Home > मॅक्स ब्लॉग्ज > नांदेड हिंसक का होतंय ?

नांदेड हिंसक का होतंय ?

गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावठी बंदुका,लूटमारांनी नांदेडमध्ये अक्षरशः थैमान घातले आहे. वाचा नांदेड येथील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेणारा कुलदीप नंदूरकर यांचा हा लेख

नांदेड हिंसक का होतंय ?
X

गेल्या काही दिवसांपासून नांदेडचे सार्वजनिक वातावरण चिंतेचे वाटावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी गुन्ह्यांच्या संख्येसंदर्भात समाधानकारक स्थिती असलेल्या या शहरात आता गेल्या काही महिन्यांपासून गावठी बंदुका,लूटमारांनी अक्षरशः थैमान घातले आहे..

दहशत दाखवून पैसे,दागिने लुटणे ही तर आता नित्याचीच बाब झालीय. साधारणपणे परभणी ,लातूर,निझामबाद, हिंगोली या शेजारच्या जिल्ह्यांचा वावर तथा ये-जा वाढलेली असल्यामुळे कधी एखादी घटना गुन्ह्याला प्रवृत्त करेल ही बाबा अधोरेखित झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात एका संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यास गेलेल्या एका गोरक्षक तरुणावर १० ते १२ तरुणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला, त्यातच शेखर रामपेल्ली या गोरक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यात अन्य चार गोरक्षक गंभीर जखमी झाले आहेत. यातील मारेकरी तेलंगाणाच्या दिशेने पळूनही गेल्याचे सांगण्यात आले.. ही बाब जिल्ह्याच्या एकूण सामाजिक जीवनाच्या बाबतीत अत्यंत चिंतेची आहे. देशात गोरक्षकांनी गो तस्करांना, गो तस्कर संशयितांना मारहाणीच्या अनेक घटना घडल्या. कायदा हातात घेणे हे येथील गोरक्षकांच्याच जीवावर बेतले आहे. पोलिसांनी याची तातडीने दखल घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा असे आणखी प्रकार घडण्याची शक्यता आहे.

याच महिन्यात पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना नांदेड शहरापासून ३ किमी अंतरावर असलेल्या बोंढार हवेली या गावात घडलीय. १ जून रोजी मागासवर्गीय समाजातील अक्षय भालेराव या तरुणाची खंजरने हत्या करण्यात आली. गावात पहिल्यांदा बाबासाहेबांची जयंती व्हावी यासाठी पुढाकार घेणाऱ्या अक्षय भालेराव याचा जातीयवादी मानसिकतेतून काटा काढण्यासाठीच त्याला १ जून रोजी गावातील एका लग्नाच्या वरातीत मद्यधुंद अवस्थेत हत्यारे घेऊन नाचणाऱ्या आरोपींनी दुकानावर गेलेल्या अक्षयला शिव्या देत ,मारहाण केली आणि खंजर भोसकून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी व प्रत्यक्षदर्शींनी केलाय. याप्रकरणी ९ आरोपींविरुद्ध ऍट्रोसिटी गुन्ह्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले ,९ पैकी ८ आरोपींना पोलिसांनी अटक केलीय त्यापैकी १ फरार आहे..

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे , ज्यांनी अक्षयला मारहाण केली त्या लोकांच्या चेहऱ्यावर आपण एका माणसाला संपविले आहे,त्याची हत्या आपल्या हाताने केली याचं दुःखही चेहऱ्यावर दिवस नव्हतं. दलित मागासर्गीयांवर होणारे हल्ले वा मारहाण नांदेड जिल्ह्याला नवीन नाहीत यापूर्वीही रोही पिंपळगाव, देगाव कुऱ्हाडा या गावात घडलेल्या घटनेतून दलित समाजाबाबत असलेली विषमता,जातीयवादी मानसिकता वारंवार दिसते आहे..

नुकतीच शहराच्या मधोमध असलेल्या वामननगर भागात अंबिकानगर मंगल कार्यालयापुढे एका अभियंत्यावर खंजिराने वार करून लुटण्याचा प्रयत्न केला, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याच मार्गावरून जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या धुमाळ नामक पोलीस कर्मचारी यांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यावरही हल्ला केला, धुमाळ यांनी स्वतःजवळील बंदुकीतून आरोपीच्या दिशेने गोळीबार केले असता ते तिघे गुंड पळून गेले..

गावठी बंदूक,खंजीर दाखवून लुटमार करण्याच्या घटना आता नांदेड जिल्ह्यासाठी नित्याचेच झाले आहे. नांदेड शिवाजीनगर पोलीस स्थानक असो अथवा भाग्यनगर, इतवारा,ग्रामीण,विमानतळ असो सर्वच पोलीस स्टेशनमध्ये लुटमारीच्या घटनांची दररोज नोंद होत आहे.

मागे काही दिवसांपूर्वी हिंगोली गेटजवळ पंजाबचे चौघेजण एकाला शस्त्राच धाक दाखवून लुटण्याची घटना घडली..

नांदेड शहरात लुटमारीच्या घटना दररोज कुठे ना कुठे सुरुच आहे. याला कुठलंच पोलीस स्टेशन अपवाद राहील नाही.

विशेष म्हणजे लुटमारीच्या घटनेतील आरोपी वयोमान 25 च्या आतले आहेत. शहरात खंजर,तलवारी, गावठी बंदूक हे सहज उपलब्ध होत आहेत.

नांदेड शहराच्या शेजारी तेलंगाणा असल्यामुळे गुन्हेगारांना लपण्यासाठी सहजच राज्य बदलून पळ काढता येतो. शहरात तर ऑटोच्या माध्यमांतून प्रवाशांना लुटण्याची ,ऑटोरिक्षाचालकच आरोपी म्हणून निष्पन्न होतायत.

सध्याच्या काळात नांदेड हे एज्युकेशन हब म्हणून सर्वत्र नावलौकिक होताना नांदेड आता हिंसक होण्यातही पुढे येत आहे. आयआयटी, एमबीबीएस प्रवेशासाठी इथं सुरू असलेल्या कोचिंगसाठी राज्यभरातून आलेल्याबाहेर गावच्या मुलांनाही लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात आलेले अनेक विद्यार्थी दहशतीखाली आहेत..

नांदेड शहराकडे अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचा वाढता ओघ पाहता नांदेडला पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता पण सत्तांतरानंतर तोही प्रस्तावाचे घोंगडे भिजत पडले आहे.

पोलिसांचा मनुष्यबळ कमी पडत असल्याचे चित्र सध्या नांदेड जिल्ह्याला भासत आहे.. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे नांदेड आता हिंसक होते आहे.


Updated : 25 Jun 2023 11:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top