Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोदी समर्थक ते भारत जोडोच्या वाटेपर्यंतचा प्रवास...

मोदी समर्थक ते भारत जोडोच्या वाटेपर्यंतचा प्रवास...

मोदी समर्थक ते भारत जोडोची वाट चालेपर्यंतचा डॉ. अभिजीत कदम यांचा रोमांचक वैचारिक परिवर्तनाचा प्रवास वाचा या लेखात....

मोदी समर्थक ते भारत जोडोच्या वाटेपर्यंतचा प्रवास...
X

अगदी २०१४ पर्यंत सर्वसामान्य मध्यवर्गीय लोकांसारखे मला देखील राजकारण म्हणजे काहीतरी गलिच्छ अनैतिक आहे असच वाटायचं. राजकारणात स्थित्यंतर घडवून आणणारा काळ २०१३-२०१४ हा होता. जनता काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्याच्या मनस्थितीत होती. त्याचवेळी देशाच्या क्षितिजावर भारताच्या नव्या गांधीचा उदय होत होता. लोकपाल , २ जी स्पेक्ट्रम सारख्या विषयांना भारतीय मिडियाने घरघरात नेऊन ठेवलं होतं. भारावून जायचे दिवस होते ते. अगदी दोन अडीच आठवडे रामलीला मैदानावर झालेलं लोकपाल आंदोलन हे भारताचा दुसरा स्वातंत्र्य लढा होऊ पहात होते. त्या लढ्यातील शिलेदार आज कितीही अमान्य करत असले तरी त्याने सत्तांतराची पार्श्वभुमी तयार केली होती. ती किती योग्य अयोग्य हा प्रश्न वेगळा पण त्यासाठीची भूमी तयार झाली होती. कळत न कळत मी देखील या सत्तांतराचा भाग झालो होतो , अगदी डोक्यावर "मै भी अण्णा" वैगरे लिहलेली टोपी घालुन फिरलो नसलो तरी जे होतंय ते योग्य होतंय आणि काँग्रेस हा देश चालवायला लायक नाही या मतावर मी आलो होतो.

माझं मत किती तकलादू आहे हे कळायला जास्त वेळ देखील लागला नाही. अगदी वर्षा दोन वर्षात नवीन सत्ताधाऱ्यांनी मला पुनर्विचार करायला भाग पाडलं. मी देशाचा प्रधानमंत्री नाही तर प्रधान सेवक आहे म्हणत संसदेच्या पायरी वर माथा टेकवण्याच्या कृतीने एके काळी भारावून गेलेलो. हळु हळु देशातील राजकारणाला उत्सवाचं स्वरूप येऊ लागले. प्रत्येक गोष्टीचा उत्सव होऊ लागला आणि संसदेच्या पायरीवर माथा टेकवने ही उत्स्फूर्त क्रिया नसून उत्सवाचा एक भाग असल्याची जाणीव हळूहळू होऊ लागली. या राजकीय उत्सवाने पुढे पुढे तर अगदी अस्थी कलश मिरवणुक वगैरे पर्यंतचा कळस गाठला. उत्सवप्रिय भारतीय जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले गेले आणि सत्तांतर घडवून आणले ही बाब प्रकर्षाने जाणवू लागली.

या सगळ्या घटनेचे आपण मुक साक्षीदार होतो , किंबहुना आपण याचे मुक समर्थक होतो ही सल मनात कित्येक दिवस होती. आणि कदाचीत यामधूनच काहीही झालं तरी ' भारत जोडो यात्रेत ' सहभागी व्हायचं हे मनोमन ठरवलं होतं. कुठे , कधी आणि कसे सहभाग नोंदवायचा हे माहीतही नव्हतं. महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या टप्यात शेगाव मध्ये यात्रेत सभागी झालो. राजकीय सभेचं एवढं विराट रूप पहिल्यांदा पाहिलं. ही गर्दी उस्पूर्त होती , नुकत्याच झालेल्या दोन्ही दसरा मेळाव्याचे उच्चांक मोडणारी होती , गर्दीला शिस्त होती , गर्दीच्या डोळ्यात आस होती , नव्या भारताची स्वप्न होती. सभेनंतर दुसऱ्या दिवशी पदयात्रेत चालायचा निर्णय घेतला. जमल तर कन्हैय्या कुमार सोबत चर्चा करायची एवढाच उद्देश होता कारण गर्दी पाहता राहुल गांधीना भेटणे अशक्य होतं. पण नियतीच्या मनात वेगळच होतं.

