Home > मॅक्स ब्लॉग्ज > महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्याच नावाने शिक्षक दिन का?

महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्याच नावाने शिक्षक दिन का?

आज शिक्षक दिन.. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावे शिक्षण दिन साजरा केला जातो.. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक कार्याची ओळख करुन देणारा डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा परखड लेख महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पुनः प्रसारित करीत आहोत.

महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्याच नावाने शिक्षक दिन का?
X


महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी भारतात प्रथम सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. ती तारीख आहे 1 जानेवारी 1848.राधाकृष्ण यांचा जन्म आहे 5 सप्टेंबर 1888, म्हणजे राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर 40 वर्ष महात्मा फुले यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाला सुरुवात केली.राधाकृष्णन यांनी असे ऐतिहासिक कार्य केले नाही. महात्मा फुले हे भेदभाव न बाळगता सर्वांना शिक्षण देणारे महापुरुष होते.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून केली. मुलांप्रमाणेच मुलींना शिक्षण दिले तरच समाजाची प्रगती होते., हा महात्मा फुले यांचा विचार होता.तो त्यांनी कृती करून दाखविला. राधाकृष्णन हे स्त्री शिक्षणाबाबत प्रतिकूल होते.त्यांची वृत्ती कशी होती हे त्यांचे पुत्र डॉ.गोपाल यांनी "राधाकृष्णन ए बायोग्राफी" या ग्रंथात लिहिले आहे.महात्मा फुले यांनी प्रथमतः स्वतः च्या पत्नीला शिकविले.

महात्मा फुले यांचे साहित्य उस्फुर्त आहे. तृतीयरत्न, गुलामगिरी,शेतकऱयांचा आसूड,ब्राह्मणांचे कसब, शिवाजीचा पवाडा इत्यादी. त्यांच्या साहित्यातून आपल्या देशात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय क्रांती झाली. महात्मा फुले यांचे साहित्य वाचणारा माणूस जगात कोणाचाही गुलाम होऊ शकत नाही.इतके ते दिशादर्शक आहे.

राधाकृष्णन यांचे साहित्य सनातनी व्यवस्थेचे उदात्तीकरण करणारे आहे. हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ, कॉमेंट्री ऑन भगवद्गीता, इथिक्स वेदांत, क्राईम ऑफ लीला हे राधाकृष्णन यांचे साहित्य आहे की जे ब्राह्मणी व्यवस्थेचे उदात्तीकरण करते. जनमाणसाचे दुःख, त्याची कारणे आणि त्यावरती उपाय योजना हे महात्मा फुले यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये आहे.

राधाकृष्णन यांनी एका तरुणाचा पीएच.डीचा प्रबंध स्वतःच्या नावावरती प्रकाशित केला, याविरुद्ध त्या तरुणाने राधाकृष्णन यांच्याविरोधात कलकत्ता न्यायालयात खटला दाखल केला होता. याबाबतचा सविस्तर वृत्तान्त जगविख्यात तत्ववेत्ता आचार्य रजनीश यांच्या ज्यूं मछली बिन निर या ग्रंथात सविस्तर दिलेला आहे. त्यामुळे चोराच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा शिक्षकांचा, शिक्षण क्षेत्राचा आणि आपल्या देशाचा अपमान आहे. त्यामुळे शिक्षणासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे योग्य आहे.

--डॉ.श्रीमंत कोकाटे

Updated : 3 Jan 2023 2:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top