Home > मॅक्स ब्लॉग्ज > मातंग समाजाची जातीय कोंडी: चिंता आणि चिंतन

मातंग समाजाची जातीय कोंडी: चिंता आणि चिंतन

मातंग समाज आजही समाजाच्या मुख्य प्रवाहात का येऊ शकत नाहीये, मातंग समाजातील तरुणांनी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि कोणत्या तत्वांचा अवलंब केला पाहिजे याचे परखड विश्लेषण केले आहे. प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी....

मातंग समाजाची जातीय कोंडी: चिंता आणि चिंतन
X

जातीय व्यवस्था हे भारतीय समाजाचे ठळक वैशिष्ट्य आहे आणि जातीव्यवस्थेचे पालन करणे हाच या व्यवस्थेचा धर्म मानला जातो. ही जातीव्यवस्था आज एकविसाव्या शतकातही टिकून आहे. एवढेच नव्हे तर जातीच्या उच्च निचतेसाठी इतर जातीच्या लोकांवर हल्ले होत असल्याचे नेहमीच निदर्शनास येते. अशा घटना महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घडत असून त्यातून मातंग समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येते.

नुकतीच सोलापूर जिल्यात माळसिरस तालुक्यात माळेवाडी बोरगाव येथील मातंग समाजातील एका मयत व्यक्तीचे प्रेत सार्वजनिक स्मशानभूमीत नेण्यास सवर्णांनी विरोध केल्याने अंत्यविधी ग्रामपंचायती समोर करावा लागला. जिवंतपणी भोगावी लागणारी जातीय हिंसा मरणानंतरही संपत नाही हे सिद्ध करणारी ही घटना तर चंद्रपूर जिल्ह्यात जिवती येथे भानामतीच्या संशयावरून मातंग परिवाराला सहन करावी लागलेली मानहानी व अत्याचार या ठळक घटना दलित समाजाची आजही कशी जातीय कोंडी होते याची उदाहरणे आहेत. अशा घटना या आधीही महाराष्ट्रात अहमदनगर, बीड, लातूर,नांदेड,जालना, औरंगाबाद, जळगाव अशा काही भागात सर्वाधिक प्रमाणात घडलेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर चिंता आणि चिंतन सर्व पातळीवर होणे गरजेचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील अस्पृश्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व आर्थिक क्षेत्रात स्वावलंबी होण्याचा मुलमंत्र दिला. त्या विचार प्रवाहात ज्या जाती – जमाती प्रवाहित झाल्या त्यांना स्वावलंबन व स्वाभिमानाचा मार्ग प्राप्त झाला. परंतु हा स्वाभिमान व प्रगतीचा मार्गही येथील उच्चवर्णीयांना सहन झाला नाही. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात सुध्दा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जातीयता व श्रेठत्वाच्या नावाखाली अन्याय, अत्याचार थांबले नाहीत. वास्तविक जातीयता पाळणे हा कायद्याने गुन्हा ठरविला गेला आहे तरीही लोकांना भीती वाटत नाही त्याचे महत्त्वाचे कारण कायदे केले तरी लोकांची मानसिकता बदलली नाही. त्यामुळे आज उच्चशिक्षित समुदायातही जातीयता जपण्याचाच प्रयत्न होतो ही आजची विदारक सामाजिक परिस्थिती आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आजचे चित्र पाहिले तर असे निदर्शनास येते की मराठवाडा व खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मातंग समाजातील लोकांना लक्ष्य करून अन्याय अत्याचार केले जात आहेत. अशा पध्दतीने मातंग समाजाला उच्चवर्णीयांकडून लक्ष्य का केले जात असावे याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला तर असे स्पष्ट करावे होते की, महाराष्ट्रात बौध्द समाज बांधवांनंतर मागासवर्गीय समूहात मातंग ही सर्वांत मोठी जात असून सुमारे 66.84% लोक ग्रामीण भागात राहतात ( जनगणना २००१ ) व त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे गावातील गावकीवर अवलंबून आहे. त्यामुळे या समाजाची मानसिकता गावकीशी जुळवून घेण्याची व प्रसंगी अन्याय सहन करण्याचीही असल्याचेही अनेकवेळा जाणवते.