१९ नोव्हेंबर , इंदिरा गांधींच्या जयंती दिवशी यात्रेत सामिल झालो. इंदिराजींच्या जयंती मुळे यात्रेत त्या दिवशी जास्तीत जास्त महिला राहुलजी ना भेटतील असं आधीच सांगण्यात आले होते त्यामुळे राहुल सोबत भेट होणारच नाही या भावनेनेच चालत होतो. परंतु सकाळच्या पहिल्या सत्राच्या पदयात्रेनंतर दुपारच्या विश्रांती काळात अचानक पणे अपघातानेच राहुलला भेटायचा योग आला. ती घटना आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना होती. दुपारच्या वेळेत रोज राहुलजी काही आमंत्रित लोकांना भेटून त्यांचे प्रश्न समजावून घेतात. ही भेट अनौपचारिक असते तसेच या वेळी मिडिया ही सोबत नसते. ऑफ कॅमेरा राहुलजी जास्त खुलतात असं या भेटीनंतर वाटून गेलं.

एका प्रचंड अभ्यासू , धीर गंभीर , विद्वान , आणि अध्यात्मिक भारतीय राजकारणी अशी या तासा दीड तासात राहुलजी बाबतची प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. भारत जोडो यात्रा ही आपल्यासाठी एक तपस्या आहे हे राहुलजी नी वेळोवेळी सांगितले पण त्यांना भेटल्या नंतर त्याचा खरा अर्थ समजला. रोज पंचवीस किलोमीटर गर्दीत चालणे ते देखील देशातील वातावरण प्रचंड विखारी असताना ही एक प्रकारे तपस्याच आहे. डोळ्या देखत आपल्या आज्जी आणि वडिलांचे बलिदान पाहिले असताना देखील राहुलजी अगदी सहजतेने गर्दीत मिसळतात. तुमच्या सोबत बोलताना कुठेही तुम्हाला तो आपल्यापेक्षा वेगळा आहे असं वाटत नाही. घरातील एखाद्या सदस्या सोबत बोलावं इतक्या सहजतेने तो तुमच्या सोबत बोलतो , तुमचं म्हणणं ऐकतो. त्याच्या डोळ्यात कमालीची आपुलकी जाणवते , स्पर्शात आपलेपणा जाणवतो. भारत जोडो यात्रेतील असंख्य फोटो पाहून खात्री पटते की राहुलचे भाव नैसर्गिक आहेत . त्याच्या बोलण्यात , स्पर्शात , अलिंगणात कुत्रिमता नाहीच. देशाला प्रेमाने जोडू पाहणाऱ्या नेत्याने आपल्या आचरणातून भारतातील सर्वच राजकारण्यांना यातुन खरोखर एक सुंदर संदेश दिलाय.

भारतीय समाजा पुढील प्रश्नांची त्याला जाण आहे. त्या प्रश्नांची लॉजिकल उकल करण्याची त्याची बौद्धिक कुवत आहे . प्रश्न सोडवण्याची त्याची मानसिक तयारी देखील आहे आणि प्रश्नांच्या सोडवणूकिसाठी एक रोड मॅप देखील आहे. भले तो रोड मॅप आत्ता रॉ स्वरूपात आहे पण त्याने तो प्रचंड वाचनातून , चिंतनातून बनवलेला आहे हे नक्की. उगाचच कोवीड भारतात येण्यापूर्वी राहुल ने त्याची गंभीरता ओळखली नव्हती , उगाचच त्याने प्रचंड आत्मविश्वासाने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील सांगितले नव्हते त्याची ही विधान उदाहरणादाखल घेतली तरी त्याच्या मागे त्याचा अभ्यास , चिंतन आणि परीस्थिती आकलनाची ताकद दिसते.

