Home > मॅक्स ब्लॉग्ज > आज घर जाळलं, उदया पारध्यासनी जाळणार काय..?

आज घर जाळलं, उदया पारध्यासनी जाळणार काय..?

पारध्यांना चोर का म्हटलं जातं? पारधी समाजाला गुन्हेगारीच्या नजरेतून का पाहिलं जातं? जगण्या पवार वनविभागाच्या जागेवर राहत असल्यानं त्याचं घर जाळण्यात येतं, गावा शहरात पोटा पाण्याची आग विझवण्यासाठी फिरणा-या भटक्या कुटुंबाची किती दिवस महाराष्ट्रात घरं जळणार? वाचा पारधी समाजाचं वास्तव मांडणारा विनायक कदम यांचा लेख

आज घर जाळलं, उदया पारध्यासनी जाळणार काय..?
X

वाल्या कुळी नावाचा दरोडेखोर जंगलातन जाताना जाणाऱ्या वाटसरुसनी आडवून दरुड घालायचा. तेंच मुडड पाडायचा. नारदमुनी त्याच वाटणं जात हुतं. वाल्या कोळ्यांन तळपती कुराड काडून वाट आडवत जवळ आसल्याल पैसं-पाणी सारं दयायची मागणी किली. नारद म्हणले देतो पण तुझ्या पापात तुज्या घरातली सामील हायत का बगून य.

गडी घरला गेला बायकुला ईचारल पापात हायसाका सामील. बायकू म्हणली न्हाय. गडी मागारी आला नारदाच पाय धरलं. दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. तेंन रामायण लिहलं. दरोडेखोर वाल्या कोळ्याच रामायण आमी वाचतोय. मांनसासनी लुटणाऱ्या खून करणाऱ्या दरोडेखोर वाल्या कोळ्याला आमी स्वीकारला पण तासगावच्या चरण्या पारध्याला आमी स्वीकारायला तयार न्हाय. तुमी चोरच हायसा आणि तुमी चोऱ्याचं करणार. पारधी मजी चोरटा ह्यो चष्मा कवातर शिकलेल्या समाजानं काडून बगाव. त्यासनी शिक्षा करायच्या आदी पारधी चोर न्हाय हे सिद्ध करायची संधी तर दया. ती आडाणी हायत म्हणून शिकल्याला आमचा समाज तेंच्या किती पिढ्यांवर आजून आन्याय करणाराय..

तासगाव तालुक्यातल्या सावर्डे गावात वनविभागाच्या जाग्यावर गेले काही महिनं चरण्या पारध्याचा पोरगा जगन्या पवार आणि तेजी पूरगी आस कुटुंब राहतंय. ८ सप्टेंबरला पोर आजारी पडली म्हणून सारी तासगावला दवाखान्यात आली. तवर माग कुणीतरी त्या पारधी महिलेच घर जाळून टाकलं. धान्यासंग सारा प्रपंचा जाळला. कुणाचं घर जाळंन ही भयानक हाय. सावर्डे सारख्या गावाला ही शोभणार न्हाय. घर जाळण आजपातूर ती पिच्चरमदी बगत हुतु. पण घर जाळून तेंचा जगण्याचा आधिकार आमी नाकारतुय.

त्या पारध्यांनी चुरी किली तर तेंच्याव गुन्हा दाखल करून पुलीस कारवाई करत्याल. शिक्षा हुईल पण गुन्हा सिद्ध व्हायच्या आधी चोर ठरवून तुमी तेंचि घर जाळणार ह्यो कसला न्याय. गावात पारधी नगो आस्त्याल तर त्यांना भायर काढायला कायदा, प्रशासन हाय की. का घर जाळून तुमी तालिबानी दहशतवादयांगत तेंचा न्यायनिवाडा करताय. जाळणाऱ्यांनी काय क्षणासाठी पारध्यांसारखं आपलं घर कुणीतरी जाळलं तर तुमी काय केलं आसत स्वतःला ईचाराव.

घर जाळलं तरी तासगावच्या पोलीस प्रशासनांन पायजी त्या गंभीरतेन त्यो विषय घेटला न्हाय. पारधी मजी चोरच ही नजर आक्कल आसल्याल्या आमच्या समाजानं जरा बदलाय पायजी. पारध्यांनी वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं आसल तर गावा गावात, शहरा शहरात तुमी आमी पांढऱ्या कापडातल्या फासपारध्यांनी गायरान, गावठाण, किती शासकीय जागांच्यावर आतीक्रमण केलंय.

तुमी आमी गुन्हेगार नाय का होत मग. आठ दिवसापूर्वी मतकूनकी गावात खिरापत वाटल्यागत गायरानाच वाटप झालं. घावलं तेला पावलं आस लोकांनी पळून पळून जागा छापल्या. प्रशासन हाय का जिवंत. तालुक्यातली ही आतीक्रमण काढायचं धाडस, मनगटात बळ हाय का तेंच्या. तालुक्यात साऱ्या गावात सारयांखाली अंधार हाय. मग आतीक्रमणाचा बागलबुवा पारध्यांच्या बाबतीत का. वनविभागानं पारध्यांच्याव आतीक्रमणाची कारवाई करताना दोन म्हयण्यापूर्वी त्याच हद्दीत दोनशे, तीनशे ब्रास मुरूम पळवणारांवरपण कारवाई कराय पायजी.

