Home > News Update > तिसरे महायुद्ध आणि भारतीय माध्यमांची भूमिका

तिसरे महायुद्ध आणि भारतीय माध्यमांची भूमिका

तिसरे महायुद्ध आणि भारतीय माध्यमांची भूमिका
X

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना, चीनच्या वुहान शहरातून या जीवघेण्या विषाणूची उत्पत्ती झाली आणि हा जगभरात पसरला असला तरी, चीनने या विषाणू आणि त्याच्या संक्रमणावर चांगलेच नियंत्रण मिळवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. चीनच्या या विषाणूमुळे जगभरातील कोरोना संक्रमित व्यक्ती आणि त्यांची संख्या, मृत्यूदर तर दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना जागतिक आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा, समाज माध्यमांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. लॉकडाऊन हा या विषाणूचे संक्रमण रोखण्याचा, नियंत्रणाचा पुरेपूर उपाय नसला तरी याची योग्य अंमलबजावणी केली तरी यावर यश मिळवता येऊ शकते. असे क्युबा, व्हिएतनाम, जापान या सारख्या लहान देशांनी सिद्ध केले आहे. एकूणच या विषाणूची उत्पत्ती आणि प्रसार या नंतर चीनची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे.

कदाचित आंतराराष्ट्रीय समुदाय दबाव आणि व्यापारी संबंध यामुळे चीनला आपल्या भूमिका स्पष्ट करता येत नसाव्यात, त्यात करोना विषाणूमुळे इटली, स्पेन पाठोपाठ सर्वात जास्त संक्रमण अमेरिकेसारख्या महाशक्ती असणाऱ्या देशात वाढले आणि सर्वात जास्त मनुष्यहानी देखील इथे झाली. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांसमोर या विषाणूला 'चायनीज वायरस' असे संबोधन करून चीनच्या भूमिकेविषयीच्या वादाला तोंड फोडले तर एका बाजूला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावर नाराजी व्यक्त केली. "कोल्ड ब्ल्डेड वॉर" अशी या विषाणूची अमेरिकन माध्यमांनी संज्ञा सर्व जगात पसरवली. सध्या या विषाणूमुळे जगात जनसामान्यांच्या मृत्यूचे ढिगारे पडत असताना त्या आडून जागतिक राजकारण भविष्यात वेगळी वळणे घेणार यात शंका नाही.

२०२० वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या दावोस परिषदेचा दाखला देताना अमेरिका आणि चीन यांनी व्यापारी संबंध वाढविण्यासाठी कराराच्या दुसऱ्या महत्वाच्या टप्प्यात चर्चा वाढविण्यासोबत या करारांवर सकारात्मकता दाखविली गेली होती. हे सर्व अमेरिकेतील आर्थिक मंदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे महाभियोगाचा सामना अमेरिकेत करत असताना घडत होते. जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिकेची होणारी वाढती घसरण याला उपाय जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीन बरोबरचे व्यापारी संबंध वाढले गेल्यास अमेरिकेला या संकटाना तोंड देता येणे शक्य होईल. अशा वेळी चीनच्या अध्यक्ष शी जिनपिंग शी डोनाल्ड ट्रम्प यांचे मैत्रीचे संबंध आणि या संबंधांचा राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोण कसा वापर करेल? हे आताच सांगता येणार नाही.

जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला साम्यवादी चीन "समाजवादी बाजार व्यवस्था" स्वीकारून खाजगी भांडवलशाही आणि अधिकारवाद राजकीय नियंत्रणाखाली ठेवून अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था चालवित आहे. त्यामुळे शी जिनपिंग किंवा डोनाल्ड ट्रम्प यापैकी कोणी सूत्रधार असेल तरी या नाटकाचे यश दोघांना मिळणार आहे. हे भविष्यात दिसून येईलच.

