Home > मॅक्स ब्लॉग्ज > "पंचतंत्रवाल्या स्टोरीजचा मोठा खजिना दिसतोय तुमच्याकडे CM साहेब!"

"पंचतंत्रवाल्या स्टोरीजचा मोठा खजिना दिसतोय तुमच्याकडे CM साहेब!"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या भाषणांमध्ये आपल्या बंडात सहभागी झालेल्या आमदारांबाबत मोठमोठे दावे केले आहेत. पण त्याआधी एकनाथ शिंदे यांनी केलेली वक्तव्य आणि आताचे दावे यावरुन प्रा. हरि नरके यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

पंचतंत्रवाल्या स्टोरीजचा मोठा खजिना दिसतोय तुमच्याकडे CM साहेब!
X

नवे मुख्यमंत्री दररोज स्वत:ची एकेक स्टोरी सांगतात. "काय ते म्हणे ५० लोक बलाढ्य सत्ता सोडून, त्याग करून माझ्यासोबत आले ही जागतिक क्रांती आहे. मी एक फटका माणूस आहे. माझ्याकडे काहीही नसताना हे लोक आले. ते ज्यांना सोडुन आले ते ताकदवर होते. त्यांच्याकडे सगळे काही होते. तरीही लोक स्वखुशीने आले. साऱ्या जगाने याची नोंद घेतली." वगैरे, वगैरे.

या पंचतंत्रवाल्या स्टोरीजचा मोठा खजिना दिसतोय तुमच्याकडे CM साहेब! अहो, तुम्हीच सांगत होता ना, गुवाहाटीमध्ये आपल्या सोबत्यांना, "आपल्यामागे एक बलाढ्य महासत्ता आहे. जिने पाकिस्तानला धडा शिकवलाय. तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही असा त्यांनी आपल्याला शब्द दिलाय."

या दोन्हीतले खरे कोणते?

तुमच्याकडे काहीच नव्हते तर सुरत ते गुवाहाटी, तिथून गोवा, तिकडून मुंबई ही स्वतंत्र विमाने फुकट आली का? पंचतारांकित संपूर्ण हॉटेल्स सुरत, गुवाहाटी, गोवा नी मुंबईत मोफत मिळाली होती? प्रत्येकाला भेट दिलेली ५० खोकी ते १२५ खोकी ही ढोकळा भरलेली होती की चितळे बर्फी किंवा नागपुरी सोनपापडी? तुम्ही एकटेच नी कफल्लक होता तर गुजरात, आसाम, गोवा नी केंद्र सरकार तुमच्यापुढे कुर्निसात का करीत होते? त्यांच्या सगळ्या यंत्रणा तुमच्यापुढे पायघड्या का घालत होत्या?

तुम्ही कफल्लक आहात तर तुमच्या गावात दोनदोन हेलिपॅड पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी उगवली काय? निवडणूक प्रतिज्ञापत्रात तुम्ही कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे, ती रिक्षा चालवून आली काहो?

यालाच आपल्या भाषेत निर्धनता म्हणतात का?

एका आमदाराला आपण चार्टर फ्लाईट करून परत पाठवले तेही फुकट मिळाले होते? शहाजी बापू म्हणाले, त्यांच्या मुलीच्या लग्नात तुम्ही २५ लाख रुपये आहेर म्हणून दिले. हे २५ लाख आपण प्रत्येक लग्नपत्रिका घेऊन आलेल्याला देता का? हीच आपली "देना" बँक ना? हा शब्द शिंदेसेनेचे कन्नडचे नवे हिंदुहृदयसम्राट, हनुमानचालिसाशेट अब्दुल सत्तार यांचे आहेत बरं का.

५० जण सत्ता सोडून आले की महासत्तेसाठी आले? त्याग करून आले की आजवरची कमाई इडीपासून वाचवण्यासाठी आले? हिंदुत्वासाठी आले की देना बँकेसाठी आले? आपली आणि शहाजी बापूंची गरिबीची दररोज नवी कथा ऐकून आम्ही सद्गदित होतोय. काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरिबी. एकदम वोक्केमंदी!

: प्रा. हरी नरके

Updated : 16 July 2022 7:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top