Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोण आहे महाराष्ट्राच्या पैलवानाचा सवंगडी ?

कोण आहे महाराष्ट्राच्या पैलवानाचा सवंगडी ?

‘मुदगल’ म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? महाराष्ट्राची शान असलेल्या पैलवानाचा सवंगडी कोविड काळात सातासमुद्रापार कसा पोहचला? लोकांच्या आरोग्याचा व्यवसायाशी सांगड घालणारा प्रशांत साजणीकर यांचा लेख नक्की वाचा..

कोण आहे महाराष्ट्राच्या पैलवानाचा सवंगडी ?
X

चांदणी चौकातुन मुळशीकडे जाणार्‍या रस्त्यावर एका ठिकाणी मुदगल विकायला ठेवलेले पाहिले आणि एकदम कुतूहल जागे झाले. हा प्रकार असा रस्त्यावर विकायला ठेवलेला मी प्रथमच पहात होतो. तालमीत आवर्जून दिसणारा हा मुदगल इतर ठिकाणी सहसा नजरेस पडत नाही. स्पोर्टच्या दुकानातही तो मिळणे कठीण. हल्ली घराघरात डम्बेल्स, सायकली आणि व्यायामाचे इतर अनेक प्रकार आणि मशीन्स आली असली तरी मुदगल तसा दुर्लक्षितच राहिला आहे. तो घ्यावा असा विचार मनात येईपर्यत गाडी पुढे निघून गेली.

मागच्या दौर्‍यात मुदगल घ्यायची इच्छा अपुर्णच राहिली. त्यामूळे यावेळी मी मात्र पुन्हा त्या रस्त्याने जाताना अगदी सावध होतो. नजर पुन्हा त्या मुदगल विकणार्‍याला शोधत होती. आणि नेमका पुन्हा तो दिसलाच. या वेळी मात्र तो केवळ स्कुटरवर मुदगल ठेवुन कोणाशी तरी बोलत उभा होता. लगेच गाडी बाजूला घेऊन मी त्याला विचारले की विक्रीसाठी आहेत का तर हो म्हणाला. कार्पोर्रेशनची गाडी येणार म्हणुन अजुन त्याने धंदा लावला नव्हता.मुदगल घेता घेता मग गप्पा सुरु झाल्या. जाकीर मुजावर असे त्याचे नाव. सासवड जवळ बेलसरचा राहणारा. जाकीर आणि त्याचे बंधु जाबीर, जावेद यांचा कोवीड यायच्या आधी हॉटेलचा व्यवसाय होता. कोविडने जसे इतर अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले त्यात पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिक सर्वात जास्त भरडले गेले. लॉकडाऊनच्या काळात काय करायचं हा प्रश्न होता. मुजावर बंधुं हार माननारे नव्हते. त्यांनी एकत्र बसून काहीतरी नवीन उद्योग करावा असावा असा विचार केला. त्यात हा मुदगल किंवा मोगरी किंवा गदा ज्याला म्हणतात ते विकावं असा विचार त्यांच्या मनात आला.

लॉकडाउनच्या काळात एव्हाना चांगले आरोग्य असणे हे किती महत्वाचे आहे हे लोकांच्या लक्षात आलं होतं. बाहेर फिरण्यावर बंदी आलेली, जिम बंद झाल्यामुळे घरी बसून व्यायाम करता येईल अशी साधने लोकांना आवडतील हे मुजावर बंधूंच्या लक्षात आले. मुदगल विकण्याचा निर्णय झाल्यावर ते कसे आणि कुठे तयार करतात, त्यासाठी कोणते लाकुड लागते याची माहिती घेतली. बाभळीचे लाकुड प्रामुख्याने यासाठी वापरले जाते. मग हे तयार करण्यासाठी कुशल सुतार शोधुन काढले आणि हा व्यवसाय सुरु केला.

रस्त्यावर माल विकण्यात काहीच कमीपणा नाही उलट लोकांचा प्रतिसाद पाहून आम्हाला हुरुप आल्याचे जाकीर सांगत होता. हा प्रकार तसा नवा आहे. शहरात मिळणे कठीण. म्हणून मुदगल पाहिल्यावर लोक कुतूहलापोटी खूप प्रश्न विचारतात. अगदी दोन किलोपासून ते दहा, पंधरा किलोचे मुदगल तयार केले जातात. यापुर्वी लोकांचा असा समज होता मुदगल हे केवळ पैलवानच वापरतात. परंतु आता सर्वसामान्य लोकही व्यायामासाठी मुदगलचा वापर करायला लागले आहेत. मुगदल हा खूप जुना परंपरागत व्यायाम प्रकार असून यामुळे तयार होणारी बॉडी जास्त काळ टिकते असं जाणकार सांगतात. तो वापरायलाही सोपा आहे. अनेकजण हौसेने मुदगल खरेदी करु लागले आहेत. काहीजण तर वेगवेगळ्या वजनाचा सेट खरेदी करतात.

अनेक व्यापार्‍यांनी आमच्याकडे मुदगलाची मागणी केली असली तरी आम्ही तो थेट गिर्‍हाईकांना देण्याचे धोरण ठेवले आहे असे त्याने सांगितले. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरहुन याला मागणी आहेच पण आम्ही अगदी लंडनपर्यंत माल पोचवला असल्याचे जाकीर अभिमानाने सांगत होता. हॉटेल व्यवसायात मिळाला नाही इतका आनंद आणि समाधान या व्यवसायात मिळाल्याचे त्याच्या चेहर्‍यावरुन जाणवत होते.

मी दोन मुदगल त्याच्याकडून घेतले. व्यायामाचा प्रकार म्हणुन ते फार उत्तम आहेतच परंतु दिवाणखाण्यात नुसते उभे केले तरी घराची शोभा वाढवतील इतक्या सुबक पध्दतीने तयार केले आहेत. इच्छाशक्ती आणि कल्पकता असली तर प्रतिकूल परिस्थितीवरही कशी यशस्वीपणे मात करता येते याचे मुजावर बंधू हे उत्तम उदाहरण आहे. ऑर्डर केली तर ते मुदगल घरपोचही करतात. पहिल्या कमेंटमधे जाकीरचा मोबाईल दिला आहे.

Updated : 17 Sep 2021 10:38 AM GMT
Next Story
Share it
Top