Home > Top News > Hathras: "अंत्यवासी " आणि" दुःख"

Hathras: "अंत्यवासी " आणि" दुःख"

Hathras: अंत्यवासी  आणि दुःख
X

हाथरस मधील पीडित महिलेच्या नावाचा अर्थ "इच्छा" असा होतो. अजून एक अर्थ पाहिला तर आपल्या "मनाची देवी" असाही होतो. पण नावात काय ? नावात काहीही नसते. असं शेक्सपियर ने म्हण्टलेलंच आहे. पण हा नियम भारतात जरा वेगळ्या अर्थाने चपखल बसतो, कारण भारतात फरक "आडनावाने" पडतो "नावाने" नाही. "वाल्मिकी" आडनाव म्हणजे यात सगळंच दुःख एकवटलेला आहे. अजून पुढे काही सांगण्याची गरज सुद्धा नाही. होय ती "दलित" होती हे लपवण्याची काहीहि गरज नाही. जे सो कॉल्ड विचारवंत असे लिहतात, बोलतात कि, "कुठल्याही महिलेचा बलात्कार हा बलात्कारच असतो त्याला जात वगरे असे काही नसते.असे बोलणारे किंवा लिहणारे हे जातीयवाद पसरवतात वगरे". पण माझा हा थेट प्रश्न आहे. जर ती दलित नसती तर तिचं अंत्यसंस्कार रात्रीच उरकलं असत का ? तर उत्तर आहे नाही. कधीच नाही . जर ती उच्चं जातीची असती तर असं लपूनछपून अंत्यसंस्कार झालेच नसते. पीडित महिलेच्या परिवारातले लोक स्पष्ट शब्दात सांगत आहेत कि जर," ती पंडित किंवा ठाकूर असती तर अशी वेळ तिच्यावर कधी आलीच नसती".

मुळात "दलित" हा शब्द लिहून मूळ प्रश्न अधोरेखित होत आहे आणि तो झालाच पाहिजे. कारण या बलात्काराचं मूळ तिथेच रोवलेले आहे . ५००-६०० च्या आसपास घरे असणारे हे गाव हाथरस या जिल्ह्यात आणि उत्तर प्रदेश या राज्यात येते. अर्ध्यापेक्षा जास्ती लोक तिथे ठाकूर आहेत आणि बाकी इतर, आणि शेवटी १५ -२० घरे हि दलितांची आहेत . ह्या गावात पहिल्यापासून ठाकुरांचे वर्चस्व आहे. इथले दलित कुटुंब सांगतात कि , आम्ही रस्त्याच्या कुठल्या बाजूला चालायचे हे सुद्धा ठरवून दिलेले आहे.

आम्ही मान सुद्धा वरती करून चालू शकत नाही. अश्या या गावात एका दलित मुलीचा बलात्कार होतो हे मेंदूला खटकण्यासारखे अजिबात नाही.(असे किती गुन्हे अजून केले असतील त्याची नोंदही नसेल.) मुळात ह्या गुन्ह्यात जो प्रमुख आरोपी आहे त्याने याआधी पण दारू पियुन तिची व बहिणीची छेद काढली होती आणि तिला धमकी दिली होती कि कुणाला सांगीतले तर गोळी घालेन .मागच्या ६ महिन्यापासून हा छळवाद सुरु होता. या अश्या वातावरणात पीडित महिला राहत होती. ती घाबरून घरातून कुठे बाहेरसुद्धा पडत नव्हती. हे असे जगणे तिच्यावर फक्त "वाल्मिकी" या आडनावाने आणि "जातीनेच" आणले आहे. म्हणून तिची जात लावणे हे अत्यंत महत्वाचे आहे. तसे न केल्यास आपण एक खोट्या वातावरणात राहत आहोत हे गांभीर्य नष्ट होऊ शकते, आणि अशीच काहीतरी तयारी एकंदरीत तिथल्या प्रशासनाची सुरु आहे.

