Home > मॅक्स ब्लॉग्ज > इरफान नावाचा समुद्र…

इरफान नावाचा समुद्र…

इरफान नावाचा समुद्र…
X

समुद्राकडे एकटक पाहिलं की, प्रत्येक वेळी नवीन दिसतो. आधी जे पाहिलेलं असतं, ते पुसून जातं आणि नवीन आकार, नवीन खोली, नवीन उंची जाणवते. तसंच इरफान खानचे व्यक्तिमत्व. माफ करा! इरफान "खान" नाही फक्त इरफान, आपला देव आणि धर्म हा आपला अत्यंत खाजगी विषय आहे. तो कुठेही लिहण्याची गरज काय? असे विचार असणारा इरफान. आडनाव लावणे बंद केलं होतं त्याने.

आपण कुठल्याही साधू संत किंवा मोटीव्हेशनल स्पीकर विषयी बोलत नाही. आपण एका नटा विषयी बोलतोय. इरफान च्या मृत्यूने आपण एका विचारशील व्यक्तिमत्वाला एका प्रवाहाला मुकलो आहोत.

Courtesy: Social Media

"मी फक्त पैसे कमवण्यासाठी कधी काम करणार नाही. मला माझ्या आत्म्याला जिवंत ठेवायचे" असे विचार घेऊन आईशी खोटं बोलून घरातून निघून थेट NSD मध्ये गेला. "मी आतापर्यंत 10 नाटकांतून काम केलं आहे"

असे खोटं बोलून NSD मध्ये प्रवेश केला. आणि एका अत्यंत विशेष आणि महत्वाच्या प्रवासाला सुरवात झाली. ज्या काळात इरफान शिकत होता. त्यावेळेस सिनेमाचा एक विशेष ट्रेंड सुरु होता. त्या टिपिकल "हिरो" चे कथानक त्यामध्ये इरफान फिट होणार नव्हता. नाही विचाराने आणि नाही चेहऱ्याने.

इरफानची चलन मध्यवर्ती भूमीकेसाठी नव्हती. मुलीच्या मागे धावणारा, व्हिलन बरोबर मारामारी करणारा हा नट नव्हता. पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या नट याची संज्ञा तोडण्याची ती वेळ होती. समांतर सिनेमाची निर्मिती इतकी होत नव्हती. ती मंदावली होती. अशा काळात हा असा चेहरा, मोठे डोळे हे घेऊन कुठे जाणार?

NSD मधून बाहेर पडल्यावर सिरीयल मध्ये छोटे मोठे कामं मिळायला लागली. ती नीट प्रामाणीकपणे करायला ही लागला. पण आपण खरंच यासाठी घर सोडून मुंबईत आलोय का? हा प्रश्न काही सोडवत नव्हता. आता इथे काही आपलं होणार नाही आपण परत गावी गेलेले बरं हा विचार करत असतानाच 2001 साली इरफान ला "द वॉरियर" (The Warrior) हा सिनेमा मिळाला. आणि आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली.

Courtesy: Social Media

आपला जन्मच परंपरा मोडण्यासाठी झाला आहे. असा मानणारा इरफान खऱ्या अर्थाने खरा ठरला 2003 मध्ये. शेक्सपीअर च्या "Macbeth" या कादंबरीवर आधारलेला "Maqbool" नावाचा सिनेमा विशाल भारद्वाज ने इरफान ला विचारला आणि इरफान परत सज्ज झाला परंपरा मोडण्यासाठी. या सिनेमामध्ये विशेष गोष्ट अशी की, इरफान ने यात नायक आणि खलनायक अशी दुहेरी भूमिका निभावली आहे. या पात्रामधला हा नायक ते खलनायक हा बदल इतका महत्वाचा होता की, त्यामुळे maqbool हे पात्र डोक्यातून जात नव्हते.

नसरुद्दीन शाह, पंकज कपूर, पियुष मिश्रा, ओम पुरी हे असे दिग्गज नट आपल्या आजूबाजूला असणे आणि त्यात हे दोन पात्र एकत्रितपणे निभावणं हे फार कसबीचे काम आहे.

आपल्याकडचे सिनेमे पाहिले की, एका विशिष्ट प्रकारच्या भावनांच्या पलीकडे वाव नसतो. म्हणजे प्रेम, उदासी, विरह किंवा राग. पण "Macbeth" या पत्रात एका काळानंतर येणारी अपराधाची भावना ही अनपेक्षित आहे. ती इतर इमोशन सारखी नेहमीची नाहीये. त्यासाठी फक्त नटाची तयारी लागत नाही. तर एक विचार लागतो. स्वअभ्यास लागतो. विचारांची साधना आवश्यक असते. इरफान ने ते दाखवून दिलं आणि त्यानंतर इरफानच्या वाटेतले सगळे अडथळे नाहीसे होत गेले.

"मेथड अकॅटिंग" हा एक अभिनयामधला विशिष्ट प्रकार आहे. हा प्रकार इरफान ने अगदी कोळून पायला होता. अभिनय हे फार आत्मचिंतनाचे काम आहे. हे सोपं नक्कीच नाही. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त गूण यात लागतात. तुमची स्वतःची कल्पनाशक्ती लागते, सवेंदशीलता अंगात लागते, तुमच्या आवाजाची धार लागते, आवाजात विचारांची स्पष्टता लागते. इरफान मध्ये हे सगळे अचानक नाही आलं.

