Home > मॅक्स ब्लॉग्ज > Marathwada : महापुराच्या वेदना आणि महिलांचा निर्धार

Marathwada : महापुराच्या वेदना आणि महिलांचा निर्धार

मराठवाड्यातील महापूराला दीड महिना उलटला... काय आहे तेथील सद्यस्थिती? सर्व संसार उद्धवस्त झाल्यानंतर गावातील महिलांची भूमिका नेमकी काय? जाणून घेतलंय मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात अभ्यास दौरा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिरत सातपुते यांनी...

Marathwada : महापुराच्या वेदना आणि महिलांचा निर्धार
X

या अभ्यास दौऱ्यात NAPM ने महिन्याभरपूर्वी मदत दौरा केलेल्या उत्तर सोलापूर मधील शिंगोली आणि मनगोळी या गावालाही भेट दिली. दीड महिन्यापूर्वी पाहिलेल्या महापुराच्या खाणा खुणा बघतच गावात शिरलो. महामार्गाच्या सर्विस रोडवर पडलेला मोठा खड्डा अजूनही तसाच आहे आणि महापुराच्या वेदना वागवत काळ पुढे सरकत आहे.

दीड महिन्यात फार काही बदललेलं नसलं तरी गावातील महिलांचा निर्धार पक्का झालेला दिसतोय. उत्तर सोलापूर तालुक्यातील शिंगोली गावातील भीम नगर वस्तीच्या तोंडाशी असलेल्या बुद्ध विहारात बाया बापड्या जमलेल्या. पुणे-सोलापूर महामार्गावरील फ्लायओव्हरच्या भिंतीमुळे गाव जणू धरणातच अडकलं आणि काही तासांत पाणी गावात शिरलं. दोनशेहून अधिक घरांत पाणी शिरले एवढेच नव्हे तर घरांच्या वरून पाणी चढलं आणि दीर्घकाळ ती घरे पाण्यात राहिली. ती सर्व कुटुंबे सुरक्षित स्थळी आश्रयाला गेली असली आणि त्यामुळे जीवित हानी झाली नसली तरी त्यांच्या संसारातील भांडी, कपडे, अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तू वाहून गेल्या किंवा सडून निकामी झाल्या. शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली. शेत जमीनच वाहून गेल्यामुळे आता शेती कसण्यास योग्य राहिलेली नाही. खरिपाचे पीक तर हातातून गेले आणि रब्बीची पेरणीच करता येणार नाही अशी शेतीची स्थिती झाली. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले असून त्यांच्याच शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांचा रोजगार तर पूर्णतः ठप्प झाला. संसारच उध्वस्त झाला, रोजगारही उरलेला नाही आणि अशावेळी बचत गट व अन्य मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते भरण्याचा लावलेला तगादा व हप्ते न भरल्यास दंड आकारण्याची धमकी यावर तोडगा काढण्यासाठी बुद्धविहारात बाया जमल्या होत्या.




जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक सुनीती सु र व संजय मं गो यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पुराची वारंवारिता आणि फ्लाय ओव्हरच्या भिंतीला धडकून मागे गावात शिरणारे पाणी पाहता ही स्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते असे गावकऱ्यांचे मत पडले आणि त्यामुळे गावाचे पुनर्वसन केले जावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली. पूर आम्ही आणलेला नाही. मग आम्हाला का हे सर्व सोसावे लागतेय असा सवाल करत आमच्या गावात परत पाणी आलं नाही पाहिजे अशी व्यवस्था सरकारने करावी अशी मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली. धरणातील पाणी सोडण्याचे वेळापत्रक, नियम सरकारने पाळावेत, नदीपात्रातील अतिक्रमण हटवावे, वेळेवर गाळ काढावा, पाणी परत येणार नाही यासाठी सरकारने उपाययोजना करावी अशा आग्रही मागण्या बैठकीत करण्यात आल्या. या मागण्यांसाठी वेळ पडल्यास कलेक्टर यांना भेटण्यासाठी जाण्याची तयारी बायकांनी दाखवली.




कर्ज फेडीच्या बाबतीत सवलत मिळणे हा आमचा हक्क आहे. बँका व मायक्रो फायनान्स वाल्यांना याबाबत आदेश द्यावेत अशीही मागणी करण्यात आली. बहुसंख्य महिला असलेल्या या बैठकीत पुरुषांची संख्या कमी असली तरी यापुढे फक्त बायाच नाही तर गावातील पुरुषही या मागण्यांसाठी पुढे येतील असा विश्वास यावेळी अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी व्यक्त केला. “नारीशक्ती आई है, नई रोशनी लाई है” या घोषणेने बैठकीची सांगता झाली. मायक्रो फायनान्सच्या आणि बँकेच्या कर्जमाफी व कर्ज फेड मुदतीसाठीचे अर्ज बायकांनी भरले. त्याअर्थाचे निवेदन अभ्यास दौऱ्यातील सदस्यांसोबत बचतगटातील बायकांनी बँकेत जाऊन अधिकाऱ्यांना दिले.




मनगोळी गावातही गंभीर पूरपरिस्थिती होती. गावापासून दोन किलोमीटर लांब असलेली नदी अचानकपणे गावात शिरली आणि गावच उध्वस्त झालं. शेते खरवडून त्यातील पूर्ण माती वाहून गेली आहे. कांदा, सोयाबीन व ऊस पिकांचा पूर्ण नाश झाला. सुमारे 270 कुटुंबे थेट पूरबाधित होती. अनेक घरांचे पत्रे वाहून गेले. फक्त 108 कुटुंबाना भरपाई मिळालीय. त्यासाठी समिती नेमलेय. भरपाईसाठी "पाण्याची रेघ ओढा" इतकी साधी मागणीही मान्य होत नाही हे उद्वेगाने ग्रामस्थ सांगत होते. ही चर्चा चालली होती दुरुस्ती चालू असलेल्या ग्रामपंचायती समोरच!




गावातीलच शत्रुघ्न हातेकर यांनी आठ दिवस आम्हाला जेऊ घातले म्हणून आम्ही आज तुम्हाला दिसतोय. कसे बसे पत्रे उभे करून घरं परत उभी केलीत. हातावर पोट असणाऱ्या सालेवाडीतील महिला सांगत होत्या. परत परत महापूर आला तर काय करायचं असं म्हणत पुनर्वसनाची मागणी करुया म्हणणाऱ्या या बाया. घरं दार सोडून कुठे विस्थापित व्हायचं त्यापेक्षा महापूर पुन्हा येऊ देऊ नका, धरणातलं पाणी कधी सोडायचं त्याचं नीट नियोजन करायला हवं असं जेव्हा याच बाया बोलायला लागल्या तेव्हा विश्वास वाटायला लागलाय की बायांनी ठरवलं तर ही परिस्थिती बदलायला व्यवस्थेला भाग पाडतील.




मराठवाड्यातील महापूरग्रस्त भागातील अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने भेटलेली ही स्त्रीशक्ती संघटित स्वरूपात नक्कीच परिवर्तन घडवून आणेल यात शंकाच नाही. त्यासाठी संघटनेचे बळ तिच्यामागे उभे करावे लागेल व अभ्यासाची जोड देऊन योग्य मागण्या लावून धराव्या लागतील.

#मराठवाडाडायरी

#महापूर

सिरत सातपुते

Updated : 16 Nov 2025 6:00 AM IST
Next Story
Share it
Top