बीजिंगमध्ये झालेल्या १५ देशांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी चीनकडे होते, चीन करोनाच्या या संकाटासंदर्भात परिषदेत चर्चा करण्यास तयार नव्हता. कोरोना विषाणू आणि जागतिक संक्रमण या पासून घाबरण्याचे काहीच कारण नाही, हा मुद्दा जागतिक जन आरोग्य विषय आहे. जेव्हा सुरक्षा परिषदेची प्राथमिक जबाबदारी भू राजनीतिक सुरक्षा आणि शांती विषयक असते. असे विधान करून चीनने त्यावेळी या विषाणूची उत्पती आणि त्याचे जागतिक परिणाम यांची जबाबदारी झटकलेली होती. यावर अमेरिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. एकूणच जागतिक राजकारणात अनेक देशांना करोना संकट सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे, तिला कापून टाकण्यापेक्षा अनेक देशानी अंडी वाटून घेण्यावर जास्त भर दिला आहे असे चित्र सध्या दिसत आहे.

भविष्यात उद्या करोनाचे संकट दूर होईल, करोनाच्या संकट काळात जी राजकीय व्यवस्था यावर नियंत्रण मिळवेल सत्ता पुन्हा त्यांच्याकडेच जाईल असा एक तर्क आहे, त्यामुळे सर्वात जास्त झळ पोहोचलेली अमेरिका इतक्या मोठ्या संकटातून बाहेर पडेल. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांची विश्वासार्हता वाढलेली असेल, महाभियोग बाजूला पडलेला असेल आणि अमेरिकन जनता सर्व आर्थिक संकट विसरून पुन्हा जोमाने कामाला लागेल. त्यामुळे ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची दावोस मधील व्यापारी संबधांवरची बैठक अनेक बाजूनी, पैलूंनी पाहणे आवश्यक आहे.

अमेरिकन सैन्याने चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरस प्लान्ट केला असल्याचा आरोप चीन कडून झाला आहे. त्यानंतर ट्रम्प त्यांचे चायनीस व्हायरस असे जागतिक नामकरण करून झाल्यानंतर या वादाला तोंड फुटले. सुरुवातीला अमेरिकेला शह देण्यासाठी चीन असे करू शकतो. त्याबरोबर चीनला आर्थिक महासत्ता बनण्याची महत्वाकांक्षा असल्याचे तर्क समोर येत असतानाच ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची मिळून ही खिचडी तरी नाही ना अशी शक्यता ही नाकारता येणार नाही.

अमेरिकन सैन्य चीन जवळच्या बेटांवर वायू आणि नाविक सैन्य जमा करून लष्करी अभ्यास सुरु केला आहे, चीनने अणुचाचणी घेऊन जगाला आव्हान दिले आहे. अशा बातम्या पेरण्यात येऊ लागल्या आहेत. करोनाचे संकट हे मानवनिर्मितच आहे.

याचा उलगडा होईल तेव्हा होईल पण अमेरिकेत ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात कोरोना विषाणू पसरला आहे. हे सुद्धा संशयास्पद नक्कीच आहे. शी जिनपिंग च्या लोकप्रियतेत मागील बारा महिन्यांपासून घट झाली होती. हाँगकाँग मधील आंदोलन, सुस्त अर्थव्यवस्था, तैवान संबंध, चीन अमेरिका संबंध ही यामागची कारणे असू शकतात. राजकीय महत्वाकांक्षा कोणालाच चुकलेली नाही. शी जिनपिंग सुद्धा याला अपवाद नसावेत बहुतेक. सुरुवातीला चीनने करोना विषयक माहिती लपवली असा आरोप देखील झाला, भविष्यात याची पाळेमुळे सापडतील तेव्हा सापडतील तो पर्यंत हमाम मे सब नंगे असेच चित्र सध्या दिसत आहे.

महत्वाकांक्षी ड्रॅगन आणि अमेरिका यांच्या भोवतीच सध्या जग फिरत आहे. या दोघांना जागतिक समुदायावर आपली आर्थिक राजकीय पकड मजबूत करायची आहे त्यामुळे हे दोघे एकमेकांशी लढून आपली शक्ती वाया घालणार नाहीत. कारण, दोघांना ही युद्ध झाल्यास त्याच्या परिणामांची जाणीव आहे असे समजून चालूया. दोन्ही देश आपले आर्थिक संबंध आणखी दृढ करून आपली शक्तीस्थाने आणखी मजबूत करतील आणि त्यांच्या छायेखालच्या देशांना गुलामीत ठेवत आपला शस्त्र व्यापार, बाजारपेठ आणखी वाढवतील.

