Home > मॅक्स ब्लॉग्ज > मनोहर भिडे वर सरकारची मेहरबाणी का ?

मनोहर भिडे वर सरकारची मेहरबाणी का ?

देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान करणारा, महापुरुषांविषयी सतत गरळ ओकणारा, स्त्रियांना तुच्छ लेखणारा धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारा भिडे कायद्याविरोधात वर्तन करूनही मोकाट आहे. सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही याचे कारण नक्की काय ? वाचा सागर गोतपागर यांचा लेख…

मनोहर भिडे वर  सरकारची मेहरबाणी का ?
X

महात्मा गांधीच्या बाबतीत मनोहर भिडे याने अतिशय गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले. मनोहर भिडेवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केलीय. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत सरकारला धारेवर धरले. आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील भिडेवर कारवाईची मागणी केली आहे.

महात्मा गांधींवर बरळण्याची भिडेची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही त्याने देशाला गांधीवादाच्या रोगाची बाधा झाल्याची गरळ ओकली होती.

देशाला झालेली गांधीबाधा नामशेष करण्याचा बीजमंत्र हा छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज असल्याचे सांगत महात्मा गांधींच्या विरोधात शिवरायांना आणि पर्यायाने शिवभक्तांना उभे करण्याचा शेकडो वर्षाचा पारंपारिक कावा भिडे सातत्याने करत आहे. आपल्याला त्याची वक्तव्ये त्याच्या सभांमधून कधीतरी ऐकायला मिळतात परंतु या द्वेषाच विष भिडे सातत्याने कार्यकर्त्यांच्या डोक्यात भिनवण्याचे काम करत आहे.

एका बाजूला भिडे देशातील क्रांतिकारकांचा गौरव करतो तर दुसरीकडे तो महात्मा गांधींविषयी सातत्याने विष ओकतो. यामागे तरुणांची माथी भडकवने हाच उद्देश असल्याचे त्याचे पूर्वाश्रमीचे धारकरी असलेले वरिष्ठ पत्रकार दत्तकुमार खंडागळे मॅक्स महाराष्ट्रवरील मुलाखतीत सांगतात.

“संभाजी भिडे सातत्याने महात्मा गांधी, महात्मा फुलेंचा द्वेष त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पेरत असतात. फुले देशद्रोही असल्याचे सांगत असतात. पण यावर कुणी प्रश्न विचारल्यास भिडे भर बैठकीत त्या कार्यकर्त्याचा अपमान करायचे. अपमान झाल्यानंतर कुणी सहसा प्रश्न विचारायला धजवत नव्हते. मी त्याचवेळी महात्मा फुलेंचे साहित्य वाचत होतो. मला जसजसे फुले कळत गेले तसतसा मी त्यांच्यापासून लांब गेलो”.

आपली संघटना राष्ट्रभक्ती करते असा दावा करणारा भिडे देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांचा, स्वातंत्र्य दिनाचा देखील अपमान करतो. हा स्वातंत्र्यदिनच साजरा करू नका असे देशद्रोही आवाहन भिडे निर्लज्जपणे करतो. संतापजनक बाब म्हणजे हे देशद्रोही आवाहन देखील शिवरायांनी सांगावा धाडलाय म्हणत छत्रपती शिवरायांच्याच माथी फोडण्याचा शिवद्रोह करतो. धार्मिक विद्वेश पसरवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांच्या रुजलेल्या अस्मितांचा वापर भिडे चतुराईने करतो.

तरुणांच्या डोक्यात देशद्रोहाच्या , धार्मिक, जातीय विद्वेषाच्या विषाची पेरणी करत भिडे राज्यभर फिरतो. यासंबंधी अनेकदा त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झालेले आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणात देखील त्याचे नाव आले होते. परंतु त्याच्यावर ना गुन्हा दाखल होतो. ना त्यांच्यावर कोणती कारवाई होते.

ही कृत्ये करण्यासाठी मनोहर भिडेला कोण फ्री हँड देत आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल. महात्मा गांधींवरील वक्तव्यानंतर भिडेवर अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५३, ५०५(२) त्यासोबतच आयोजक यांच्यावर सुद्धा ३४(अ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण केवळ गुन्हा नोंद करुन चालणार नाही. देशाच्या राष्ट्रीय प्रतिकांचा, महापुरुषांचा अपमान करणारी तसेच धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी मनोहर भिडेची वक्तव्ये देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारी आहेत. त्याचे वर्तन देशाच्या संविधानाविरोधात आहे. याची गांभीर्याने दखल घेत या व्यक्तीला बेड्या ठोकून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली पाहिजे. हे जर होणार नसेल तर गुन्हे करूनही मोकाट असलेल्या भिडेवर सरकारची मेहरबाणी का ? असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.

Updated : 29 July 2023 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top