Home > मॅक्स ब्लॉग्ज > कशाला हवा लोकपाल ? पैलं या लोकांना मोकळं करा...

कशाला हवा लोकपाल ? पैलं या लोकांना मोकळं करा...

कशाला हवा लोकपाल ? पैलं या लोकांना मोकळं करा...
X

बरं झालं अण्णांनी आंदोलन मागे घेतलं. एकतर त्या लोकपालमध्ये काय उरलेलं नाही. फुकट एक माणूस त्याच-त्याच मागण्यांसाठी वारंवार उपोषणाला बसतोय. तरी काय या सरकारला जाग येत नाही. मग ते कुणाचं ही असो. लोकपाल आला तर सर्व प्रश्न सुटतील का? जगणं सोप होईल का? जो रस्त्यावर गाडी चालवतोय, शेतात मजूरी करतोय, घाम गाळतोय, मुंबईच्या गल्ल्यांमधला कचरा साफ करतोय, त्याला कसलं आलं लोकपालचं कौतुक. बरं मध्यमवर्ग इतका लेचापेचा आहे ना तो लोकलच्या गर्दीच अर्ध्या रिकामा होतो. अजूनही भाकरीचा चंद्र शोधण्यातच त्याची जिंदगी बर्बाद होतेय. तो काय लोकपाल वापरणार. किती सामान्य माणसं माहितीचा अधिकार वापरतात हो? इथं वेळ कुणाला आहे. अण्णा या मनाने मेलेल्या माणसांना जागवायला मरावंच लागेल, आणि मेल्यानंतर जगात काय चाललंय हे बघायला आपण उरत नाही. त्यामुळं कृपा करुन आता आंदोलन करु नका. उपोषणाने या देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. उगाच राजकीय सेटलमेन्ट झाली असं बोलायला वाव राहतो. तसं बोलतायत ही.

हा देश 'हे असं होऊ शकतं' आणि कदाचित हे झालं तर चांगलं होईल. या शक्यतांवर (probability) सुरु आहे. एकीकडे राजकारणी लुटतायत, तर दुसरीकडे लालफीत. लोकतंत्रातले हे दोन्ही 'माफीया' असे मुरलेत ना तुम्ही कितीही लोकपाल आणा, तरी यांच्या कातडीला भोकं पडणार नाहीत.

बरं हे फक्त आपल्याच देशात आहे का ? तर नाही ? भ्रष्ट राजकारणी आणि ठिम्म लालफीतशाही जागतिक प्रवृत्ती आहे.

ब्रिटनमधला केन लोच नावाचा दिग्दर्शक गेली 25 वर्षे लालफीतशाही म्हणजे नोकरशाही प्रवृत्तीच्या विरोधात सिनेमा बनवतोय. केन लोच आणि पॉल लोवर्टी या दिग्दर्शक-स्क्रिनप्ले रायटरच्या जोडीनं आतापर्यंत 16 सिनेमे बनवलेत. या सर्वांमध्ये आम आदमीचा व्यवस्थेविरोधातला संघर्ष दाखवण्यात आलाय. यांच्या सिनेमातली महत्त्वाची पात्र सतत व्यवस्थेशी लढत असतात. झगडत असतात. आणि झटता झटता मरुन जातात. माणूस मरतो पण लालफीतचं, नोकरशाहीचं काहीही वाकडं होत नाही. तो सुरुच राहते.

2016 चा 'आय डॅनियल ब्लॅक' हा केन लोचचा सिनेमा लालफीतशाही, नोकरशाहीमध्ये अडकून कसा संपतो त्याची गोष्ट सांगतो. सिनेमा ब्रिटनमध्ये घडतो. जिथं प्रभावी लोकशाही आहे असा समज आहे, तिथल्या आम आदमीला संघर्ष करावा लागत नाही असं आपल्याला वाटत असतं. आपल्याकडे आधार आता आलं पण गेल्या कित्येकवर्षांपासून तिथं लोकाभिमुख योजना आहे. सोशल सिक्युरीटी कोट नंबर, इन्शुरेन्स नंबर असं सर्व काही आहे. हे सर्व असताना तिथला आम आदमीनं तर खुश राहायला हवं ना? पण हे सर्व फायदे मिळायला देईल ती नोकरशाही कसली आणि राजकारणी काय तर मी कायदा केला, एव्हढं दिलं आता #बघाकसंजमतंते असं सांगून मोकळे होतात.