मुळात बलात्कार करण्याचे कारण फक्त "हवस" हे नक्कीच नाही ."पुरुषी वर्चस्व "आणि "जातीय वर्चस्व" हि दोन प्रमुख कारणं आहेत, निदान भारतात तरी .२०१८ पासून दलित स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये ७% नि वाढ झालेली आहे यामध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर ५५४ ,त्याचा पाटोपाठ उत्तर प्रदेश ५३७ , आणि मध्य प्रदेश ५१० इतके बलात्कार नोंदवले गेले आहेत(वर्षभरात). आपला देश इतका "जाती" ला जखडलेला आहे कि तो सगळं एकाच भिंगातून बघतो .

"मी पुरुष आहे किंवा मी उच्चवर्णीय आहे तर मी काहीही करू शकतो" हा आत्मविश्वास व वीचार गंभीर गुन्हा करण्याचे प्रमुख स्रोत आहे. हेच संस्कार पिढीदर पिढी चालत आलेले आहे. या प्रकरणात सुद्धा तेच आहे, पिडित कुटुंब मागच्या ३ पिढ्या ह्या ठाकुरांचे अत्याचार सहन करत आलेले आहे. आणि आता याची शिक्षा १९ वर्षीय पिडीताने भोगली. तिची काहीही चूक नसताना. तिची प्रमुख चूक एकच होती कि ती दलित कुटुंबात जन्मली. तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आजोबांची आणि ठाकुरांची भांडणे झाली होती आणि ठाकूरांना ऍट्रॉसिटीच्या खाली शिक्षा झाली होती हा राग प्रमुख आरोपीच्या मनात घुमसत होता. आणि त्यांनी डाव साधला पिडीत महिला शेतात गेली असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याला अमानवी असं म्हणणे साफ चुकीचे आहे कारण हे मानवी कृत्य आहे. मानव जातील लाजवणारे कृत्य आहे. इथे परत "मी पुरुष आहे आणि मी उच्चवर्णीय आहे तर मी काहीही करू शकतो" हा आत्मविश्वास प्रमुख स्रोत गणला गेला.

या बलात्कारापेक्षा इतकीच भयानक गोष्ट म्हणजे तिचे "अंत्यसंस्कार" एका बेवारस प्राण्यांसारखे करण्यात आले. तेही तिच्या घरच्यांशिवाय. म्हणजे जिवंत असताना तिला प्रतिष्ठा व सन्मान कधी मिळणारच नव्हता, हा विचार करून ती जगत होती ,पण मेल्यानंतर तरी माणूस असल्याचा सन्मान न मिळवा हेही भाग्य तिच्या नशिबात नसावं हि फार भयंकर वस्तुस्थिती आहे. तिच्या आई वडिलांना वाटणारे हे दुःख जगातले सगळ्यात भयंकर वास्तव दाखवणारे दुःख आहे त्याची बरोबरी इतर कुठल्याही दुःखा बरोबर करू शकत नाही. "नीची जातवाले " असं हिणवून त्यांचा बायका आपल्याच मालमत्ता आहे असे वागणे इथल्या लोकांच्या उच्चवर्णीय लोकांच्या मेंदूत रुजवले गेले आहे. आणि याउलट "आपण खालच्या जातीचे आपण मान खाली घालूनच राहिले पाहिजे", हे इथल्या दलित लोकांनी आपल्या मुलांच्या मनावर बिंबवले आहे. आणि यात इथले प्रशासन आणि पोलीस यांचे पाठबळ या गुन्हेगारांना लाभले आहे. स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्षे झाल्यावरसुद्धा हि आपली अवस्था आहे , हि फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आपण सगळ्या जगात सहज सांगतो आहे कि इथे "सगळं छान सुरु आहे" .

जर विचार केला तर यामध्ये दलित लोकांचीही चूक म्हणावी लागेल. अन्याय सहन करणे हा हि गुन्हाच आहे त्यातलाच हा प्रकार आहे. कधी अन्याय विरुद्ध पेटून उठणार ,कधी मान वर करून चालायला शिकवणार ,आपल्या मुलांना यांच्याविरुद्ध लढ्याचे बळ कधी देणार ? पण , याला परंपरा आणि हिंदूनी भिकेसारखे दिलेले अधिकार याच्या ओझ्याखाली मागच्या पिढ्या दाबून गेल्या आहेत. पण आता या तरुण पिढीला तसे करायला लावणे हे "शोषित" होण्याचे धडे दिल्यासारखे आहे तेही सबळ पुरव्यानिशी. "अंत्यवासी" हे नाव देण्याचे उद्दिष्ट हेच आहे .हि गोष्ट एका गावातली आहे म्हणून ती फार महत्वाची आहे. कारण लोकशाही ची सुरवात किंवा समाज निर्माण करण्याची ताकत हि गाव खेड्यातून घडते म्हणून हा गुन्हा फार महत्वाचा आहे.

