Home > मॅक्स ब्लॉग्ज > एकविसाव्या शतकातील भारताच्या नवसर्जनाचा विद्रोह - सुनील तांबे

एकविसाव्या शतकातील भारताच्या नवसर्जनाचा विद्रोह - सुनील तांबे

एकविसाव्या शतकातील भारताच्या नवसर्जनाचा विद्रोह - सुनील तांबे
X

विद्रोहाची भाषा असते, चित्र असतं, विनोद असतो, गीत असतं, संगीत असतं. विद्रोह नवं सौंदर्यशास्त्र निर्माण करतो. कारण विद्रोहातूनच नवसर्जन होतं. विद्रोह भाषिक असतो, सांस्कृतिक असतो, राजकीय, सामाजिक आणि आर्थिकही असतो. असा सर्वव्यापी विद्रोह एका संघटनेच्या, राजकीय पक्षाच्या वा विचारधारेला बांधील नसतो.

समाजातील सर्व घटकांना तो साद घालतो. सामान्यतः तरुणाई या विद्रोहाला अभिव्यक्त करते. कारण गमावण्यासाठी तरुणांकडे नोकर्‍या नसतात, जमीन-जायदाद नसते, व्यवसाय नसतो, प्रस्थापित राजकीय-आर्थिक व्यवस्थेशी त्यांचे हितसंबंध नसतात.

हे तरुण बुद्धिमान असतात, समाजातील अभिजन वर्गातले वा मध्यमवर्गातले असतात. पण ते संपूर्ण समाजाशी नातं जोडण्याची त्यांना आस लागलेली असते. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात या विद्रोहाचा आविष्कार आसामपासून पंजाब आणि दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत होतो आहे.

दुर्दैवाची बाब अशी की मराठी असोत की हिंदी वा तमिळ वा कन्नड वा अन्य प्रादेशिक प्रसारमाध्यमं या देशव्यापी विद्रोहापासून बेखबर आहेत. मराठी प्रसारमाध्यमांना, त्यांच्या वार्ताहर व संपादकांना राज ठाकरे,(Raj Thackeray) उद्धव ठाकरे,(Uddhav Thackeray) शरद पवार,(Sharad Pawar) अजित पवार, (Ajit Pawar)जितेंद्र आव्हाड, (Jitendra Awhad) देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadnavis) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याशिवाय अन्य विषयांमध्ये रस नसतो.

त्यांच्या नजरेला टनेल व्हिजन म्हणतात. त्यांच्या प्रदेशासाठी जे महत्वाचं तेवढंच त्यांना दिसतं. त्या बाहेरचं जग त्यांना दिसत नाही. त्यामुळे मराठी वर्तमानपत्रं असोत की, वृत्तवाहिन्या त्यांच्या बातम्या, माहिती, विश्लेषण, मतं, भूमिका, चर्चा इत्यादी महाराष्ट्रासंबंधात त्यांना ज्या घटना महत्वाच्या वाटतात. त्याभोवतीच फिरत असतात.

महाराष्ट्र हे राज्य आहे, देश नाही, जग नाही याचं भान त्यांना नसतं. त्यामुळे देशातील विद्रोहाची साक्षेपी दखल ही माध्यमं घेत नाहीत. मराठी वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्या पाहाणारा वाचक माहितीहीन बनतो. (हीच गत अन्य भाषिक प्रसारमाध्यमांचीही होते). माहिती नसेल तर प्रश्न विचारता येत नाहीत आणि प्रश्न विचारता येत नसतील तर ज्ञानाचा मार्ग बंद होतो.

‘आझादी’ कन्हैय्या कुमार यांची घोषणा

सुदैवाने नव्या तंत्रज्ञानामुळे विविध भाषकांचा संवाद गीत, संगीत, चित्र, अर्कचित्र या माध्यमांद्वारे होतो आहे. त्यामुळेच आसामपासून केरळ ते पंजाब पर्यंतचे तरुण एकमेकांशी जोडले जात आहेत. ‘आझादी’ ही कन्हैय्या कुमारची घोषणा आणि ‘हम कागज नही दिखायेंगे’ हे वरुण ग्रोव्हरचं गीत आजचं राष्ट्रगान बनलं आहे. बंकीमचंद्र चॅटर्जी यांची आनंदमठ कादंबरी १८८२ साली प्रकाशित झाली.

