Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > लासलगाव बाजार समिती आणि अमावस्या

लासलगाव बाजार समिती आणि अमावस्या

लासलगाव बाजार समिती आता अमावस्येला सुरु राहणार आहे. मात्र, बाजार समितीने हा निर्णय अंधश्रद्धेच्या विरोधात म्हणून घेतला की आर्थिक कारणामुळे... वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा श्रद्धा अंधश्रद्धेच्या पलीकडे जाऊन आर्थिक ध्येय धोरणांचा उलगडा करणारा लेख

लासलगाव बाजार समिती आणि अमावस्या
X

लासलगाव बाजारसमिती स्थापन झाल्यापासून गेली ७४ वर्षे एक अंधश्रद्धेवर आधारित प्रथा पाळली गेली की अमावास्येला कांद्याचा लिलाव बंद होता. कारण अमावस्येचा दिवस "वाईट" असतो! (हा शुद्ध भांडवलशाही जगभरातील स्टॉक मार्केट / कमोडिटी मार्केट मधील मूलभूत फरक; जी सार्वजनिक सुट्यांना बंद असतात पण त्यांना अपवित्र असे काही नसते)

कांद्याच्या सीझनमध्ये लासलगाव मार्केटमध्ये १५,००० टन ते ३०,००० टन कांद्याची खरेदी विक्री होते; लिलाव एक दिवस बंद ठेवला की दुसऱ्या दिवशी तेवढाच कांदा येऊन थडकतो. पुरवठा वाढल्यामुळे आणि मागणी मात्र समतळावर राहिल्यामुळे पुढचे काही दिवस भाव पडतात आणि कांद्याला / म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते.

आता शेतकरी सभासदांच्या दबावामुळे लासलगाव बाजार समितीने ही प्रथा बंद केली. हजारो लेक्चर्सनी जे काम होऊ शकले नसते ते झाले, कारण शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताआड अमावास्येची अंधश्रद्धा येत आहे.

अमावस्येला इतरही काही बाजारसमित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्याची प्रथा होती / आहे; ती देखील बंद होत आहे.

याचे फक्त स्वागत करून न थांबता त्याचे अन्वयार्थ लावण्याची गरज आहे.

आपल्या देशात ठायी ठायी अशा अनेक प्रथा पाळल्या जातात; त्यातील काही अघोरी प्रकारात मोडतात. लोकशिक्षण करावेच लागेल; जे अनेक जण करत आहेत; अमानवी, अघोरी प्रथांविरुद्ध, विशेषतः स्त्रिया व लहानमुलांच्या हितासाठी कायदे, दंडसत्ता वापरावी लागेल.

पण त्याच जोडीला अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये उत्पादक भांडवलशाही, मार्केट, आर्थिक संरचना यांचा देखील खूप मोठा वाटा आहे हे लक्षात घ्यायला लागेल.

भांडवलशाही / मार्केट / भांडवली उत्पादन संबंध या काही एकसंघ संकल्पना नाहीत; त्यात कितीतरी शेड्स आहेत.

त्यातील अर्थव्यवस्थेला / मानवी समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या कशा वाढतील, पसरतील, मुळे पकडतील हा देखील आपला अजेंडा असला पाहिजे.

संजीव चांदोरकर (११ जून २०२१)

Updated : 12 Jun 2021 6:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top