Home > मॅक्स ब्लॉग्ज > कणगीत नाही दाणा, आणि मला विश्वगुरू म्हणा!

कणगीत नाही दाणा, आणि मला विश्वगुरू म्हणा!

६ कोटी ६३ लाख लसींची निर्यात ९५ देशांना करणाऱ्या भारतात सध्या किती लोकांचं लसीकरण झालं आहे? सर्वोच्च न्यायालय जर ऑर्डर देत असेल तर केंद्र सरकार काय करतंय? अमेरिकेने लसींवर निर्यात बंदी का घातली. विश्वगुरू बनण्याच्या नादात आणि टीव्ही चॅनेल्स आणि समाजमाध्यमातील समर्थकांनी मोदींची तयार केलेल्या large than life प्रतिमेचा देशाला फटका बसला आहे का? वाचा सुनील सांगळे यांचा लेख

कणगीत नाही दाणा, आणि मला विश्वगुरू म्हणा!
X

आज कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम लसींच्या पुरवठ्याअभावी जो रडत रखडत चालला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने जानेवारी २०२१ नंतर लसींची जी निर्यात केली त्याची परत आठवण झाली, म्हणून थोडा शोध घेतला. केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जी आकडेवारी आहे ती पुढीलप्रमाणे आहे.




जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत भारताने ९५ देशांना तब्बल ६,६३,००,००० लसींची निर्यात केली. त्यातील प्रमुख देश पुढीलप्रमाणे आहेत:

बांगला देश : १.०३ कोटी लसी,

मोरोक्को: ७० लाख लसी,

इंग्लंड: ५० लाख लसी,

सौदी अरेबिया: ४५ लाख लसी,

ब्राझील: ४० लाख लसी,

नायजेरिया : ४०.२४ लाख लसी, म्

यानमार: ३७ लाख लसी,

नेपाळ: २४.४८ लाख लसी,

इथिओपिया: २२ लाख लसी.

काँगो: १७.६६ लाख लसी

अमेरिकेतील फायनान्शियल टाइम्स या प्रतिष्ठित वृत्तपत्राने त्यांच्या दिनांक १ मे २०२१ च्या अंकात याच विषयावर एक लेख छापला आहे आणि त्याचा मथळा आहे. "Is there a ban on Covid vaccine exports in the US?"




या मथळ्या खालचेच वाक्य आहे की, अमेरिकेत जरी लसींची निर्यात करायला औपचारिकरीत्या बंदी नसली तरी अमेरिकेतून इतर देशात अत्यंत कमी लसींची निर्यात झाली आहे. त्यात दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेकडे सध्या उत्पादन केलेल्या जवळपास २७ कोटी लसींचा साठा आहे आणि त्यांनी फक्त ३० लाख लसींची निर्यात केली आहे. याउलट भारताने उत्पादित १९.६ कोटी लसींपैकी ६.६३ कोटी लसी निर्यात केल्या आहेत. इंग्लंडने तर केवळ १० लाख लसी निर्यात केल्या आहेत.





आता यावर काही लोक समर्थन करत आहेत की, अशा प्रकारे इतर देशांना मदत केली तरच इतर देश आपल्याला मदत करतात. पण हे काही समर्थन होऊ शकत नाही. अगदी एखादा साधा इसम जरी घेतला तरी तो इतरांना मदत करण्याआधी आपल्या कुटुंबासाठी पुरेशी तरतूद करून ठेवतो आणि त्यानंतरच इतरांना मदत करतो. इथे तर एक अब्ज पेक्षा जास्त जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न होता. परंतु विश्वगुरू होण्याच्या नादात आपले पंतप्रधान हे मूळ तत्वच विसरले. या ठिकाणी अमेरिकेसारखा समृद्ध देश कसा वागला ते पाहण्यासारखे आहे.

लस निर्यात करण्याच्या या विषयावर त्यांचे राष्ट्राध्यक्ष स्पष्टपणे म्हणाले की, अमेरिकन लोकांना लस देणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे आणि जोपर्यंत अमेरिकेत लसींचा भरपूर साठा होणार नाही. तोपर्यंत ते इतर देशांत लस पाठविणार नाहीत. यापुढे जाऊन ते म्हणाले की जगाला लस पुरवठा करण्याचे केंद्र अमेरिका भविष्यात बनेलच, पण ते सर्व अमेरिकन लोकांचे लसीकरण झाल्यानंतरच! खासगी कंपन्यांनी लसीची निर्यात करू नये यासाठी ट्रम्प यांनी युद्धकाळात वापरण्याचा कायदा वापरून निर्यातीला बंदी केली होती आणि सध्याचे अध्यक्ष बायडेन यांनी ते धोरण पुढे सुरु ठेवले आहे. याचा परिणाम काय झाला आहे?

आज अमेरिकेच्या ४५% लोकांना किमान एक डोस देऊन झाला आहे. हेच प्रमाण इंग्लंडमध्ये ५२.३%, स्पेनमध्ये २८%, फ्रान्समध्ये २६.४%, आणि इटलीमध्ये २५.७% आहे. भारतात हे प्रमाण आजही १४% आहे. जोपर्यंत भारतातील किमान ८० ते १०० कोटी लोकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखणे अत्यंत कठीण आहे.





कारण लस मिळविण्यासाठी पहिली ऑर्डर अमेरिका, इंग्लंड आणि युरोपिअन देशांनी मागील वर्षाच्या एप्रिल-मे मध्येच नोंदविल्या आणि आपल्या केंद्र सरकारने ते काम जानेवारी २०२१ मध्ये केले. परिणामी आपल्याला लसींचा पुरवठा सध्या तरी असाच अपुरा होत राहणार. भारतात एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करण्याला या वेगाने खूप वेळ लागेल आणि तोपर्यंत सामान्य माणसाला कोरोनासारख्या प्राणघातक रोगाचा सामना स्वतःच्या हिंमतीवर करणे भाग आहे.

यापूर्वी वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, इत्यादी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी मोदीजींवर कोरोनाचे गैरव्यवस्थापन, आत्मकेंद्रित वृत्ती, याबद्दल टीका केली होती. आता लॅन्सेट जर्नलसारख्या जगातील सर्वात प्रतिष्ठित मेडिकल जर्नलने देखील पंतप्रधान मोदींवर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. त्यात कुंभमेळा, अनेक राज्यातील निवडणुका, प्रचंड गर्दीच्या सभा, कोरोनावरील उपाययोजना करण्यापेक्षा टीका दडपून टाकण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करणे, इत्यादी गोष्टींचा उल्लेख आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तर आता टास्क फोर्सची नेमणूक (अगदी सदस्यांच्या नावासकट) स्वतः केली आहे, जे काम केंद्राने यापूर्वीच करायला पाहिजे होते. याचा अर्थ न सांगताही समजण्यासारखा आहे. काही वेळा शांतता ही कानठळ्या बसवणारी असते असे म्हटले जाते, त्याची इथे आठवण होते. एकंदर टीव्ही चॅनेल्स आणि समाजमाध्यमातील समर्थकांनी प्रचाराची प्रचंड राळ उडवून मोदींची आतापर्यंत जी large than life प्रतिमा बनविली होती तिचा फुगा फुटला आहे. स्वतःच्या देशातील जनतेची काळजी आधी घेण्यापेक्षा विश्वगुरू बनून आपली प्रतिमा जगाचा तारणहार बनण्याचा प्रयत्न बुमरँग होऊन जगभर टीकेचे धनी मात्र मोदींना व्हावे लागले आहे.

सुनील सांगळे

Updated : 12 May 2021 9:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top