या कादंबरीत वंदे मातरम हे गीत आहे. १८९६ साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनात हे गीत रविंद्रनाथ टागोरांनी म्हटलं. त्यानंतर १९०५ साली बंगाल प्रांताच्या फाळणीच्या विरोधात (ही फाळणी हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटीशांनी केली होती) उभ्या राहिलेल्या देशव्यापी आंदोलनात हे गीत देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलं.

लोकमान्य टिळकांनीही बंगालच्या फाळणीला विरोध केला होता. या आंदोलनाने ब्रिटीश सरकारला बंगालच्या फाळणीचा निर्णय रद्द करणं भाग पडलं होतं.

२४ जानेवारी १९५० रोजी घटना परिषदेने वंदे मातरम या गीताला राष्ट्रगानाचा दर्जा दिला. (नेमक्या याच दिवशी मी हा लेख लिहीतो आहे). बंगालच्या फाळणीच्या विरोधात उभं राह्यलेलं आंदोलन केवळ हिंदूंचं नव्हतं. याच आंदोलनाच्या काळात रविंद्रनाथ टागोरांनी हिंदू-मुसलमानांनी एकमेकांना राख्या बांधाव्यात असा कार्यक्रम दिला. आणि तो कार्यक्रम बंगालातील गाव-खेड्यापर्यंत पोहोचला होता. १९०५ साली मुसलमान या गीताला विरोध करत नव्हते.

परंतु त्यानंतर हिंदुराष्ट्रवाद्यांनी या गीताची एजन्सी घेतली आणि ब्रिटीश सरकारने फोडा आणि झोडा हे धोरण स्वीकारलं. त्यामुळे मुसलमान या गीताला विरोध करू लागले. परंतु हेच गीत स्वतंत्र भारतात ए. आर. रेहमानने गायलं तेव्हा सर्वधर्मीयांनी या गीताचं स्वागत केलं. ‘हम कागज नही दिखायेंगे’ या वरुण ग्रोव्हरच्या गीतात तेच ध्येय, तीच आकांक्षा प्रतिबिंबित झाली आहे. वरुणच्या गीताने अनेकांना प्रेरणा दिली. ‘हिंदुस्तान कहते मुझे मैं गांधी का देश हूँ’ हे स्वानंद किरकिरेचं गीतही व्हायरल झालं आहे.

‘हम देखेंगे’ हे फैज अहमद फैज यांचं गीत (पाकिस्तानातील लष्करशहा झिया उल हक) यांच्या राजवटीच्या विरोधात लिहीलेलं) आज भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचलं आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात साकारलेली आणि भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित झालेली आयडिया ऑफ इंडिया वंदे मातरम् पासून हम देखेंगे, हम कागज नही दिखायेंगे या सर्व गीतांमध्ये सुस्पष्टपणे आविष्कृत झाली आहे.

Courtesy : Khabar Seemanchal

भारतात राजकीय, सामाजिक, आर्थिक विषमता आहे. मात्र, या देशात धर्म ही वैयक्तीक बाब असेल या विषयावर घटना परिषदेच्या सदस्यांचं एकमत होतं. त्यामुळे हा देश हिंदूंचा आहे. असं राज्यघटनेत कुठेही म्हटलेलं नाही. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यातील मतभेद, मतभिन्नता यावर आपण चर्चा करतो.

ती करायलाही हवी. मात्र, स्वातंत्र्य आंदोलनात आकाराला आलेल्या आणि राज्यघटनेत ग्रथित झालेल्या आयडिया ऑफ इंडिया बाबत या तिनही महान नेत्यांचे मतभेद नव्हते. आयडिया ऑफ इंडियालाच मोदी-शहा यांनी हात घातल्यामुळे भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या जामा मशीदीमध्ये अभिनव निदर्शनं केली. त्यावेळी मुसलमानांच्या हातातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा होत्या.