महाराष्ट्रात मातंग समाजाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती अन्य मागासवर्गीय समूहाच्या तुलनेने व लोकसंख्येचा विचार करता अत्यल्प आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मातंग समाजाचे शैक्षणिक व साक्षरतेचे प्रमाण ५१.33 % आहे. शिक्षणाचा अभाव असल्याने जागृतीचे वारे मंद गतीने वाहते आहे. शैक्षणिक प्रगती नसल्याने स्वावलंबन, स्वाभिमान, आत्मभान कमी असल्यामुळे शोषक वर्गाची अत्याचारी भूमिका बळावते. ग्रामीण भागात अन्य जाती समुदायाचे ज्याप्रमाणे दबाव गट असतात किंवा राजकीय क्षेत्रात खंभीरपणे वावर असतो. त्याप्रमाणे मातंग समाजात कोणत्याही क्षेत्रात विशेषत: ग्रामीण भागात दबावगट अस्तित्वात नाहीत त्यामुळे अनेक वेळा 'मुकी बिचारी – कुणीही हाका' अशी स्थिती होते.

ग्रामीण भागातील कोणत्याही समाजात धार्मिक बाबतीत ताठरता असते व सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा – परंपरांचे इतरांनी पालन करावे असा ग्रामीण भागात सूर असतो. त्यामुळे 'प्रथा मोडणे' हा गुन्हा ठरतो. अशा प्रथांचे पालन करणारा व कधीतरी विरोध करणारा ग्रामीण भागातील मोठा समुदाय म्हणजे मातंग समाज आहे. त्यामुळे प्रथा – परंपरा व बुरसटलेले रिवाज मोडणाऱ्यां वर हल्ले करण्याचे प्रमाण वाढत आहे.

महाराष्ट्रातील मातंग समाजाचे राजकारणातील प्रतिनिधित्व ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेतही वेगवेगळ्या पक्षातून दिसते. मात्र मातंग समाजाचे बहुसंख्य प्रतिनिधी हे केवळ 'सह्याजीराव' असतात व प्रस्थापितांच्या ताटाखालचे मांजर होवून पदे पदरात पाडून घेण्यात मग्न असतात. त्यामुळे अशा मंडळीचा धाक उरत नाही कारण स्वत:च्या हक्क – कर्तव्याचेही भान नसलेली कित्येक गावातील मंडळी राजकारणात जातात व अन्य धनदांडगी व जात दांडगी मंडळी अशा लोकांचा कडीपत्यासारखा (युज अॅीन्ड थ्रो) वापर करतात.

महाराष्ट्रात मातंग समाजात अलिकडे बुध्दीवंताचा एक वर्ग अस्तित्वात आलेला आहे, परंतु अशा अन्यायकारक घटनांवर प्रतिक्रिया देण्यासही असे मध्यमवर्गीय सुशिक्षित व बुध्दिवंत लोक धजावत नाहीत. कित्येक समूह भौतिक प्रगतीत रमल्याने बौध्दिकदृष्ट्या उपेक्षितच राहिले. त्यामुळे ' थिंक टॅंक' ची सर्वांधिक वानवा या समाजात जाणवते ' 'नरो वा कुंजरोवा' अशी भूमिका घेणाऱ्यां चे प्रमाण अधिक असल्याने गरीब वंचित व दुर्बल असलेल्या ग्रामीण भागातील मातंग बांधवाकडे दुर्लक्ष होताना दिसते.

आज महाराष्ट्रात सर्वाधिक प्रगत समूह म्हणून आज बौध्द समाजाकडे पाहिले जाते. स्थलांतर व धर्मांतराने बौध्द बांधवांची वैचारिक प्रगती प्रचंड आहे. मातंग समाजाने मात्र समतेचा व मानवतेचा धर्म नाकारून विषमतामूलक पारंपारिक धर्मातच राहणे पसंत केले. त्यातून विद्रोहाची धार बोथट राहीली. त्यामुळे अन्यायाची चीड निर्माण होत नाही व बंडाची सर्वांगीण तयारी व सामूहिक पाठिंबा मिळत नाही.