NSD मध्ये असताना इरफान ने सिंगल बेड रूम निवडली. तो कुणाबरोबर रूम शेअर करत नव्हता. त्या एकटं राहणं आवडत होतं. तो सतत खिडकीत हातात पुस्तक घेउन बसत असे. आपल्याच धुंदीत वावरत असे. हाच त्याचा अभ्यास होता स्वतःला शोधण्याचा.

इरफान च्या सगळ्या फिल्मचा विचार केला की जाणवते. हा थेटरमध्ये गर्दी खेचणारा नट नव्हता. त्याचे बरेचसे सिनेमे हे तिकटबारी वर फार काही करू शकले नाही. पायरसी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ह्या मार्गाने हा खरा सुपरहिट ठरलेला नट आहे. उदाहरण द्यायचे झाले तर "पान सिंग तोमर" हा सिनेमा जेंव्हा प्रदर्शित झाला तेंव्हा कुणाला माहीतच नव्हतं. एखादं दुसरं पोस्टर या सिनेमाचं लागलं होतं. त्यावर ही कुणाचं लक्ष जात नव्हतं. अचानक 7-8 महिन्यांनी एकदम हा सिनेमा लोकांनी उचलून धरला. इरफान ला पहिलं राष्ट्रीय पारितोषिक याच सिनेमांत दिलं. त्याची गती संथ होती. पण तो एकदा जाणवला की, त्याने जिंकलं याच पद्धतीचा काही त्याचा वावर असायचा.

आपल्या धर्माबद्दल आपलं पडखर मत मांडणार हा एक संवेदनशील माणूस होता. असे थेट मत या आधी कुठल्याही नटाने मांडले नव्हते. ते पण थेट न्यूज चॅनेल वर. त्यासाठी त्याला फार रोषाला सामोरं जावं लागत होतं. पण आपण जे बोलतोय. त्यात तथ्य आहे आणि ते समाजसमोर यायला हवं ही जाणीव फार कमी नटांना असते. नटांना नेहमी आपल्या image ची काळजी असते. आपण असं बोललो तर लोक नाराज होतील. आपल्या सिनेमांना प्रेक्षक येणार नाहीत अशी भिती असते. पण इरफान ने ठरवल्याप्रमाणे तो फक्त पैशांसाठी काम करणारा नव्हता. त्याला आत्मा जिवंत ठेवायचा होता. तो एक सजग नागरिकही होता याचं भान त्याला नेहमीच असायचं.

इरफान आणि सुतपा यांच्यातलं नातं हे फार विचार करण्यासारखं आहे. 1986 च्या काळात जवळजवळ 10 वर्ष लग्न न करता एकत्र राहिले आणि मग लग्न केले. सुतपा सांगते इरफान ला नैसर्गिक गोष्टी फार आवडायच्या झाडं, पाणी, डोंगर, मुलांसोबत वेळ घालवायला नेहमी जंगल, डोंगर अश्या ठिकाणी जायचा. त्याचं मन शहरात फार रमत नसे, त्याची इच्छा होती. की, घराची खिडकी उघडली की समोर एक ही घर दिसता कामा नये. यासाठी त्याने बीच जवळ घर घेतलं होतं.

विशेष गोष्ट म्हणजे इरफान च्या घरांना भिंती नव्हत्या, त्यांचं म्हणणं होतं भिंती आल्या की, नात्यात सुद्धा भिंती आड येतील. अशी विचारधारा असलेला हा नट होता. 2 वर्षांपूर्वीचे त्याचं पत्र हे सगळ्यांनी वाचलं असेलच. आपल्या मृत्यूची चाहूल लागणारं ते एक वैचारिक पत्र होतं. सुतपाने जेव्हा इरफान गेल्यानंतर एक पत्र लोकांसमोर लिहिलं. त्यात इरफान ने आपल्या मुलांना दिलेला संदेश होता. तो आजच्या काळात सगळ्या तरुण पिढीला उपयोगी पडू शकतो. मोठा मुलगा बाबील ला सांगीतलेले,

" अनिश्चततेच्या स्वाधीन होत सृष्टीवरील आपली श्रद्धा अबाधित राहायला शिक." आणि लहान मुलगा अयान याला, "आपले मन आपल्या ताब्यात ठेवायला शिक आपल्या मनावर कधी स्वार होऊ नकोस". समुद्राकडे एकटक बघितल्यावर आपण समुद्राकडे एकरूप होतो. तसेच इरफान चे सिनेमे बघताना होतं. कधी नकळत तो तुमचा हाथ धरून तुम्हाला त्या गोष्टीत घेऊन जातो. हे आपल्याला समजत नाही. अशा अथांग समुद्राला नमन. शेवटी "हैदर" या सिनेमातील एक संवाद आठवतो. जो रूहदार या पात्रातून इरफान ने जिवंत केला. "में था, में हु और मे हीं रहुंगा".

Updated : 10 May 2020 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top