Home > मॅक्स ब्लॉग्ज > " मराठवाडा " आद्य मराठी भाषकांची भूमी ...!!

" मराठवाडा " आद्य मराठी भाषकांची भूमी ...!!

का साजरा केला जातो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ? काय आहे मराठवाडा स्वातंत्र्याचा इतिहास? जाणून घ्या युवराज पाटील यांच्याकडून…

 मराठवाडा  आद्य मराठी भाषकांची भूमी ...!!
X

मराठवाडा हा मराठी भाषकांचा आद्यप्रांत आहे. सातवाहन काळात पहिल्या शतकात भारतभर विविध प्राकृत भाषा बोलल्या जायच्या त्यावेळी प्रतिष्ठान नगरी (आजचे पैठण ) राजधानी असलेल्या या प्रदेशात महाराष्ट्री प्राकृत बोलली जायची नव्हे ती त्यांची राजभाषा होती... एवढेच नव्हे तर पहिला गुनाढ्य कृत लिखित ग्रंथ बृहद्कथा हाही प्राकृत मध्ये लिहला गेला. गोदावरी आणि मन्याड खोरं बालाघाट डोंगर रांगाच्या आसपासचा कमी पाण्याचा पण सुपीक प्रदेश त्यामुळे तगेर ( तेर- ढोकी ) इथं सापडलेल्या प्राचीन अवशेषावरून हा प्रदेश ग्रीक रोमांबरोबर व्यापारी संबंध ठेवून होता याचे पुरावे पुरातत्व तज्ञाकडे आहेत. या अशा सुपीक प्रदेशावर अनेक राजांनी राज्य केले. त्याच्या तुरळक खुणा आज पर्यंत संशोधकांच्या नजरेत आल्या. अजूनही डोळस संशोधन होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

१९०३ मध्ये सीपी ऐंड बेरारच्या विभाजना नंतर इतर भागासारखी शैक्षणिक प्रगती झाली नाही,साम्राज्य विस्तारक आणि आधुनिक जगाच्या विकासाची ओळख करुन देणाऱ्या ब्रिटीशांनी ( ते वाईट होते त्यांनी स्वार्थासाठी का होईना इंग्रजी शिक्षणाची बीज पेरुन भारताला पुन्हा वैश्विक बनविण्याला प्रारंभ केला होता ) मराठवाडा वगळून भारत भर मिशनरीज शाळा सुरु केल्या. इंग्रजी सारखी जगाची ओळख करुन देणारी भाषा अवगत करुन दिली. तो अनुशेष 1948 नंतर अनेक प्रागतीक विचारांच्या लोकांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आलं. शिक्षणासारखं मूलभूत परिवर्तनाचं माध्यम लोक चळवळ म्हणून पुढे आलं. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्राला अनेक बुद्धीजिवी व्यक्ती या भूमीने दिले. ह्या भूमीने मराठी माणसात अमूलाग्र बदल घडविणाऱ्या भागवत संप्रदायाचा पाया घातला...या सुपीक जमिनीत पावसाच्या अल्प प्रमाणामुळे म्हणावं तेवढं पीक आलं नसेल पण मेंदू सुपीक असल्यामुळे अनेक मानवी विकासाच्या चळवळी या भूमीत निर्माण झाल्या. मानवी विकासात नेहमीच प्रागतिक असलेल्या या प्रदेशात भौगोलिक स्थितीमुळे भौतिक विकास तुलनेनी कमी झाला पण इथल्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाने या भौगोलिक स्थितीवर मात करणारे प्रकल्प राबविले. आताही राबविले जात आहेत.

मराठवाड्याला तमाम भारतीयांपेक्षा स्वातंत्र्यासाठी एक वर्ष अधिकची प्रतिक्षाही करावी लागली ती कशी ते पाहण्यासाठी थोडा मागोवा....

१७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदिर्घ लढ्यानंतर हैदराबाद मुक्ति संग्रामाची परिणती १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासना विरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावुन घेतले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला.१ मे १९६० पासून नविन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.

स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.स्वामी रामानंदतीर्थ,गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्तीसंग्रामचे अर्ध्वयू होते. स्वामी रामानंदतीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे मराठी चळवळकर्ते होते. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या बरोबरीने गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत मोलाचे कार्य केले. तसेच या

मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्रवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्रवीरांना मानाचा मुजरा.

सर्व मराठवाडावासीयांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

@युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

(फेसबुक साभार)

Updated : 17 Sep 2021 3:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top