Home > मॅक्स ब्लॉग्ज > धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय? - प्रा. हरी नरके

धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय? - प्रा. हरी नरके

धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय? - प्रा. हरी नरके
X

परधर्मियांविषयी सतत द्वेशपूर्ण अफवा पसरवून हिंदुराष्ट्राची सोनेरी स्वप्नं बहुजनांच्या मनावर कोरली जातात. हे मनाचे श्लोक वाचून आणि ऐकून मूळ धर्मग्रंथ न वाचलेली बहुजन खिल्लारं चेकाळतात. बहुजानांना धर्मशास्त्रात काडीचाही अधिकार नाही. ते फक्त गुलाम आहेत. तरीही सर्व जातीतील हिंदू स्त्रिया, अनु. जाती, जमाती, भटके, विमुक्त आणि ओबीसी यांना हिंदूराष्ट्राचा अतोनात गर्व असतो. या हिंदूराष्ट्रात त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त वेठबिगारीच येईल. बहुजनांचे अज्ञान हेच आंबाभुर्जीतील रेशीमकिड्यांचे भांडवल असते. माता भगिनी आणि बहुजनहो, तुम्ही मूळ ग्रंथ वाचू लागाल त्याक्षणी परधर्मद्वेशावर म्हणजे शेणाच्या पोहावर उभारलेला हा हिंदूराष्ट्राच्या पत्त्यांचा बंगला ढासळेल. पण तुर्तास ते राहू द्या.

सांप्रत काळी आपण हे तथाकथित हिंदुराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडणार आहे काय याचा थोडा धांडोळा घेऊ.

हे ही वाचा..

धर्मशास्त्र सांगते, " वेदाध्ययन न करणारे किंवा अग्निहोत्र न ठेवणारे ब्राह्मण शूद्रासमान होत. वेद न जाणणारा, व्यापारावर उपजीविका करणारा, नटाचा धंदा करणारा, दुसर्याेच्या वित्ताचे चोराप्रमाणे हरण करणारा अथवा वैद्यकीचा [ म्हणजे आजच्या भाषेत डॉक्टर चा ] धंदा करून उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण हा "ब्राह्मण" ह्या संज्ञेस अपात्र आहे." असे वसिष्ठऋषींचे वचन आहे. वसिष्ठऋषी हे तर श्रीरामांचे गुरू. आधुनिक रामराज्यात त्यांची आज्ञा मानावीच लागणार नाही का? वसिष्ठऋषी पुढे म्हणतात, " व्याजबट्ट्याचा धंदा करणे हा ब्रह्महत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे. "

गौतमऋषींच्या मते अशा प्रकारच्या पतितांशी व्यवहार करणारे तेही पतितच होतात. अर्थात वरिल सर्व नियम पाळायचे झाले तर पतित नसलेले किती ब्राह्मण सापडतील?

अहो, सगळे डॉक्टर, अभिनेते, [ नटश्रेष्ठ शरद पोंक्षे, सौरभ गोखले, केतकी चितळे, इ. इ. ] गायक, व्यापार करणारे [ चितळे बंधूंसारखे सगळेच ] व्याज घेणारे म्हणजे बॅंकींग उद्योगातले सगळे, हे "पतित" ठरणार. ते "ब्राह्मण" राहणार नाहीत. पतिताचं वर्तन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक की हो डोक्यावर! आता मला सांगा हे सगळे पतित वगळले की केवळ वेदाध्ययन करणारे महाराष्ट्रासारख्या टिळक-आगरकर-राजवाडे-केतकरांच्या राज्यात दहावीस तरी उरतील काहो? म्हणजे उरलेल्यांमध्ये [ पतितांमध्ये ] खुद्द आपला जन्मदाता पिता जरी असला तरी खर्याय धार्मिक माणसाने त्याचाही त्याग केला पाहिजे असे असे गौतम स्मृती सांगते. बौधायनाने आर्यावर्ताबाहेर जाणारांना कठोर प्रायश्चित सांगितले आहे. अगदी बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये जाणारांनाही हाच नियम लागू होतो. शूद्रांना शिकवणारे सारे ब्राह्मण दुषित होत. पतित होत असे धर्मशास्त्र सांगते.

ज्या धर्मशास्त्राच्या आधारे चांडाल जातीचे अस्तित्व सिद्ध होते त्याच स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्यात या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.

असे सनातन धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय?

संदर्भ- विविध वृत, २२ जानेवारी, १९३३

प्रा.हरी नरके, २२/०४/२०२०

{लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखातील मतं वैयक्तिक आहेत.}

Updated : 25 April 2020 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top