Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > निवडणूक आयोगाचं मोदींना अभय आहे का?

निवडणूक आयोगाचं मोदींना अभय आहे का?

निवडणूक आयोगाचं मोदींना अभय आहे का?
X

पृथ्वीच्या कक्षेतील आपलाच उपग्रह पाडून भारताने आपली अंतराळ संरक्षण सिद्धता सिद्ध केली. ASAT मिसाइलच्या यशस्वी परिक्षणानंतर भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश झाला ज्याकडे ही क्षमता आहे. डिआरडीओ ने ही मोहीम यशस्वी केली, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश के नाम संदेश देत ही माहिती जगाला सांगीतली. दूरदर्शनवरून प्रसारित झालेली ही मुलाखत, निवडणुकीचा काळ असल्यामुळे साहजिकच निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार ही झाली. आदर्श आचारसंहितेचा सरळ-सरळ भंग या प्रकारामध्ये दिसत होता. राष्ट्रीय सुरक्षेचा मामला बनवल्यामुळे या भाषणाला विरोध करणारा देशद्रोहीच ठरवला जाणार होता. तरीही या भाषणाची तक्रार झालीच. अपेक्षा होती, निवडणूक आयोग याबाबत निष्पक्ष भूमिका घेईल. मात्र निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणात नरेंद्र मोदींना क्लिन चीट देऊन विषय संपवला आहे. वर्ध्यातील रॅलीमध्ये हिंदू मतांच्या बाबतीत जाहीर विधान ही आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत येणारं असलं तरी निवडणूक आयोगाने या कडे कानाडोळा केला आहे.

एसॅट मिसाइल परिक्षण प्रकरणी दूरदर्शनवरून मुलाखत दाखवणं योग्य की अयोग्य? या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने आपला निर्वाळा दिला आहे. ही मुलाखत दूरदर्शनने चित्रित केलेली नव्हती, हे चित्रिकरण एएनआय या वृत्तसंस्थेने चित्रित केलेलं असल्याने सरकारी साधनांचा यात वापर झालेला नाही, आकाशवाणीने दूरदर्शनचं फिड घेऊन प्रसारित केलेलं असल्याने यात शासकीय संसाधनांचा वापर झाला नसल्याचं निवडणूक आयोगाचं मत झालेलं आहे. मात्र अशा पद्धतीचं राष्ट्राला उद्देश्यून भाषण करण्याबाबत मात्र निवडणूक आयोगाची चुप्पी आहे.

नरेंद्र मोदी यांचे जवळपास सर्वच कार्यक्रम दूरदर्शनच्या वाहिन्या लाइव्ह दाखवत असतात. निवडणूक काळात विरोधी पक्षाला दिलेला वेळ आणि नरेंद्र मोदी यांना दिलेला वेळ पाहता मोठी तफावत आढळून येत आहे. सरकारी पक्षाच्या संपूर्ण नियंत्रणाखाली ही शासकीय माध्यमे आज काम करताना दिसतायत. एएनआय ही न्यूज एजन्सीही बऱ्यापैकी मोदी अजेंडा पसरवण्यासाठी काम करताना दिसत आहे. अशा वेळी निवडणूक आयोगाकडून अपेक्षित असलेली तटस्थता मात्र,निवडणूक आयोगाच्या वागण्यामध्ये दिसून येत नाहीय.

सरकारं येतील जातील, या देशातील संस्था कायम आहेत, त्या कायम आणि स्वायत्त राहिल्या पाहिजेत. पदांवर बसलेल्या लोकांनी व्यक्ती म्हणून नाही तर संस्था म्हणून काम पाहिलं पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्या शक्तींचा योग्य वापर केला पाहिजे. आपण निष्पक्ष आहोत, हे दाखवून दिलं पाहिजे. मोदीच नाही, इतर कुठल्याही राजकीय नेत्याला या घटनेने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाण्याची मुभा असता कामा नये.

Updated : 4 April 2019 3:46 AM GMT
Next Story
Share it
Top