Home > मॅक्स ब्लॉग्ज > "महात्मा गांधींचा वेशभूषेसंबंधीचा दृष्टिकोन व खादीची चळवळ"

"महात्मा गांधींचा वेशभूषेसंबंधीचा दृष्टिकोन व खादीची चळवळ"

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या इंग्रजी कपड्यांचा लूक कसा बदलला? जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन ने महात्मा गांधींबाबत केलेलं जगप्रसिद्ध वाक्य तुम्हाला माहिती आहे का? महात्मा गांधींना समजून घेण्यात भारतीय लोक कमी पडले का? वाचा डॉ. येसुफ बेन्नूर यांचा गांधी विचार सांगणारा लेख

महात्मा गांधींचा वेशभूषेसंबंधीचा दृष्टिकोन व खादीची चळवळ
X

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील लढ्यात आपणाला १८५७ ते १९४७ ह्या कालावधीत असंख्य चढउतार आढळतात. १९२० मध्ये जेव्हा गांधीजी च्या नेतृत्वाखाली लढा सुरू झाला. तेव्हा हा कालखंड अनन्य साधारण होता. विशेष म्हणजे गांधी हे प्रयोगशील नेते आणि विकसनशील दृष्टीकोन बाळगणारे विचारवंत होते.

वेशभूषेसंबंधी सांगायचं झाल्यास भारतीय माणूस कोणते कपडे परिधान करतो. याला समाजामध्ये कमालीचे महत्त्व आहे. कपडे ही बाब त्या समुदायातील (आयडेंटिटी) ओळख दर्शविते. कपड्यावरून,वेशभूषेवरून त्या व्यक्तीचा आर्थिक दर्जा स्थिती व जात दर्शविते. स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीत खादी ला खूप महत्त्व होते, खादी म्हणजे स्वदेशी चळवळ हे समीकरण ठरलेले होते.

गांधीजींच्या वेशभूषेसंबंधी भाष्य करावयाचे झाल्यास त्यांचा वेशभूषेसंबंधी दृष्टिकोन आधीच ठरलेला होता. असे जाणवते, कारण गांधीजींना निश्चित पणे माहीत होते की, वसाहतवादी इंग्रजी सत्तेने आम्हा भारतीयांना केवळ राजकीय पातळीवर गुलाम केलेले नसून मानसिक व सांस्कृतिक पातळीवर सुद्धा गुलाम केलेले आहे.

वसाहतवादामध्ये श्रेष्ठत्व व इतरांना तुच्छ लेखण्याची परंपरा होती. मेकॉले नेहमी भारतीय संस्कृतीला तुच्छ लेखत असत व इतर इंग्रज अधिकारी तर भारतीयांवर राज्य करणे म्हणजे ब्रिटिशांची सांस्कृतिक जबाबदारी आहे असे ते मानीत.

महात्मा गांधींना ह्या सर्व पातळ्यांवर लढायचे होते. म्हणूनच त्यांनी खादीच्या माध्यमातून वेशभूषेकडे हेतुतः लक्ष दिल्याचे आपणास त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी स्वतः केलेल्या बदलावरून सहजगत्या लक्षात येईल. महात्मा गांधींना बालपणापासून नीटनेटके कपडे घालण्याचा शौक होता. १८९० पर्यंत गांधींची वेशभूषा संपुर्ण पणे इंग्रज 'लूक' होता. त्यांच्या आयुष्यातील प्रयोगशीलतेचा काळ १८९२ ते १९१३ हा होय. ह्या कालावधीत ते दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास होते, तेथे जेव्हा गांधीजी फेटा घालून वकिली करिता कोर्टात गेले. तेव्हा तत्कालीन न्यायमूर्तींनी त्यांना फेटा काढण्याचा आदेश दिला.