सावर्डेतल्या पारध्यांनी चोऱ्या केल्या तर तेंच्या नावाव तासगाव पुलीसात किती गुन्हं नोंद झालं. तपास झाला का.? गुन्हा सिद्ध होत तेंच्याव कारवाई झाली का..? हे ज्याव कोण बोलत न्हाय. पारध्यांच्या नावान काय जण चोऱ्या करायला, दरुड घालाय लागल्यात. काय गडी घावल्यात बी. पण बदनामीच, चुरीच धनी पारधीच की.

तासगावच्या चरण्या पारध्याच्या आठ नाती व चार नातू राज्यातल्या टॉपच्या तमाशात डान्सर म्हणून काम करत्यात. जागरण, मुरळया, गाणी म्हणाय जाऊन जगत्यात. तुमी घर जाळलं त्या घरातली पोरगी रेखा नावाच्या शॉर्ट फिल्ममधली हिरॉईन हाय. ती शॉर्टफिल्म मराठी चित्रपट क्षेत्रातला मोठा माणूस नटरंग पिच्चरचा निर्माता रवी जाधव आणि पेडचा शेखर रनखांबे तयार करत्यात.

ती शॉर्टफिल्म प्रदर्शित झाल्यावर तिजी राज्यात चर्चा हुईल आशा ताक्तीची हाय. त्या हिरॉईनच घर तुमी जाळल कसला पुरुषार्थ ह्यो. पारध्यांनी शेरड पाळून, वडापावच्या गाडीव, बागत छाटणीला जाऊन बदलायचं ठरवलं तर आमचा रानटी समाज त्यासनी बदलूनच देत न्हाय. चोरीच आणि चोरट्या पणाच साखळदंड आमी तेंच्या पायात घालतुय.

तासगाव तालुक्यात द्राक्षबागातनी काम करायला कमीत कमी पाच ते सहा हाजार कामगार बिहारमधनं हाजार किलोमीटर वरण पर राज्यातन येत्यात. गावा गावात बोगस, नियमबाह्य राहत्यात. तेंचि पार्श्वभूमी कुणाला म्हायती न्हाय, ती चांगली हायत,गुन्हेगार हायत. ही बिहारी दारू, गांजाड गडी गावागावात हायत पन तेंच्याव आमचा गाढा विश्वास हाय.

पारध्यांच्या नावानं बोट मोडणार आणि कायदा, कानून, नियम सांगून नाकान वांगी सोलणाऱ्या तासगावच्या पोलिसांच्याकड हाजार किलोमीटर वरण येणाऱ्या या बिहाऱ्यांचा डाटा तरी हाय का. त्या बिहाऱ्यांची माहिती पोलिसासनी कोण कळवत न्हाय ते कायदा,नियम मोडत न्हायत का? तेंच्यावर कारवाई होत न्हाय. पण तासगाव तालुक्याचं रहिवासी आसल्याला, आधारकार्ड, मतदानकार्ड जवळ आसल्याल पारधी आमाला चोर वाटत्यात. तर नियम फाट्याव मारून तालुक्यात बोगस राहणार बिहारी गडी आमाला संत वाटत्यात. काय म्हणायचं हेला.

आज पारध्यांची घर जाळली उदया त्याच घरात त्यासनी तुमी त्यासनी कुंडून जाळनार काय. तुमच्या चोऱ्या करून तेंनी बंगल बांधल का.? स्विस ब्यांकत पैस ठेवलं. तेंच्याव गुन्हेगाराच्या झुली घालून कुणी कुणी घर भरली हे ज्याव बोललं तर लय जनासनी मुंग्या डस्त्याल.

यिकीकड आस होत आसताना त्याच सावर्डे गावचा पृथ्वीराज पाटील नावाचा मुख्याधिकारी पोरगा तासगाव शहरातल्या पारध्यासनी जागा, घर, लाईट पाणी दयायला धडपडतुय आणि तेज्याच गावात पारध्यांची घर जाळली जात्यात काय म्हणायचं हेला. एक गाव एक पारधी पुनर्वसन शासनाची योजना हाय. पण ती प्रशासकीय पातळीवर पायजे त्या ताकतीन का राबवली जात न्हाय. पारधी आणि जनता हेंचा संघर्ष कमी व्हायला तासगावच्या पोलिसांनी काय प्रयत्न केलं का..?

आमचं आमदार, खासदार, आणि न्हाय तेजी निवेदन दिऊन बातम्या छापा म्हणणारया साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, युवक नेत्यांनी मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्यानी, धर्माच्या ठेकेदारांनी (पारधी हिंदू देव देवता मानत्यात, सणवार साजरा करत्यात), मन, भावना जिवंत आसणाऱ्या समाजातल्या जबाबदार माणसांनी आणि प्रशासनानं कुणाचतर घर जाळलंय. हेज भान माणूस म्हणून ठिऊन त्यासनी न्याय देणं, नुकसानभरपाई देणं गरजेचं हाय. ही तुमची जबाबदारी हाय आणि ती तुमाला झटकता येणार न्हाय.

विनायक कदम:९६६५६५६७२३

Updated : 14 Sep 2021 4:35 AM GMT
Next Story
Share it
Top