी शेतकरी म्हणत नाही. मग प्राध्यापक, डॉक्टर, वकील, बिल्डर, सरकारी नोकर इत्यादी हे कसे शेतकरी असतील?
काही लोक म्हणतात, जो प्रत्यक्ष शेतात कष्ट करतो, त्याला शेतकरी म्हणावे. हा निकष आपण कारखानदारीत लावून पहा. अंबानीला कारखानदार म्हटले जाते. तो कारखान्यात काम करतो का? तो प्रत्यक्ष काम न करता कारखानदार म्हटला जातो, तर शेतकऱ्याला कष्टाची अट का बरे? जो निकष तुम्ही कारखानदारीला लावता तोच निकष शेतीला लावायला हवा. म्हणून कष्टाची अट टाकणारा निकष चुकीचाच आहे.
वंश परंपरेने माणूस शेतकरी होत नाही, सातबारा असणे पुरेसे नाही, कष्ट करणे आवश्यक नाही मग शेतकरी कोणाला म्हणायचे? शेतकरी या शब्दाची व्याख्या खूप सोपी आहे. ‘ज्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे, तो शेतकरी' तुम्ही शेतात कष्ट करा अथवा करू नका, तुम्ही शेतीचे मालक असा अथवा नसा, तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्मा अथवा नका जन्मू. तुमचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती असेल तर तुम्ही शेतकरी आहात.
हल्ली शेतीवरची अनुदाने लाटण्यात सर्वात पुढे आहेत हे बिगर शेतकरी. कोणी पुढारी असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी सरकारी पगारदार असेल, कोणी बेकायदा लुट-लपट करणारा असेल, असेच सगळे शेतीवरची अनुदाने लाटत आहेत. वेगवेगळ्या योजनांचे लाभ उपटत आहेत. जो शेतीवर अवलंबून आहे, तो सगळ्यात शेवटी राहतो. जो सगळ्यात शेवटी राहतो, त्याच्या सोबत आपण जाऊया. त्याचा आवाज बुलंद करूया. यासाठी शेतकरी हा शब्द नीट समजावून घेणे आवश्यक आहे.
कर्जमाफी असा शब्द सरसकट वापरला जातो. कर्ज ठीक आहे पण माफी काय आहे? माफी कोणाला असते. जो चूक करतो किंवा गुन्हा करतो त्याला माफी दिली जाते. चालताना कोणाला आपला पाय लागला तर आपण म्हणतो माफ करा. म्हणजे माझी चूक झाली आहे. मला माफ करा. तुरुंगातील कैद्यांची चांगली वागणूक पाहून त्यांना शिक्षेत माफी दिली जाते. कैदी गुन्हेगार आहे. त्याला दिलेल्या शिक्षेत सूट दिली जाते तेंव्हा माफी असा शब्द वापरला जातो. मला सांगा, शेतकऱ्याने असा कोणता गुन्हा केला की त्याला तुम्ही माफी देत आहात? तो थकबाकीत गेला, त्याला तो जबाबदार आहे की सरकार? तुम्ही सीलिंग सारखा कायदा राबवणार की त्याची होल्डिंग लहान व्हावी, त्याला काही केल्या शेती परवडूच नये, आवश्यक वस्तू कायदा आणला. कायदे करून तुम्हीच अशी व्यवस्था आणली. तुम्ही अशी धोरणे राबवली की त्याच्या मालाला योग्य भाव कधी मिळूच नये. त्याच्याकडे बचत शिल्लक राहणार नाही याचा सगळा बंदोबस्त तुम्ही केलेला. आणि तुम्हीच परत त्याला दोषी ठरविणार, हे चुकीचे आहे.
कर्जमाफी हा शब्द चुकीचा आहे त्या ऐवजी कर्ज-बेबाकी हा शब्द योग्य ठरेल. हा पर्यायी शब्द उपलब्ध आहे. याकडे साहित्यिकांनी लक्ष वेधले पाहिजे.
असाच एक शब्द आहे आत्महत्या. आत्महत्या शब्दाचा काय अर्थ होतो? आत्म म्हणजे स्वत: आणि हत्या म्हणजे जीव घेणे. ज्या हत्येला दुसरा कोणीही जबाबदार नाही, मरणारा स्वत:च जबाबदार आहे. त्याला आत्महत्या म्हणतात. शेतकऱ्यांना जणू मरणाची हौस आहे, म्हणून ते आत्महत्या करीत आहेत.