मातंग समाजाची वर्तमान वस्तुस्थिती पाहिले तर असे म्हणावे लागेल की, आज मातंग समाजाकडे संपूर्ण व्यवस्थेचे दुर्लक्ष झालेले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीत बेदखल झालेला हा समाज नेतृत्वाच्या शोधात आहे कारण प्रस्थापित सरकारकडून मातंग समाजाला भावनेच्या राजकारणाचे बळी बनवून आश्वासनाचे गाजर दाखवित झुलविले जात आहे. दूरदृष्टीच्या विकासाऐवजी स्मारके, पुतळे यांच्या भावनाप्रधान राजकारणात मातंग समाज पुन्हा अधोगतीला चालला आहे. ग्रामीण भागातील मातंग समाज असंघटितपणे, प्रस्थापितांच्या वळचणीने उदरनिर्वाह करीत आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिकरूपाने मातंग समाज संघटीत होत असला तरी हे आदर्श पुरेसे ठरणार नाहीत, तर बुध्द,लहु, फुले, शाहू आंबेडकर, मुक्ता, आणि अण्णा भाऊ यांच्या विचारांचा अधिक जोरकसपणे स्वीकार हवा. त्यात आरक्षणाच्या चळवळीमुळे (या चळवळीतील मुद्दे नीट समजून न घेता) गैरसमजातून कांही प्रमाणात बौध्द, मातंग दुफळी माजविण्याचाच खटाटोप काही, मातंग, बौद्ध व उच्चवर्णीय मंडळी करीत आहेत. त्यातून गावागावातील मातंग समाजाला एकटे पाडून आपल्या राजकारणाची झोळी भरण्याचा गोरखधंदा काही मंडळी करीत आहेत. तर काही दलित कार्यकर्ते 'लढायला आम्ही आणि फायद्याला मातंग' अशा अपप्रचारातून मातंग समाजावरील हल्ल्याच्या घटनेत सुध्दा 'तुम्हीच लढा' अशा धोरणाने दलित ऐक्य धोक्यात येऊ लागले आहे.( मातंग समाज आंबेडकरी चळवळीत अग्रेसर होता हे समजून घेण्यासाठी ' आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज'हा ग्रंथ नक्की वाचावा)

दुसऱ्याह बाजूला मातंग समाजाच्या संघटनांची अवस्था ' एक ना धड भाराभर चिंध्या' अशी झालेली आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही प्रमाणात संघटनात्मक काम चालू असले तरी अशा नेत्यांचा काही अपवाद वगळता मातंग समाजाचा वास्ताविक विकास कसा होईल याचे वैचारिक भान अजून आले पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. त्यात या समाजात सर्वच बाबतीत प्रचंड उदासीनता जाणवते, शिवाय उच्चशिक्षितांचे मौन ही सुध्दा मोठी समस्या झालेली असून काही मंडळी आपल्या अभिमानी इतिहासातच रमलेली दिसून येते. शिका,संघटित व्हा, संघर्ष करा या त्रिसूत्रीचा स्वीकार झालेला नाही. त्यामुळे सर्व आघाडीवर आज मातंग समाज नेतृत्वहीन होताना आपण पाहतो.

आजच्या मातंग समाजात तीन समूह आढळतात. पहिला समूह कट्टर मातंगांचा असून परंपरा व इतिहासाच्या अभिमानात गर्क असलेला हा सर्वाधिक समूह आहे. केवळ भावनिक अभिमान व जातीचीच प्रेरके जपण्यात त्यांना धन्यता वाटते. दुसरा समूह मध्यम व आंबेडकरवादाकडे झुकलेला समूह असून त्या समूहात भौतिक व बौध्दीक प्रगती मंद गतीने होत असून पुरोगामी महापुरुषांना प्रेरक मानून समाजसुधारणेची चिंता व चिंतनात हा समूह अग्रेसर आहे. तर तिसरा समूह वैचारिक परिवर्तनवादी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनोमन स्वीकारलेला व बौध्दधर्माकडे धर्मांतरीत होत असलेला तसेच आत्मभान, समाजभान आलेला आणि समाजविकासाचे अंतिम ध्येय समजलेला असा पुरोगामी चळवळीला प्रेरक कार्य करणारा असा समूह आहे.