अमेरिका, अमेरिकन राज्यव्यवस्था यांच्या अधीन होणे म्हणजे एक प्रकारची गुलामी आहे, अमेरिकन व्यवस्था, तिकडच्या निवडणुका, तिकडची संस्कृती / आर्थिक सुबत्ता, राहणीमान यांचे कौतुक अथवा अनुसरण करणे त्याला बुद्धीवाद म्हणता येत नाही. इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराज जसे कळतात. तसा अमेरिका आणि भारत यांचा इतिहास पाहून राजनीतिक निर्णय क्षमता भारताला आत्मसाद करावी लागणार आहे. इतिहास भारताप्रती अमेरिकेची काळी बाजू दाखवतो त्यामुळे भारताला अशा जागतिक संकटात सावध राहणे आवश्यक आहे.

१९७१ मध्ये बांग्लादेशचे युद्ध झाले. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धात ज्या पद्धतीने १९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला होता, तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बंगालच्या उपसागरात अमेरिकेचे लढाऊ जहाज येऊन थांबले होते. अमेरिकेने भारताला इशाराही दिला होता. हेन्री किसिंजर हे जगातील सर्वांत प्रसिद्ध डिप्लोमॅट आहेत. त्यांनी ‘मेमॉयर्स’ नावाने आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

त्यात नमूद करताना किसिंजर यांनी स्पष्ट म्हटले आहे की, त्या वेळी अमेरिका कोलकातावर अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीत होती. पण दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांनी सोव्हिएत रशियाबरोबर सामरिक युतीचा करार केला. या करारामुळे भारताविरोधातील कोणतीही कृती ही आमच्या विरोधात असेल, अशी घोषणा सोव्हिएत रशियाकडून करण्यात आली.

त्यामुळे अप्रत्यक्षपणे अमेरिका - रशिया आमनेसामने आल्याने भारतावरील अणुहल्ला टळला. मात्र, या घटनेने भारताचे डोळे उघडले. आपल्याकडे अणुबॉम्ब असणे किती आवश्यक आहे? याची भारताला जाणीव झाली. कारण भारताकडे अणुबॉम्ब नसल्यानेच अमेरिकेने आपल्यावर अणुबॉम्ब टाकण्याची तयारी केली होती. त्या काळात प्रत्युत्तरादाखल भारताकडे अणुबॉम्ब असता तर दहशतीचा समतोल राहिला असता आणि अमेरिकेची हिंमत झाली नसती. परिणामी, त्या काळात भारताकडे अणुबॉम्ब असला पाहिजे असा विचार रुजू लागला. पण भारताने कोणत्याही देशाविरुद्ध प्रथम आण्विक हल्ला करणार नाही असे जाहीर करत स्वसंरक्षणार्थ शांतीच्या हेतूने अणुचाचणी घेतल्या होत्या.

अणुचाचणी, अणुयुद्ध, अण्वस्त्र स्पर्धा, तिसरे महायुद्ध हे शब्द उच्चारणे जितके सोपे आहे. त्याउलट कितीतरी भयंकर मोठे दीर्घोत्तर परिणाम पिढ्यांपिढ्या सर्व देशाना भोगावे लागतील याची जाणीव जागतिक समुदायाला, माध्यमांना ठेवायला हवी. अणुचाचणी चे परिणाम माहीत असूनही अणुयुद्ध समर्थन करणारी व्यक्ती मानव म्हणून नक्कीच गणली जाणार नाही.