एका शेतकऱ्याची मुलगी होती. लग्न करून सासरी गेलेली. सासरी तिला जाच होता. लग्नात ठरलेले 25 हजार रुपये द्यायचे बाकी होते. सासरच्या मंडळींनी तगादा लावलेला. मुलीला मारहाण करायचे. छळ करायचे. मुलगी माहेरी आल्यावर बापाला म्हणाली, ‘बाबा ते पैसे देऊन टाका. मला लई त्रास हाय.' बाप म्हणाला, ‘यंदा कापूस निघाला की पहिले आणून देतो. तेवढे दिवस कळ काढ बाई.' कापशीवर कीड पडली. सरकारी आयातीमुळे भाव पडले. बाप पैसे पाठवू शकला नाही. मुलगी रिकाम्या हाताने आलेली पाहून सासरची मंडळी खवळली. पुन्हा जाच. घरात कोणी नाही अशी वेळ साधून मुलीने रॉकेलचा डबा उचलला. अंगावर ओतून घेतला. स्वत: काडीची पेटी हातात घेतली. स्वत: पेटवली. साडीला लावली. आगीचा भडका झाला. दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली. ‘अजून एक हुंडाबळी!' मुलीची आत्महत्या असे कोणी म्हटले नाही.
बाप परेशान होता. मोठ्या मुलीने जीव दिलेला. धाकटी मोठी झाली आहे. गावाचे लोक बोलू लागले आहेत. बायको आजारी. तिच्या कडेवर लेकरू. देणेदारांचा तकादा सुरु आहे. पुढचे वर्ष कसे जाईल. त्याच्या डोक्यात सुनामी सुरु झाली. डोके भणाणून गेले. तो उठला. रानात गेला. एका बाभळीला दोर बांधली आणि लटकवून घेतले. दुसऱ्या दिवशी बातमी आली- शेतकऱ्याची आणखी एक आत्महत्या! येथे सरकार बळी असे कोणी म्हटले नाही. मुलगी मरते तेव्हा, सासरकडे बोट. बाप मारतो तेव्हा तोच दोषी. हा फरक का? सासरकडे बोट दाखवणे सोपे असते. सरकारकडे बोट दाखवायला हिंमत लागते. शेतकऱ्यांच्या मृत्यूला थेट सरकारच जबाबदार असताना ‘आत्महत्या' म्हणणे फसवेगिरी आहे. मला वाटते, शेतकरी आत्महत्या दुसरे काहीही नसून सरकारने केलेले खून आहेत. पण चालाख लोकांनी त्याला आत्महत्या म्हटले. तोच शब्द प्रचलित झाला. मला वाटते साहित्यिक मंडळी याचा खुलासा करतील.
खूप गोष्टी सांगता येतील पण एक उदाहरण स्त्रियांच्या बाबतीत पाहून घेऊ. सामान्यपणे लोक माय-बहिणीवरून शिव्या देतात. त्या माय-बहिणींचा तुमच्या भांडणात काय संबंध आहे? त्यांच्या नावांनी किमान शिव्या तरी देऊ नका, स्त्रियांचा हा अपमान थांबला पाहिजे. हे सांगावे लागेल. आपल्या लेकरांना सांगावे लागेल. साहित्यिक महिलांनी यात आक्रमक पुढाकार घेतला पाहिजे. स्त्रियांच्या चळवळीने भाषेच्या पुरुष प्रधानतेच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचाही आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ राष्ट्रपती हा शब्द. त्या पदावर महिला बसली तरी सर्रास राष्ट्रपती शब्द वापरतात. अरे, राष्ट्रप्रमुख म्हणाना. शब्द उपलब्ध असताना तुम्ही जर चुकीचा शब्द वापरत असाल तर तो स्त्रियांचा अपमान समजाला पाहिजे असे मला वाटते. कोणी चुकीचा शब्द अनावधानाने उच्चारला तर त्याला टोकले पाहिजे.
सर्जकांचे_स्वातंत्र्य
शेतकरी, स्त्री, साहित्यिक हे सर्जक आहेत. कारखानदार वस्तू निर्माण करतात. ती वस्तू वापरता येते पण ती वस्तू नव्या वस्तूला जन्म देऊ शकत नाही. शेतकरी एक दाणा पेरतो. शंभर दाणे निर्माण होतात. ते शंभर दाणे पेरले तर लाखो दाणे निर्माण होतात. एका दाण्यातून लाखो दाणे निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे सर्जन. स्त्रिया देखील सर्जक घटक आहे. तसेच साहित्यिक देखील शब्दांच्या अशा माळा गुंफतात ज्यातून नवा अर्थ निर्माण होतो. तो अर्थ पुन्हा नव्या माळा गुंफायला कारण ठरतो. म्हणून साहित्यिक देखील सर्जक आहेत. शेतकरी, स्त्री, कलावंत, शास्त्रज्ञ हे सगळे सर्जक आहेत. याच घटकांचे बांडगुळ भक्षक शोषण करतात. सर्जक संकटात आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. स्त्रियांची भ्रूणहत्या होत आहे. साहित्यिकांची मुस्कटदाबी होतेय. शास्त्रज्ञ एका कोपऱ्यात उभे असलेले दिसतात. या उलट जे काहीच निर्माण करीत नाहीत असे राजकारणी, कर्मचारी, नंबर दोनचे व्यावसायिक मजेत दिसतात. यांची मजा सर्जकांच्या जिवावर होत असते. माणसांचा इतिहास हा सर्जकांच्या शोषणाचा इतिहास आहे.
