Home > मॅक्स ब्लॉग्ज > जाहिरातीतून तडा गेलेला विश्वास फेविकॉल जोडणार का?

जाहिरातीतून तडा गेलेला विश्वास फेविकॉल जोडणार का?

जाहिरातीतून तडा गेलेला विश्वास फेविकॉल जोडणार का?
X

आमच्या लहानपणी डिंक हे नैसर्गिक द्रव्य उपलब्ध होतं. त्यानंतर फेविकॉल आलं. त्यातून तुटलेल्या वस्तू जोडल्या जात होत्या. त्यातलं तंत्रज्ञान विकसित होऊन आता अनेक पर्याय पुढे आले आहेत. मात्र, विश्वास नावाच्या गोष्टीला एकदा तडा गेला तर तो जोडायचा कसा, यावर अजून कुठलंही तंत्रज्ञान निघालेलं नाही. आता हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे...महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच एक विधान केलंय की देवेंद्रजी आणि मी म्हणजे फेविकॉलचा जोड आहे, तो तुटणार नाही...

१३ जून २०२३ रोजी मराठीतील बहुतांश वर्तमानपत्रांचं पहिलं पान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीनं भरलेलं होतं. या जाहिरातीचा मुख्य आशय असा होता “राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे” त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कारण आतापर्यंत देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र अशा घोषणा फडणवीस समर्थकांकडून जाहिरातींसह जवळपास सर्वच ठिकाणी वापरल्या जात होत्या. फडणवीसांचा महाराष्ट्रातील राजकारणात असलेला प्रभाव पाहता, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या घोषणेला बळ मिळत होतं. मात्र, जून २०२२ पासून राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीनंतर वर्षभर शांत दिसणारा शिंदे गट अनेक पातळ्यांवर आता आक्रमक होतांना दिसतोय. शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी तर सरकारमध्ये आम्हांला सापत्न वागणूक मिळत असल्याचं सार्वजनिक रित्या माध्यमांना सांगितलं. त्यातच कल्याण मध्ये भाजप-शिवसेना वादाची ठिणगी पडली. मग त्याला भाजपनंही प्रत्युत्तर देत कुठं ५० आणि कुठं १५० कुठं अशी बॅनरबाजी झाली. मध्येच बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होत नाही, असं वक्तव्यं भाजपचे राज्यसभेतील खासदार ड़ॉ. अनिल बोंडे यांनी केलं. त्यानंतर पालघरच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात शेजारी बसून देखील तब्बल ९ मिनिटं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात संवादच झाला नसल्याचं सगळ्यांनी पाहिलं. आता या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण पाहिलं तर एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसत होतं. कारण, पत्रकार परिषद असो की माध्यमांना सामोरं जाणं असो शेजारी बसलेले भाजपचे नेते, मंत्री हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रीफ द्यायचे, त्यांनी काय बोललं पाहिजे, हे कानात सांगायचे किंवा कागदावर लिहून द्यायचे. साधारणपणे सुरूवातीचे काही महिने हे चाललं. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसतोय. त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे यांना आता क्विक ब्रीफिंगची आवश्यकता दिसत नाही.

ज्या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं. तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत खुप बदल झाला. पूर्वी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत जावं लागत होतं. आता भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेटच भेटू शकतात. अशा थेट भेटीतूनही शिंदे यांना भाजपश्रेष्ठींनी ताकद आणि विश्वास दिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाच्या सुरूवातीच्या काळात सावध सुरूवात केलेल्या शिंदे यांनी दिल्लीतील श्रेष्ठींची मर्जी सांभाळण्याचं कसब कमी काळात अवगत केलं. त्यामुळं सुरूवातीला बॅकफूटवर असणाऱ्या शिंदे समर्थकांनी आता आक्रमक भुमिका घ्यायला सुरूवात केली. त्याचाच परिपाक म्हणून ही जाहिरातबाजी म्हणता येईल.

पहिल्या जाहिरातीनंतर भाजपकडूनही त्या जाहिरातीला प्रत्युत्तर म्हणून ५० कुठं आणि १५० कुठं अशी बॅनरबाजी केल्याचं सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर सारवासारव म्हणून दुसरी जाहिरात करण्यात आली. त्यातून आम्ही एकच आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पहिली जाहिरात कुणी दिली, त्याचा मास्टरमाइंड कोण होता, ती जाहिरात देण्यामागचा उद्देश काय होता, हे अद्यापही गुलदस्त्यातच असलं तरी भाजपच्या आयटी सेल किंवा माध्यम विभागातील लोकांनी थेट वर्तमानपत्रांच्या जाहिरात विभागात थेट संपर्क करून जाहिरात देणाऱ्याचं नाव काढलेलं असेलही. पण शिंदे-फडणवीस यांच्यातील धुसफूस ही जाहिरातीच्या निमित्तानं बाहेर पडली. त्यामुळं जाहिरातीतून तडा गेलेला विश्वास फेविकॉल जोडणार का ? हे पाहावं लागले.


- आनंद गायकवाड

Updated : 17 Jun 2023 3:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top