ही वस्तुस्थिती आहे मात्र यापुढील काळात मातंग समाजाने वर्तमानकालीन दशा समजून पुढील दिशा ठरविणे गरजेचे आहे. ज्या गावात, ज्या धर्मात, ज्या रितीरिवाजात कोणताही पूरोगामी विचार जपला जात नाही. अशा गुलामगिरीकडे घेऊन जाणाऱ्याय प्रत्येक बाबींचा त्याग करण्यास सिध्द झाले पाहिजे आणि आपली 'माणूस म्हणून ओळख' कोणत्याही देवामुळे, विषमतावादी धर्मांमुळे, उपासतापास, नवस – सायास, दर्शन, प्रवचन, यात्रा – जत्रा, कंदूरी जागरण अशा अमानुष रितीरिवाजामुळे झालेली नसून बुध्द – लहू - फुले – शाहू –डॉ.बाबासाहेब आंबेडकर – अण्णाभाऊ यांच्या या वैचारिक नेतृत्वामुळे झालेली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कधीच देववाद, दैववाद, अंधश्रध्देचा स्वीकार आणि पुरस्कार केला नाही तर हे विषमतावाद, अंधश्रध्दा, गुलामगिरीचे जग 'घाव घालून, तोडण्याचे आवाहन केले. ज्या क्रांतीवीर लहुजींनी महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीची पायवाट तयार केली, अस्पृश्यांचे पहिले शिक्षक ठरलेले गणू शिवा मांग यांनी शैक्षणिक प्रगती हीच अंतिम प्रगती हे ठणकावून सांगितले व ज्या मुक्ता साळवे हिने त्या काळात ' आम्ही धर्म नसलेली माणसे' असे नमूद केले त्यांचा वारसदार असलेला मातंग समाज आज कोणत्या धर्माचे पालन करण्यात गर्क आहे याचे चिंतन होवून समतावादी धर्माचेच पालन झाले पाहिजे. गावागावात राहणाऱ्याप मातंग समाजाने परंपरेचे झेंडे मिरवण्यापेक्षा एकच 'निळा झेंडा' घरावर लावला तर अन्याय करणाऱ्या च्या उरात धडकी भरते कारण निळा झेंडा हे शक्तीचे, सामर्थ्याचे, चळवळीचे, स्वाभिमानाचे प्रतिक बनला आहे.

मातंग समाजातील स्वत:ला चळवळीचे वाहक समजणाऱ्या संस्था व संघटनांनी हत्य नेतृत्वाची स्पर्धा न करता फुले – शाहू – आंबेडकरांचा राजमार्ग स्वीकारून समाजाला प्रगतीशील मार्गदर्शन करावे. केवळ अण्णाभाऊ आणि लहुजींच्या वाटेने जाऊ लागलो, तर विकासाच्या मार्गाकडे जाता येईल परंतु अंतिम बिंदू गाठता येणार नाही. त्यासाठी लहुजी व अण्णाभाऊंच्या विचाराने शेवटी आंबेडकरवादाकडे जाणे हीच विकासाची खरी वाट आहे हे समजून घेतले पाहिजे आणि समाजाचे 'क्रीम' असलेल्या उच्चविद्याविभूषित वर्गाने सद्सदविवेक बुध्दीने जात्यांध व धर्मांधाच्या आडोशाने केवळ स्नेहसंमेलने न घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच अंतिम क्रांतीचा विचार हे समजून घ्यावे व समाजाला दिशादर्शन करावे. उच्चवर्णीय समूहाला धाक वाटेल अशा पध्दतीने स्वाभिमानी जीवन प्रत्येकाने जगले तर कोणतेही समूह अत्याचार करण्यास धजणार नाहीत त्यासाठी मातंग समाजाने आपल्या हक्क – कर्तव्याची बुज राखून काम करावे. पदे हे मिरविण्यासाठी नसतात तर जो अंगावर येईल त्याला जिरविण्यासाठी असतात याचेही भान ठेवणे गरजेचे आहे आणि हलगी परिवर्तनाचे हे प्रतिक नव्हे तर लेखणी हे प्रतिक आहे. याबरोबरच मातंग समाजातील गावागावात जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेणे ही काळाची गरज बनली आहे. अशा प्रबोधनातून मातंग समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक,शैक्षणिक आणि राजकीय जाणीवा निर्माण करणे महत्त्वाचे आहे .

महापुरूषांनी दिलेली शिकवण गावागावात पेरली तर एकता आणि जागृकता मनामनात निर्माण होईल हे काम वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनी हाती घेतले पाहिजे, तसेच भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली कोणत्याही समूहाकडून होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था सरकारने उभी केली पाहिजे तसेच सर्व बहुजन जाती हातात-हात घेऊन नांदू लागल्या तर अन्यायी प्रवृत्तीला निश्चितच बळ मिळणार नाही आणि मातंग समाज व अन्य कोणत्याही समाजावर जातीय हल्ले होणार नाहीत यात शंका नाही.

लेखकाच परिचय

प्रा. डॉ.सोमनाथ कदम हे कणकवली महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख आहेत. डॉ.कदम यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. मातंग समाजाचा इतिहास, सद्यस्थिती यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानच्या समाज गौरव पुरस्कार पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.

Updated : 30 Aug 2021 3:17 PM GMT
Next Story
Share it
Top