डॅनिअल ब्लॅक ही असाच आपले विम्याचे पैसे मिळवण्यासाठी संघर्ष करतो, आपल्यासारखीच माणसं आजूबाजूला त्याला दिसतात. व्यवस्थेबरोबर दोन हात करण्याचं बळ येतं. त्या विरोधात उभा ही राहतो आणि भांडता भांडता एक दिवस संपतो. बरं हे सर्व गांधीच्या मार्गानं सुरु असतं बरं का. आम आदमीचं हे असंच होतंय. सर्व जगात. राज्यशास्त्राचा अभ्यास करताना राजकारण, योजना, सरकारीतंत्र, नोकरशहा हे एकमेकांना पुरक असावीत तरच कल्याणकारी राज्य येऊ शकतं हे शिकलो होतो. पण ते कल्याण होताना काही दिसत नाही. लोकलच्या गर्दीत, मंत्रालयाबाहेरच्या रांगेत, जिल्हा परीषदेच्या बाहेर असे अनेक डॅनियल ब्लॅक दिसतायत. मनात खूप राग आहे. निसर्ग बेभरवश्याचा आहे, राजकारणी गाजर दाखवतोय, मोठ मोठ्या योजना तयार करतोय. पण मग रांगा लागतात. या रांगा संपतच नाहीयत.

धर्मा पाटीलांना जाऊन आता एक वर्ष झालं. मंत्रालयाचे खेटे मारता-मारता म्हातारा मेला. ( ग्रामीण भागात वयोवृध्दांना म्हाताराच म्हणतात, निदान आमच्या कोकणात तरी) रोज असे अनेक धर्मा पाटील आणि डॅनिअल ब्लॅक व्यवस्थेचे बळी पडत असतात. पण या व्यवस्थेला काय जाग येत नाही.

गेल्या वर्षी कार्लेवी वॅरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (झेक प्रजासत्ताक) केन लोच आणि पॉल लॉवर्टींना भेटलो. दोघांमध्ये ही या वयातही भन्नाट एनर्जी आहे. केन लोच यांनी मी प्रश्न विचारला होता..

''तुमच्या सिनेमातली सर्वच पात्र सिनेमाभर संघर्ष करत असतात. काही तरी घडेल, चांगलं होईल अशी त्याला सतत आशा असते. पण तसं काही होत नाही. तो संघर्षात संपतो. तुमच्या दृष्टीनं आशावादाची व्याख्या तरी काय आहे नक्की, How would you define hope? What does hope means to you?”

केन लोच यांचं उत्तर होतं " I hope politicians of this world should change, they are running the system, system should change”

हे तर आपल्या कडच्या राम गोपाल वर्माच्या 'सत्या' सिनेमा सारखंच आहे. कल्लु मामा मुळ्ये वकिलला सांगतो तसंच आहे. "क्या है, ना पॉ़लीटिशीयन सबसे बडा गुंडा है''

डॅनिअल ब्लॅक सिनेमातली शेवटची सोलोलुकी मस्त आहे. व्यवस्थेला 'मी जिवंत आहे' याची जाणीव करुन देणारी आहे.

"मी गिऱ्हाईक नाही, ग्राहक आहे. सेवाधारीही नाही. मी कामचुकार नाही, ना चोर, ना भिखारी, ना ठग. मी फक्त राष्ट्रीय विमा योजनेचा क्रमांक नाही. पडद्यावरची खरकच पण नाही. मी माझे सर्व कर भरतो. त्याबद्दल मला माझा अभिमान आहे. मी काय चेहऱ्यावरची बट उडवत बसत नाही. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघतो, बोलतो. मला सहानभूती नकोय, ती मी कधीच घेत नाही. माझं नाव डॅनियल ब्लॅक आहे. मी माणूस आहे. कुत्रा नाही. म्हणून मी माझा हक्क मागतोय. माझ्या अस्तित्वाची थोडी तरी दखल घ्या. मी डॅनियल ब्लॅक या देशाचा नागरीक, ना त्यापेक्षा कमी ना जास्त.

धन्यवाद

-नरेंद्र बंडबे

Updated : 6 Feb 2019 11:23 AM IST
Next Story
Share it
Top