मात्र, गांधींनी त्यास नकार देऊन फेटा न काढता कोर्टातून निघून आले, त्याक्षणी त्यांच्या लक्षात आले की ते एका गुलाम समाजाचे नेते आहेत. नंतरच्या काळात २१ डिसेंबर,१९१३ मध्ये "दरबान" येथे ७ हजार भारतीय समुदाय समोरील बैठकीत भाषण करताना त्यांनी संपुर्णतः भारतीय कपडे परिधान केले होते. हा महत्वाचा बदल त्यांनी हेतुतः केलेला होता. पुढे गांधीजींनी त्यांचे राजकिय गुरू नामगार गोखले यांच्या सल्ल्यानुसार १९ डिसेंबर १९१४ रोजी सपत्नीक जाणीवपूर्वक भारतदर्शन प्रवासास सुरुवात केली. त्यावेळी गांधीजींनी भारतीय गिरण्यांनी बनविलेल्या पोशाखात रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून संपूर्ण भारत व भारतीयांना प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

त्याकाळी गांधीजींच्या समवेत काँग्रेसचे बरेचशे राजकीय नेते उच्चवर्णीय व उच्चवर्गीय होते. मात्र, गांधींच्या व इतर नेत्यांच्या दृष्टिकोनात खूप फरक होता. कारण गांधींना चळवळीत फक्त स्वदेशीचा आग्रह अभिप्रेत नव्हता. तर त्यांचा केंद्रबिंदू 'स्वदेशी मानसिकता' यावर होता. ह्या उद्देश्यपूर्तीसाठी गांधीजींनी चरखा वापरायला सुरुवात केली. त्यांची ही कृती ज्यामुळे ग्रामीण भारतात रोजगारनिर्मिती, चरखा चालविणे सोपे असल्याने भारतीयांना वेगळं औद्योगिक कौशल्य शिकण्याची गरज नव्हती, ह्या सर्व बाबी साध्य करता येणार होत्या.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरी स्वातंत्र्य चळवळ भारतातल्या ग्रामीण भागात सहजपणे पोहोचणार होती. गांधीजींनी ३१ जुलै, १९२१ रोजी मुंबई येथील परळ भागात केलेली परदेशी कापडाची होळी की परिणाम साधणारी होती. त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या होळी ने निश्चितपणे परिणाम साधणारा होता. कारण होळीमुळे १९२४ साली ९०० लाख रुपयांची परदेशी कपड्यांची आयात घटून १९३० साली फक्त ५३ लाख एवढी कमी झाल्याचे निदर्शनास येते. (संदर्भ -" खादी: गांधींज मेगा सिम्बल ऑफ सबव्हर्शन "-पीटर गोनसालवीस,सेज प्रकाशन)

महात्मा गांधींना सर्व पातळ्या वर संघर्ष करावयाचा होता, म्हणूनच गांधींनी खादी वापरण्याच्या माध्यमातून भारतीयांना एक विशिष्ट ओळख प्राप्त करून दिली. त्यांचा खादी प्रसाराचा विशेष उपक्रम, कपड्याची प्रदर्शने आणि ती भरवत असताना खादीच्या लढ्यात स्त्रियांचा सहभाग इ बाबी ह्या त्या माध्यमातून राष्ट्रीय एकता दर्शविणाऱ्या होत्या. त्यांनी 22 सप्टेंबर १९२१ ला मद्रासहुन मदुराई रेल्वे ने जाताना असंख्य लोकांना निर्वस्त्र पाहिले. ब्रिटिश साम्राज्यवादाने भारताला कंगाल केलेले आहे म्हणूनच स्वतः फक्त धोती परिधान करायला सुरुवात केली. नकळतच पुढे त्यांची वेशभूषा सत्याग्रहाची प्रतिक बनली.

आज, मात्र त्यांचा नावाचा होणारा गैरवापर आम्हा भारतीयांना क्लेश देणारा आहे. आज काल त्यांची तुलना कुणाही व्यक्तीशी केली जाते. महात्मा गांधी बद्दल आइन्स्टाइन म्हणाले होते ,

"अनेक पिढ्यांना कल्पना करता येणार नाही; पण या पृथ्वी तलावर चालणारा हाडामासाचा, रक्ताचा असा एक माणूस होऊन गेला, त्यांचे नावं गांधी. तो तुम्हाला समजणार नाही. आम्हा भारतीयांची अपेक्षा आहे की आइन्स्टाइनचे भाकीत खोटे ठरो आणि ज्या देशात गांधीजी जन्माला आले, तेथे केवळ नावाचा वापर टाळून आमच्या हातून समाजपयोगी कृत्य घडो .

डॉ. येसुफ बेन्नूर

ई मेल bennuryusuf@ gmail .com

भ्रमण ध्वनी ९४२३४५४५२३

Updated : 29 Jan 2022 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top