जागतिक शस्त्र सत्तास्पर्धेत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करण्याच्या स्पर्धा, होड मध्ये करोना साऱखे जैविक अस्त्र काय परिणाम घडवू शकते. याची जाणीव सुद्धा ठेवायला हवी. अणुकेंद्रीय स्फोटामुळे आसमंतात निर्माण झालेल्या प्रखर उष्णतेमुळे सर्वत्र आगी लागतात व निर्माण होणाऱ्या दाब-आघात-तरंगामुळे इमारतींची पडझड होते, शहरे नष्ट होतात. याशिवाय या अणुकेंद्रीय विक्रियांच्या वेळी बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गामुळेही जीवसृष्टीस अपाय होतो. अशा वेळी माध्यमांनी तिसरे महायुद्ध, अणुयुद्ध असे शब्द टीआरपी आणि बातम्यांची रंजकता वाढविण्यासाठी वापरणे हे बेजबाबदारीची आहे.

जगाला तिसरे महायुद्ध म्हणजे पृथ्वी २४ वेळा नष्ट करता येईल इतक्या महाभयंकर अणू अस्त्रांनी अण्वस्त्रधारी देश सुसज्ज आहेत याची माहिती असणे देखील आवश्यक आहे, त्यामुळे गंभीर परिणाम माहीत असल्याने सहसा कोणाताही देश या दिशेने जाणार नाही. लोकांच्या भीतिचा वापर राजकीय व्यवस्था कसा करू शकते याचाही तर्क विचार बुद्धीप्रामाण्यवादी जनतेने करायला शिकले पाहिजे आणि इतरांना जागृत करायला शिकवले पाहिजे.

ट्रम्प पुरस्कृत अमेरिकेच्या बेजबाबदार माध्यमांनी तर चीनने विषाणूचे संक्रमण जगात वाढत असताना गोपनीयतेने अणुचाचणी घेतल्याच्या बातम्या पसरवायला सुरुवात सुद्धा केली. इतर अनेक देशातील माध्यमांनी या बातम्यांना कसे हाताळले हे तिथल्या राज्यव्यवस्थेची सूत्रे कोणाच्या हातात आहेत. यावर सुद्धा अवलंबून आहे. सध्या भारतात अनेक टीव्ही न्यूज चॅनेल्स, इंटरनेट माध्यमे, वेबपोर्टल, वेब माध्यमे, पेड न्यूज, आयटी सेल यांच्या माध्यमातून जलद बातम्या प्रसारित केल्या जातात. अनेक बातम्यांची विश्वासार्हता तपासून त्यावर प्रतिक्रियावादी होणे हा सुज्ञपणा, किंवा सशक्त लोकशाहीची लक्षणे असतात.

अमेरिकन माध्यमांनी प्रसारित केलेल्या चीनच्या अणुचाचणीच्या बातमीची विश्वासार्हता भारतीय माध्यमांनी तपासून न पाहता त्या प्रसारित केल्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जात आहे. अशा चर्चाना तोंड फुटू लागले, सामान्य जनतेवर अशा बातम्या अथवा चर्चा काय परिणाम घडवू शकतात. याची माध्यमांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. भीती आणि दडपशाहीच्या सावलीत जनतेला ठेवल्याने व्यवस्थेला आणि कोणाकोणाला याचा फायदा मिळणार आहे. हे जनतेच्या लक्षात यायला हवे. त्यामुळे वेबपोर्टल, इंटरनेट न्यूज अथवा कोणतेही माध्यम असो बातम्यांची विश्वासार्हता सुज्ञ जनतेने आधी तपासून घ्यावी.

तिसरे महायुद्ध, अणुयुद्ध, एक व्यावसायिक बातमीदार म्हणून तुमच्या बातम्यांची रंजकता, उत्सुकता नक्कीच वाढवतील. पण मानवजात म्हणून तुम्ही माणसांच्या नजरेतून केव्हाच उतरलेले असणार. व्यवस्थेमध्ये माध्यमांची जबाबदारी मोठी आहे, वाढत्या ढासळत्या विश्वासार्हतेच्या दिवसात दिव्याचा उजेड मिणमिणता असला तरी वाट दाखवायला उपयोगी पडू शकतो, नाहीतर लाखो दिव्यांचे इव्हेंटस करून पण आपण वाट चुकलेलो म्हणून अंधारात चाचपडतच वागू जगू शकतो हे सुज्ञास न सांगणेच योग्य.

वैभव जगताप

Updated : 23 April 2020 3:03 PM GMT
Next Story
Share it
Top