जग थांबलं! पण राजकारण आणि जातीयता थांबली का?

जगावर आलेल्या संकटापासून सुटका मिळवण्यासाठी जग ठप्प झालं आहे. देशातील वाहतूक बंद आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही थांबलेले आहे. मात्र, या काळातही दोन गोष्टी थांबलेल्या नाहीत. त्या म्हणजे जातीयता आणि गलिच्छ राजकारण. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसत आहे.

गावागाड्यात होणारा अन्याय ठोकून काढत बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांना शहराकडे जाण्याचा मूलमंत्र दिला. यानुसार खेड्यातील अनेक कुटुंबं शहरात स्थलांतरीत झाली. शहरात काम करून स्वाभिमानाने जगू लागली. शहरामध्ये बहुतांशी झोपडपट्टी मध्ये हा वर्ग मोठ्या प्रमाणात राहत होता. यातील बऱ्याच जणांनी उच्च शिक्षण घेऊन आपले लाईफ स्टॅंडर्ड वाढवले.

कोरोनामुळे मुंबई पुणे या शहरात हाहाकार उडाला आहे. अनेक कुटुंबांना उभा करणारी शहरे लोकांना असुरक्षित वाटू लागली आहेत. यामुळे यातील बहुतांशी लोक आज रिव्हर्स मायग्रेट होत आहेत. मात्र, गावात आल्यानंतर त्यांना दुजाभावाची वागणूक मिळत आहे. सचिन गोतपागर यांचे कुटूंब रीतसर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मुळगावी कमळापुर येथे येणार होते.
याबाबत त्यांनी पोलिस पाटील यांना फोनवरून कळवले. त्यांच्या राहण्यासाठी वेगळे घर असल्याने त्यांनी होम home qurantine होण्याचा निर्णय घेतला. ते गावी येण्या आधीच समितीला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे त्यांना कळवण्यात आले.

वास्तविक home qurantine व्यक्ती जर नियम तोडून बाहेर फिरत असेल आणि अशा तक्रारी आल्या तर त्यांना instituational quarantine करतात. गावात क्वारंन्टाईन केलेल्या लोकांची संख्या 37 होती. यातील लोकांना त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. तर काहींना संस्थात्मक क्वारंन्टाईन करण्यास सांगितलं होते. यातील काहींच्या घरी होम क्वारंन्टाईनची व्यवस्था असतानाही त्यांना संस्थात्मक क्वारंन्टाईन करण्यात आले होते. या संदर्भात पोलिस पाटलांशी चर्चा केली असता, त्यांनी उद्या ग्रामपंचायतीत ये चर्चा करू. असं मॅक्समहाराष्ट्र च्या प्रतिनिधींना सांगितलं.

मॅक्समहाराष्ट्र चे प्रतिनिधी सागर गोतपागर हे जेव्हा ग्रामपंचायत मध्ये पोहोचले तेव्हा पन्नास लोकांचा जमाव या ठिकाणी होता. पत्रकार सागर गोतपागर यांनी जेव्हा क्वारंन्टाईन संदर्भात पोलिस पाटील यांना प्रश्न विचारला असता…. त्यांनी
तुझा काय संबंध, आमचं आम्ही बघू, तू कोण लागून गेलास? तसंच काही लोक अंगावर धावून आले. त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण सोबत असलेले पत्रकार दत्तकुमार खंडागळे यांच्यामुळे तो अयशस्वी ठरला.

सायंकाळी सचिन गोतपागर यांची कुटूंब शाळेत नेण्यात आली. पाणी आणि इतर सुविधा नसल्याने त्यांच्या भावाचे चार महिन्यांचे बाळ एक तास टाहो फोडत होते. तरी समितीला पोलिस पाटलाला दया आली नाही. त्या बाळाला खाजगी वाहन करून दवाखान्यात नेले. व तेथून वाळूज येथील त्यांच्या आजोळी ठेवण्यात आले. व कुटुंबीयांनी घरीच नियम पाळून राहण्याचा निर्णय घेतला.

या संदर्भात सचिन शी बातचित केली असता “माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा निर्णय हा जात पाहून केला गेला. यात समितीने तलाठी यांना देखील हाताशी धरले होते. मी रीतसर प्रांत अधिकाऱ्यांशी यावर बोललो त्यांचा संदर्भ दिला तरी माझे ऐकले गेले नाही”.

महादेव साळुंखे यांचा मुलगा संस्थात्मक विलागिकरणात होता. त्याचा कुटुंबीयांशी कसलाही संपर्क आलेला नव्हता ते सांगतात “या पोलिस पाटलाने दूध डेअरी ला सांगून माझे दूध बंद केले. यांनी उठवलेल्या अफवांमुळे माझ्या शेतात मजूर यायचे बंद झाले. हा सरळ सरळ वाळीत टाकण्याचा प्रकार केला गेला. यावर कोणी दाद घेत नाही. शेजारच्या गावातील विलास किर्दत यांनी फेसबुक वर सदर बाब मांडली.’’

हा प्रकार फक्त एकाच गावात आणि एकाच जातीपुरता मर्यादित नाही. राजकारणात विरोधक असलेल्या लोकांना अडवण्यासाठी या दुर्दैवी काळाचा संधी म्हणून उपयोग गावटगे घेताना दिसत आहेत. ऐतवडे बु येथे पत्रकार प्रदीप लोखंडे यांचे शेतात वेगळे राहण्याची सोय असतानाही त्यांना जबरदस्तीने शाळेत ठेवले गेले. आणि शाळेत जेवणाची सोय घरच्यांना करायला सांगितली. Qurantine व्यक्तीला रुग्ण समजून अतिशय घृणास्पद वागणूक दिली जात आहे. यावर कुणी बोलले तर त्यांच्यावर दंडेलशाही केली जात आहे.

खेड्यातील काही पुढाऱ्यांना ही आलेली आयती संधी वाटत आहे. यावर नियंत्रण ठेवले नाही तर लोकांच्यात असंतोष वाढत जाईल. खेड्यातील जातीची दरी जास्तच रुंद होईल. प्रशासनाने पुढाकार घेऊन या समित्यांना याबाबत सूचना देणे महत्त्वाचे आहे. हे थांबले नाही तर ग्रामीण भागात गोरगरीब जनतेची पिळवणूक अटळ आहे.