"खैरलांजी " प्रकरण आठवत असेल तर आठवून बघा त्यात पण याच पठडीतले गुन्हे होते, मुद्दा हाच होता ,हीच अमानुषता होती आणि हेच "जातीचे" षडयंत्र होते. उदा(पुरावा-डॉ आंबेडकरांच्या "अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले ? " या पुस्तकातून) - हिंदू शास्त्रांनी काही विशिष्ठ जमातींना दिलेल्या "अंत्य ,अंत्यज आणि अंत्यवासी " या नावाचा समावेश होतो हि नावे अत्यंत पुरातन काळापासून चालत आलेली आहेत . लोकांच्या एका विशिष्ट वर्गाचा उल्लेख करण्यासाठी हि नावे का वापरण्यात येतात ? धर्मशास्त्रांच्या मते देवाने मानव जात निर्माण केली तेंव्हा अस्पृश्य सर्वांच्या शेवटी निर्माण करण्यात आला म्हणून "अंत्य" म्हणजे अस्पृश्य होय . पण डॉ आंबेडकरांनी या युक्तिवादाला हास्यास्पद म्हंटलं आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते "अंत्य" या शब्दाचा अर्थ "निर्मितीच्या शेवटचा" नसून "गावाच्या शेवटचा" असा आहे. हा मुद्दा मांडण्याचे कारण म्हणजे पिढीदर पिढी कुठल्याही गावाची रचना अशीच बनली आहे आणि ती मोडण्याची कोण पुढाकार घेत नाही .जर गावाबाहेर वस्ती असलेले लोक जर "खालच्या" जातीचे किंवा "वेगळे" नसून ते इतर गाववाल्यांसारखे बरोबरीचे आहेत असे वातावरण तयार झाले तर किंवा त्यांचे राहणीमान गावाच्या मध्यावर आणून ठेवले तर हा प्रश्न कायमचा नष्ट होईल. पण तसे होताना दिसत नाही. यासाठी कुठलेही सरकार काहीहि करत नाही.

या सगळ्या प्रकरणात राग येण्यासारखी एक गोष्ट म्हणजे इथलं प्रशासन. सगळ्यात ग्रास रूट लेवलला पोलीस कार्यरत असते . गुन्ह्याची पहिली नोंद हि पोलीस ठाण्यातच नोंदवली जाते. मग पुढे सगळं सूरु होतं पण इथे सगळंच संशयास्पद आहे आणि अश्या केसमध्ये ही यंत्रणा विकली गेलेली असते, गुलामशाहीमध्ये गुरफटलेली असते. "गरीब- श्रीमंत" हा फरक नंतर लक्षात घेतला जातो आधी "ठाकूर आणि दलित" (ईकडे दलित हा श्रीमंत असून चालत सुद्धा नाही) हा फरक बघून सगळी केस बांधली जाते. पुरावे गोळा करताना हवे तसे घेतले जातात त्यात कुठलेही तर्क लावून घेतले जात नाही. साक्ष वळवली जाते. असे करून आपल्या लेव्हल सगळं "म्यानेज" केले जाते. आणि या सगळ्यात बिचारा दलित पीडित पोलीस स्टेशन बाहेर गुडघ्यावर बसलेला असतो वाट बघत कधी आम्हाला न्याय मिळतो ते. याच काळात इकडे शहरात हॅशटॅग मोहीम राबवली जाते. तिला उत्तम प्रतिसाद मिळायला लागतो, प्रशासनावर दबाव यायला लागतो आणि पावले पटापट पडली जातात, पुरावे बदलत जातात ."ध चा मा" केला जातो, मेडिकल रिपोर्ट बदलले जातात. आणि या सगळ्यात पीडित मृत्यू पावते. आणि प्रशासनाचे काम सोपं होतं. सत्य ते हवे तसे बदलू शकतात. हे सगळं एका सिनेमातल्या प्रसंगासारखं वाटत असतं पण ते खरच घडत असतं. पीडिताच्या बाबतीत जे गेल्या १५ दिवसात घडतंय ते एका सिनेमातल्या पटकथेला सुद्धा लाजवेल असे प्रसंग यात आलेले आहेत. यात भर म्हणजे तिचे केलं गेलेले अंत्यसंस्कार. ३ पानं भरून उत्तर प्रदेश सरकार जाहिरात करतं "सुसुंधीची भूमी " म्हणून वगरे, विमानतळ , एक्सप्रेसवे असे विकासाचा आराखडा मांडला जातो, शेजारी मुखमंत्री योगींचा हसरा चेहरा. हा जाहिरातीमधला विकास नक्की कसला असतो?? उत्तर प्रदेश जातीय गुन्हयात आणि जातीभेद मध्ये सगळ्यात वर असलेले राज्य आहे. इथला जातीभेद नष्ट करण्यासाठी का कुठला आराखडा आखला जात नाही ? का नेहमी विभागणी ठाकूर, पंडित आणि दलित अशी केली जाते. याचं उत्तर कदाचित विकास झाल्यावर ते देणार असतील किंवा मंदिर बनण्याची वाट बघत असतील. पण सगळे प्रशासन गुलामशाहीत वावरत आहे हे नक्कीच. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक "बिहारी, उ.प", माणसाला विचारा त्याची जात काय आहे आणि तो इथे का आलाय ? याचे उत्तर मिळून जाईल. तिकडचे लोक त्यांना मिळणाऱ्या वागणुकीला वैतागले आहेत. त्यांना प्रतिष्टा मिळत नाही, सन्मान मिळत नाही म्हणून ते लोक शहरात येतात जिथे त्यांना कोण विचारात नाही कि ते कुठल्या जातीचे आहेत. त्यांच्याशी हसत खेळत वागतात. ते काही वेळासाठी विसरतात कि आम्ही कुठल्या जातीचे आहोत.