Courtesy : Social Media

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या कायद्याच्या विरोधात निदर्शनं केली, महाराष्ट्र बंद चं आवाहन केलं. हिंदुराष्ट्राच्या विरोधातील हा विद्रोह आहे. हा विद्रोह हिंदुंच्या विरोधातला नाही. ‘मैं हिंदु हूँ, च्युतिया नही’ अशी घोषणा एका तरुणाने निदर्शनात हाती धरली होती. ताना या शब्दापुढे अमित शहांचा फोटो असणारं पोस्टर एका तरुणीने हाती धरलं होतं. ‘डम्बलडोर वोन्ट लेट धीस हॅपन’, ‘ओमीट शहा’, ‘बुरे दिन वापस दे दो’, ‘मेक टी नॉट वॉर’, ‘मोदी शहा यू गेव्ह मी डिप्रेशन’ अशा अभिनव घोषणा या आंदोलनात तरुणांनी मिरवल्या.

आयआयएम, बंगलोर इथे पोलिसांनी जमावबंदीचं कलम लागू केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा अभिनव मार्ग चोखाळला. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एका वेळी एक विद्यार्थी वा विद्यार्थिनी जायची, तिथे ते आपली पादत्राणं ठेवायचे आणि घोषणा लिहीलेला कागद. एका विद्यार्थिनीने आपल्या पायताणांवर एक फूल ठेवलं. शांतता आणि सौहार्दाचं प्रतीक म्हणून मी हे फूल ठेवलं आहे. असं ती म्हणाली.

Courtesy : Social Media

‘डोनेट अ बुक टू अ निडी—अमित शहा, बुक—इंडियन कॉन्स्टीट्यूशन, मी हिंदूही आहे, मुसलमानही आहे, शीखही आहे, ख्रिश्चनही आहे, जैनही आहे अशा घोषणा मुसलमान महिलांच्या हातात होत्या. युनायटेड वुई स्टँण्ड डिव्हायडेड वुई फॉल, वुई आर ह्यूमन्स नॉट क्रिमिनल्स, अंग्रेज गये मोदी-शहा छोड गये, मोदीजी ये कॉन्स्टीट्यूशन हैं बीजेपी का डायरी एन्ट्री नही, अशा अभिनव घोषणा या विद्रोहात देण्यात येत आहेत.

भारताचं हे नवसर्जन आहे. त्यामध्ये भारतीय राज्यघटना केंद्रस्थानी आहे. कोणा एका राजकीय पक्षाच्या, नेत्याच्या वा संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभं राह्यलेलं नाही. हे आंदोलन एकविसाव्या शतकातील नव्या भारताची मुहूर्तमेढ रोवतं आहे. त्यामध्ये पारंपारिक डाव्या वा मार्क्सवादी किंवा गांधीवादी वा आंबेडकरवादी भाषेला अग्रस्थान नाही. नवी भाषा, नवं गीत, नवं संगीत घेऊन हे आंदोलन उभं राहात आहे.

सर्व विषमतांना, विविधतांना पार करून अरुणाचल प्रदेशापासून केरळपर्यंत पसरतं आहे.

या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला शेकडो सभा आणि पत्रकार परिषदा घ्याव्या लागत आहेत. खोटी माहिती प्रसारित केली म्हणून शाहीन बागच्या आंदोलकांनी भाजपच्या पदाधिकार्‍याला एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याची नोटीस दिली आहे. आजवर हे घडलं नव्हतं.

अयोद्धेतील मशीद सर्वोच्च न्यायालायने रामल्लाच्या नावे केली, मुसलमान शांत राह्यले, त्रिवार तलाकचा कायदा संमत केला (अन्याय्य असूनही) मुसलमान शांत राह्यले, झुंडबळीच्या विरोधातही मुसलमान रस्त्यावर उतरले नाहीत. परंतु आज नागरिकत्वाच्या हक्कासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत आणि ते एकटे नाहीत. हिंदूंही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. हा विद्रोह हिंदुराष्ट्राच्या विरोधातला आहे. हे भारताचं नवसर्जन आहे.

Updated : 25 Jan 2020 5:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top