Home > मॅक्स ब्लॉग्ज > राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचे नाव सुचवण्यामागे काँग्रेसची खेळी?

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचे नाव सुचवण्यामागे काँग्रेसची खेळी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केल्यास काँग्रेस पाठिंबा देईल अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. पण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत आपण नाहीत, असे पवारांनी जाहीर केले आहे. शरद पवारांनी ही भूमिका जाहीर करण्यामागचे कारण काय आहे, काँग्रेसच्या खेळीलाही शरद पवार यांनी उत्तर दिले आहे का, याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...

राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांचे नाव सुचवण्यामागे काँग्रेसची खेळी?
X

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपतर्फे उमेदवार कोण अशी चर्चा असताना विरोधकांची आघाडीही या निवडणुकीत उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार केल्यास काँग्रेसचा पाठिंबा असेल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी आपण या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या खेळीमागे काय कारण आहे, याचे विश्लेषण केले ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी....

1. शरद पवार आजवर एकही निवडणूक हरलेले नाहीत. अपवाद बीसीसीआयच्या निवडणुकीचा. मात्र त्यावेळीही त्यांचं गणित एक-दोन मतांनी हुकलं. मात्र त्याचा पुरेपुर वचपा त्यांनी पुढच्या खेपेस काढला. कारण शरद पवार कोणतीही निवडणूक कमालीच्या गांभीर्याने लढवतात. विरोधकाला ते कःपदार्थ मानत नाहीत.

२. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत सुमारे ४, ८०९ मतदार आहेत. खासदार आणि आमदार. राज्याची लोकसंख्या आणि विधानसभा मतदारसंघ यानुसार आमदारांच्या मतांचं मूल्य निश्चित होतं. एकूण मतसंख्या १० लाख ८६ हजार ४३१ आहे. जो उमेदवार ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळवेल तो यशस्वी होईल. हा टप्पा गाठण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांना म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १३ हजार मतांची गरज आहे. (संदर्भ एनडीटीव्ही)

३. राष्ट्रपतीपदाची निवडणूक दिनांक १८ जुलै २०२२ रोजी होईल. मतगणना त्यानंतर तीन दिवसांनी होईल.

४. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचा उमेदवार निश्चित करण्यासाठी दिनांक १५ जून २०२२ रोजी बैठक होणार आहे. त्यामध्ये केवळ संयुक्त लोकशाही आघाडीच नाही तर अन्य राजकीय पक्षही असतील.

५. राष्ट्रपतीपद स्वीकारणं म्हणजे क्रियाशील राजकारणातून निवृत्त होण्याची मानसिक तयारी करणं. शरद पवार यांनी आजवर राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेले नाहीत. लोक माझे सांगाती या पुस्तकात त्यांनी तसं स्पष्ट नोंदवलं आहे. आपण नेते आहोत आणि त्यामुळे आपल्याला निवृत्ती नाही याची पक्की खूणगाठ त्यांनी बांधली आहे. म्हणूनच तर ते आजही महाराष्ट्राच्या कानाकोपर्यावत दौरे करतात, गरज असेल तेव्हा देशाच्या इतर भागातही जातात. वर्षातून चार-सहा सभा घेण्याचं राजकारण ते करत नाहीत वा उरलो उपकारापुरता अशीही त्यांची धारणा नाही.

६. वास्तविक काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवायला हवं. परंतु ते टाळण्यासाठी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधीपक्षांचे सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या उमेदवारीला आपण अनुकूल आहोत, असे संकेत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले असावेत.

Updated : 14 Jun 2022 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top