Home > मॅक्स ब्लॉग्ज > शूरा आम्ही वंदिले...

शूरा आम्ही वंदिले...

शूरा आम्ही वंदिले...
X

का साजरा केला जातो भारतीय पोलीस स्मृती दिन? समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांच्या बलिदानाचा समाजाला विसर पडला आहे का? काय आहे पोलिसांच्या व्यथा जाणून घ्या. पुणे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्याकडून..

गणेशोत्सव आला की पोलीस बंदोबस्ताला उभा राहिला... नवरात्र आली पोलीस बंदोबस्तात व्यस्त झाला. महापूर आला पोलीस मदतीसाठी धावला. निवडणूक आली पोलीसांचा खडा पहारा सुरू झाला. गुन्हा घडला तिथे पोलीस पोहोचला. अपघात झाला पोलीस पोहोचला. दंगेखोरांना धडा शिकवणारे पोलीसच. स्वतःच्या कुटूंबाला वेळ न देता समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी उराशी बाळगून ती पार पाडणाराही पोलीसच.

'सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय' या दोन शब्दातील प्रत्येक अक्षराच्या अर्थ प्रत्यक्षात उतरवत पोलीस आपले कर्तव्य बजावतात. कर्तव्य बजावताना हजारो पोलिसांनी आपले बलिदान दिले. मात्र, पोलिसांच्या या बलिदानाचा समाजाला नेहमीच विसर पडल्याची खंत आहे. हो... खंतच आहे. कारण देशसेवेचे कर्तव्य बजावण्याची शपथ घेऊन पोलीस आपल्या सेवेला सुरूवात करतो. पोलीस दलात सेवा बजावताना समाजाला घातक ठरणाऱ्या प्रत्येक संकटाचा तो जीवावर उधार रहात सामना करण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला सीमेपलिकडचा शत्रू माहित असतो. मात्र, देशाच्या अंतर्गत सुरक्षितेत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या पोलिसाला त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या समाजातील विघातक प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांचा बिमोड करावा लागतो. यांत दुर्देवाने त्याला काही वेळा कौटुंबिक नाती, ज्ञाती बांधव, आपलेच मित्र वा सहकारी यांच्याशी सामना करावा लागतो.

सामाजिक सुरक्षितेला प्राधान्य देताना पोलीसांना काही वेळा जीव गमावण्याची वेळ येते. देशसेवेला वाहून घेताना दिलेले बलिदान यापेक्षा आणखी कोणते मोठे कर्तव्य असू शकते. समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा पोलीस स्वतःची कौटुंबिक जबाबदारी मात्र, त्याच प्रामाणिकपणाने पार पाडू शकत नाही.

समाज जेव्हा उत्साहात सण, उत्सव सहकुटंब साजरे करत असतो तेव्हा हातात लाठी घेऊन बंदोबस्तात दिवस घालवत असतो. ते पोलिसांचे कर्तव्यच आहे ते नाकारता येत नाही. हे कर्तव्य बजावण्याची शपथ घेऊनच ते या सेवेत रूजू झालेत. ज्याप्रमाणे सीमेवर जवान देशाच्या शत्रुशी लढत असतो अगदी त्याचप्रमाणे पोलीस देशाअंतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीशी लढा देत असतो. दंगल झाली... आंदोलन झाले की, पोलीस दगडफेकीसारख्या घटनांचा सामना करत उन्ह पावसाची तमा न बाळगता खडा असतो, महाराष्ट्राच्या नक्षली भागात झालेल्या हल्ल्यात कितीतरी पोलीस शहीद झाले आहेत.

26:11 सारख्या अतिरेकी हल्ल्यात प्राणाची बाजी लावत पोलिसांनी कर्तव्य बजावले. या हल्ल्यात अतुलनीय असे शौर्य दाखवत पोलिसांनी इतिहास घडवला. सातारा जिल्हय़ातील तुकाराम ओंबळेंसारख्या पोलीस कर्मचाऱ्याने दहशतवादी अजमल कसाबला जीवाची बाजी लावून पकडले. या वर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील १७ कर्मचारी शहीद झाले आहेत.

महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा येथे नक्षली हल्ल्यात १५ कर्मचारी शहीद झाले. चंद्रपूर जिल्हयात वरोरा पोलीस स्टेशन हददीत नाकाबंदी दरम्यान जनावरांच्या अवैध वाहतुकीला प्रतिबंध करणाऱ्या पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांना जीव गमवावा लागला. लोकसभा निवडणूकीदरम्यान अरमोरी पोलीस स्टेशनने लावलेल्या नाकाबंदीवेळी पोलीस नाईक केवल राम येलोरे यांनी कर्तव्य बजावताना आत्माहुती द्यावी लागली.

अनेकदा घराबाहेर पडणाऱ्या पोलीसांना पुन्हा घरी कधी व कशा रुपात परत यावे लागेल याची कल्पना पण नसते. अगदी साधी व किरकोळ वाटणाऱ्या छोटया कारवाईवेळी संशयितांच्या हिंसक पावित्र्यामुळे पोलिसांना शारिरीक इजांना बळी पडावे लागल्याची उदाहरणे ज्ञात आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात पोलिसांनी एक ना अनेक धाडसी कामगिरी बजावल्या आहेत. मात्र याच इतिहासात आणि वर्तमानात पोलिसांना समाजाकडून मिळणारी वागणूक पोलिसांची खंत वाढवणारी आहे. कर्तव्य बजावताना जीवन संपलेल्या पोलिसांना किंवा हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलिसांना समाजाकडून दुजाभावाची वागणूक मिळते ही खंत वाढत चालली आहे. पोलीस शहीद झाल्यास...कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना योग्य वेळेत सेवा मिळत नाही.

ज्याने उभे आयुष्य देशसेवेत घालवले त्या पोलिसांच्या कुटूंबाची फरपट डोळय़ात पाणी आणणारी असते. तरी पण पोलिसाची कर्तव्यावरील निष्ठा तसू भरही कमी होत नाही हे विशेष.

आज समाज बदलत चालला आहे. वास्तविक जानेवारी 1960 मधे राज्याच्या पोलीस प्रमुखांच्या बैठकीत पोलीस शहीद दिनाची संकल्पना मांडण्यात आली. सन 2012 पासून राष्ट्रीय स्तरावर दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील पोलीस स्मारकाचे ठिकाण पोलीस शहीद परेड घेण्यास खुले झाले. देशाच्या एकात्मता व सुरक्षिततेसाठी पाईक असणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी पोलीस शहीद दिनाचे आयोजन करण्यात येते. सन 1959 च्या शिशिर ऋतुपर्यंत 2500 कि. मी. लांबीची भारत चीन सीमारेषेचे संरक्षण करण्याची जबाबादारी पोलिसांकडे होती.

20 आक्टोंबर 1959 ला हॉटस्प्रिंग येथे ईशान्येकडील दिशेने चिनी सैन्याने आक्रमण केले. यावेळी शुर वीर पोलिसांनी आक्रमणाला जीवाचे मोल देऊन सडेतोड उत्तर दिले.

या शूर वीरांचे स्मरण स्फूर्तीदायक ठरावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर हा पोलीस शहीद दिन म्हणून आयोजित केला जातो. हे शौर्य इतिहासात गौरवशाली स्मृतीचिन्ह बनले. सीमेवर जवान जे शौर्य दाखवतात अगदीच तसेच शौर्य पोलिसही दाखवतात. शहीद पोलीस जवानाच्या शौर्याची गाथा गायलाच हवी...त्यासाठी हातात मेणबत्ती घेऊन कॅन्डलमार्च निघायलाच हवा... शहीदांच्या कुटूंबियांना मानसन्मान मिळालाच पाहिजे, कारण शहीदांनी देशासाठी प्राणाची आहूती दिली आहे. अगदी तसेच शहीद पोलिसांच्याबाबतीतही समाजाकडून वस्तुनिष्ठ कामगिरीचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे. खाकी वर्दीचा अभिमान बाळगत समाजासाठी धडपडणाऱ्या पोलिसांनाही मानसन्मान मिळायला हवा. हा मानसन्मान इतर पोलिसांतील कर्तव्यदक्षता वाढीस लावणारा ठरेल.

मितेश घट्टे

अतिरीक्त पोलिस अधिक्षक पुणे

Updated : 21 Oct 2021 7:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top