राहुलजी गंभीर राजकारणी नाहीत ही त्यांची इमेज एका मोठ्या कट कारस्थानाचा भाग वाटावा एवढा तो राजकारणा बाबत सिरियस आहे. खर तर मिडिया ने राहुलची खरी प्रतिमा कधीच सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचू दिली नाही. आपल्या पर्यंत जी पोहचली ती मिडिया फिल्टर प्रतिमाच पोहचली. विरोधकांनी काही मिडिया हाऊस सोबत घेऊन गेल्या दशकात त्याच्या प्रतिमेचे जाणीवपूर्वक हनन केले. तरी देखील तो शांत आणि स्थिर राहिला , घरातील दोन सदस्यांनी देशासाठी बलिदान दिल्या नंतर देखील त्याच्यासोबत केल्या गेलेल्या हिन राजकारणावर देखील त्याने उद्वेग व्यक्त केला नाही. इतकंच काय आपल्या बलिदानाची कधी जाहिरात देखील केली नाही. या सगळ्या गोष्टी कदाचित त्याच्या स्थितप्रज्ञ , ध्यात्मिक वैचारिक बैठकी मुळे शक्य झाल्या असाव्यात. मध्यंतरी प्रसार माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देताना देखील त्याने आपण करत असलेल्या विपश्यनेबाबत खुलासा केला होताच.

देशातील ,शेतकरी ,आदिवासी, दलीत , ओबीसी वर्गाच्या समस्यांचा राहुलचा प्रचंड अभ्यास आहे. जयराम रमेश हे वेळोवेळी बोलतात पण त्या दीड तासांमध्ये त्या अभ्यासाची झलक दिसली. राहुलजी च्या मते हा कष्टकरी वर्ग हा या देशाचा खरा बॅक बोन आहे. जोपर्यंत हा वर्ग स्वतःची ताकद ओळखत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय इच्छशक्ती एक भाग आहे पण या वर्गाने स्वतचे उत्पादक क्षमता ओळखायला हवी. त्यांच्या बाबत केवळ मनात आस्था आणि भाषणात कणव दाखवून प्रश्न सुटणार नाहीत. या लोकांनी एकत्र होऊन व्यवस्थेकडून स्वतःचे हक्क घेतले पाहिजेत आणि ताठ मानेने वावरले पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तो पर्यंत देश विकसित होणार नाही कारण हे लोक खरे उत्पादक आहेत. देशातील सर्व उत्पादन हे या लोकांच्या घामातून होते.

काँग्रेस बद्दल त्याचे विचार अत्यंत स्पष्ट आहेत. काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा आहे हे वाक्य त्याच्या लेखी केवळ बोलण्या दाखल नाही. बँकांच राष्ट्रीय करण करणारी विचारधाराही काँग्रेसचीच होती आणि नव्वदच्या दशकात खाजगीकरनाचा मार्ग स्वीकारणारी ही काँग्रेसच होती. काँग्रेस मधे एकाच वेळी अनेक मतप्रवाह असतात ज्या वेळेला जो मतप्रवाह ताकदवान असतो त्या बाजुला काँग्रेस झुकते हे राहुलजीच स्वतःच निरीक्षण त्यांनी प्रांजलपणे कबूल केलं. पक्षांतर्गत लोकशाहीचं याहून सुदंर दुसर उदाहरण ते काय असेल ? संविधानाने देशातील दलीत, आदिवासी , गरीबांना दिलेल्या अधिकारांना तो सर्वात मोठी पॉवर ट्रान्स्फरमेशन मानतो आणि संविधान कमकुवत करून हे पॉवर ट्रान्स्फरमेशन परत रिव्हर्स करत देशातील मुठभर उद्योगपतींच्या हाती जाऊ नये म्हणून तो तुम्हा आम्हाला जागृत करण्यासाठी कन्याकुमारी पासुन चालतोय न थकता . त्याच्यासाठी ही लढाई सोपी नाही पण याची त्याला कल्पना आहे. तो जिंकेल , त्यासाठी वेळ लागेल पण जोपर्यंत जिंकत नाही तो पर्यंत तो नक्की थांबणार नाही. त्याच्या या प्रवासाठी त्याला खुप खुप शुभेच्छा. शक्य असेल तेंव्हा शक्य होईल त्या ताकदिने मी त्याच्या सोबत असेल.

Updated : 24 Nov 2022 7:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top