विमान अपघात तांत्रिक की पितृसत्ताक? विमान क्रॅशच्यानिमित्ताने महिलांवरच बोट का?
बारामतीच्या विमान अपघातानंतर चौकशी होणं आवश्यकच आहे, पण चूक ठरवताना स्त्री पूरुष हा निकष कधीपासून ठरला? शांभवी पाठक यांच्या नावावर संशय घेणं हा अपघाताचा प्रश्न नाही, तर समाजातील खोलवर रुजलेल्या पितृसत्ताक मानसिकतेचा आरसा आहे. जेंडर आणि क्लायमेट चेंज या विषयांवर काम करत असणाऱ्या मयुरी डी. यांचा सविस्तर लेख
X
बारामतीच्या विमान अपघातानंतर अशा कितीतरी पोस्ट पडत आहेत. खरं तर शांभवी पाठक सहवैमानिक होती. मुख्य पायलट सुमित कपूर पुरुषच होता. पण चुक झाली की बोट ठेवायला एका बाईचं नाव मिळतंय तर का सोडतील? त्यांचा पिढीजात पितृसत्ताक अहंगंड उफाळून उफाळून वर येतोय...
अजित पवारांनी स्वतः एका ट्विट मध्ये म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा सेफ लँडिंग होतं तेव्हा महिला वैमानिक होती असं समजून जायचं. खरं तर पुरुष किंवा स्त्री असणं हे या चुक मोजण्याचे परिमाण का आहे? जगात आजवर हजारो प्लेन क्रॅश झाले आहेत. आणि त्यातला महिला वैमानिकांचा डेटा सरासरी फक्त 3% च्या आसपास आहे.
काहींनी तर म्हटलंय बायकांना रस्त्यावर गाडी चालवता येत नाही यांना काय विमान उडवता येणार? फक्त सोशल मिडियाच नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर पण लोक अशाच गोष्टी बोलताना ऐकलं. परवा एक रिक्षावाले काका पण विचारत होते "विमान मुलगी उडवत होती ना?"
एका इसमानं तर हद्द केली आहे. सरळ हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र धाडून मुलीला अजित पवारांचं विमान का चालवू दिलं? असं विचारलं आहे.
आजही आपल्या जगात मुलींच्या पोटेन्शियल वर किती शंका आहे. एकतर कुठलीही संधी मिळवण्यासाठीच एक मोठा झगडा करुन इथवर यायचं आणि मग पुरुषांनी पुरुषांसाठी बनवलेल्या जगात अॅडजस्ट करूनही लोकांनी जेंडर स्टिरिओटाइपिंग करुन शंका घ्यायच्या.. आणि मनोबल खचवत राहायचं..
Road accidents data ची सरकारी आकडेवारी सुद्धा म्हणते की 96% अपघातात वाहक पुरुष होते. अर्थात महिला ड्रायव्हर आधीच कमी आहेत म्हणून आकडेवारी स्क्यूड वाटू शकेल पण ज्या आहेत त्याही अपघाताच्या आकडेवारीत 3-4% च आहेत. त्यामुळे महिला वाईट ड्रायव्हर असतात हा समज करुन घ्यायला काय डेटा आहे?
पुरुषांना फक्त त्यांना हवी तशी गाडी महिला चालवत नाहीत म्हणून त्या चुकीच्या वाटतात. अगदी माझ्या काकांना सुद्धा असं वाटतं की त्यांच्या मुलीला घाटात गाडी नीट जमणार नाही. आणि ते तिला घाटात गाडी चालवू देत नाहीत. स्वतः बसतात.. आता तुम्ही संधीच दिली नाही तर ती शिकणार कधी? आणि तिला स्वतःवर आणि तुम्हालाही तिच्यावर कॉन्फिडन्स येणार कधी?
अपघात झाला म्हणजे काहीतरी तांत्रिक चूक असणार, ज्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि ती होईल पण शांभवीचं नाव मिळालं नसतं तर यांनी अशाच पद्धतीने कुठल्या पुरुष वैमानिकावर अशी शंका घेतली असती का?
- मयुरी डी.
जेंडर आणि क्लायमेट चेंज विषयावर काम करतात.