काही लोक जाती संघर्षाला महत्व देतात. त्यांचे म्हणणे ब्राह्मणांनी शूद्रांचे शोषण केले. ते असे म्हणत नाहीत की, ब्राह्मण त्या काळी बांडगुळ होते आणि शूद्र सर्जक होते. बांडगुळानी सर्जकांचे शोषण केले. कारण आज त्या सर्जकांपैकी काही जण बांडगुळ झाले आहेत. असे बांडगुळ दलितांना चिथावतात व बांडगुळी व्यवस्थेचा जास्तीजास्त लाभ उपटतात. जसा जात संघर्ष खोटा तसाच वर्ग संघर्षही खोटाच आहे. मुळातच शेतीच्या लुटीवर औद्योगिक व्यवस्था उभी राहिली. भांडवलदार मालक असो की ट्रेड युनियनचे कामगार असो. या दोघांचे हितसंबंध कच्चामालाचे उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वस्त दारात माल घेणे हाच असतो. कामगारांना पगार वाढवून हवा असतो आणि कारखानदाराला नफा. शेतकऱ्यांचे शोषण करूनच ही व्यवस्था पुष्ट झाली आहे.
जात संघर्ष किंवा वर्ग संघर्ष यांच्या पुढे जाऊन सर्जकांच्या मुक्तीचा साहित्यिकांनी विचार केला पाहिजे. सर्जकांना नेमके काय हवे असते? सर्जकांना फक्त स्वातंत्र्य हवे असते. कारण सर्जकांना गुलाम केलेले असते. पिंजऱ्यातील पक्ष्याला विचारले की तुला काय हवे? तर तो उत्तर देईल. दार उघडा. बांडगुळ आणि सर्जकांच्या मागणीत हाच एक फरक आहे. बांडगुळांच्या हजार मागण्या असू शकतात. सर्जकांची एकच मागणी असते ती स्वातंत्र्याची.
साहित्यिकांनी आपल्या स्वातंत्र्याबद्दल जागरूक राहिले पाहिजे. आज साहित्यिकांसाठी अत्यंत बिकट काळ आहे. कारण एवढी मुस्कटदाबी या पूर्वी कधी झाली नव्हती. तुम्ही सत्तेच्या विरोधात जाईल असे काही बोललात तर पोलीस तुम्हाला पकडून नेऊ शकते. त्याही अगोदर झुंडी तुमच्यावर हल्ला करू शकतात. या संदर्भातली माझी ही कविता पहा.
मनातून उचंबळलेले शब्द
ओठांची तटबंदी ओलांडायला धजत नाहीत.
खोप्यातील चिमणे पक्षी थिजतात तसे
मेंदूच्या ढगातून कोसळणारे
शब्दबिंदू विरतात
मनाच्या आकाशात..
मी भीत नाही माझ्या मरणाला.
ते मला एकट्याला लक्ष्य करीत नाहीत.
ते आता बाणाने नेम धरून मारीत नाहीत.
जाळून टाकतात
अक्खे झाड.
झाडाच्या फांद्या,
फांद्या वरची पाने,
कळ्या, फुले, पाकळ्या, फळ
आणि हो,
गर्भार बी सुद्धा जाळून टाकतात..
म्हणूनच
उचंबळलेले शब्द
ओठांची तटबंदी ओलांडायला
धजत नाहीत.
लेखक, कवी, नाटककार, विचारवंत तुम्ही काहीही असलात तरी तुमची पहिली गरज स्वातंत्र्य आहे. मान सन्मान, प्रतिष्ठा, पुरस्कार, सरकारी समिती किंवा पैसा या सर्वांच्या आधी स्वातंत्र्य असावे लागते. स्वातंत्र्याला नख लागत असेल तर गप्प बसू नका. एवढी विनंती करून थांबतो.
अमर हबीब,
आंबाजोगाई
मो. 8411909909
(16 व 17 डिसेंबर 2025 रोजी शिरूर कासार येथे झालेल्या सातव्या सिंदफणा मराठी साहित्य संमेलनातील अमर हबीब यांच्या अध्यक्षीय भाषणातून)