शेवटी ,दोन गोष्टी प्रामुख्याने नोंदवलेल्या गेल्या पाहिजे पहिली म्हणजे, या पिडीत महिलेचे ज्या पद्धतीने बेवारस प्राण्यासारखं अंत्यसंस्कार केले गेले ती गोष्ट मला मनुस्मृशीची सुसंगत वाटते. ती अशी, मनूस्मृतीत शुद्रांना पशूच मानले आहे , याचे पुरावे आहेत. मनूस्मृतीच्या मते प्राण्यांना सत्वगुणामुळे देवत्व , रजोगुणामुळे मनुष्यत्व व तमोगुणामुळे तिर्यकत्व (पशुत्व) प्राप्त होते . मनूस्मृतीने अत्यंत स्पष्ट शब्दात शूद्रांचा अंतर्भाव मानवेतर प्राण्यांमध्ये केला आहे. मांजर, मुंगूस , चाष पक्षी , बेडूक , कुत्रा , घोरपड , घुबड व कावळे यांना मारल्यास "शूद्रहत्येचे" प्रायश्चित घाव्ये असे मनुस्मृती सांगते .

दुसरी म्हणजे उत्तर प्रदेश चे मुखमंत्री , हे तेच आदित्यनाथ योगी आहेत ज्यांनी मागे स्त्रियांविषयी आपले मत मांडले होते ते असे ,"Women Not Capable of Being Left Free or Independent , If a man was to ever get the same attributes as women – that of humility, love and compassion – then he is equivalent to god. But if a woman adopts the qualities of men – that of bravery (shaurya) or masculinity (purusharth) – then she becomes a devil (rakshasa).” आदित्यनाथजी पुढे म्हणतात ,“a home gets destroyed when women become as effective as men.”

असे मत असलेल्याच्या प्रमुखांच्या राज्यात आपण दुसरं काय अपेक्षित करू शकतो ? अत्यंत वेदनादायी घटना. आणि जास्ती वेदनादायी तिचे केले गेलेले अंत्यसंस्कार .तिच्या "इच्छा " तिच्या सोबतच गेल्या.

लक्षात ठेवले पाहिजे हा संघर्ष ईश्वर मानतो कि नाही मानत हा नाहीये , शोषक आणि शोषित यात आहे.

-प्रशांत वि. कांबळे

Updated : 7 Oct 2020 5:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top