Home > मॅक्स ब्लॉग्ज > चीन चौकशीला का घाबरतोय?

चीन चौकशीला का घाबरतोय?

चीन चौकशीला का घाबरतोय?
X

वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा उगम आणि प्रसार झाला, या आरोपांवर आता जगाचे एकमत होत चालल्यामुळे चीन चांगलाच बिथरला आहे. या घबराटीमुळेच चीनने व्हायरॉलॉजी लॅबच्या वेबसाईटवरील काही फोटो आणि महत्त्वपूर्ण माहिती काढून टाकली आहे.

दुसरीकडे, जर्मनीने चीनला 20 ट्रिलियन डॉलर्सच नुकसानभरपाईचे बिल पाठवले आहे आणि अन्य देशही जर्मनीचे अनुकरण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, चीनने अनेक देशांची स्वायत्तता अधिग्रहित करण्यासाठी त्यांना वारेमाप कर्ज दिले होते; पण या देशांनी हे कर्ज माफ करावे असा सूर आळवला आहे. अशा चहूबाजूंनी आता चीन कात्रीत सापडला आहे.

कोरोनाचा प्रसार जगभरात झाल्यामुळे जगभरात प्रचंड जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. दुसर्‍या महायुद्धापेक्षाही जास्त हानी कोरोना संकटामुळे होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कोणाचाही दोष नसताना जगाला याची किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे जवळपास सर्व जगभरातील जनता चीनवर संतापली आहे. अमेरिकेने सुरुवातीला थेटपणाने या विषाणूला वुहान विषाणू असे संबोधून याचा उगम चीनमध्येच झालेला आहे असे जगासमोर ठाम आणि स्पष्टपणाने मांडले.

त्यानंतर अन्य देशांनीही चीनवर आगपाखड सुरु केली.

आता हे सर्व देश कोरोनाकांडाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करु लागले आहेत. ही मागणी पहिल्यांदा अमेरिकेने केली आहे. ही मागणी करताना अमेरिकेने असे म्हटले आहे की… चीनने या चौकशीला सहकार्य केले पाहिजे. यासाठी अमेरिका एक तज्ज्ञांची टीम चीनला पाठवण्याच्या विचारात होती; तथापि चीनने त्याला तात्काळ नकार दिला. अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियानेही अशीच मागणी केली आहे. मात्र आम्ही तुमच्याकडून घेण्यात येणारे बीफ आणि वाईन हे तात्काळ बंद करुन टाकू, तुमच्याबरोबरचे व्यापारी संबंध कमी करुन टाकू अशी धमकी चीनने ऑस्ट्रेलियाला दिली आहे.

त्याचबरोबर युरोपियन कमिशनच्या चेअरमननीही चीनला अशा चौकशीला सहकार्य करण्याची सूचना केली. तेव्हा चीनने त्यांनाही धमकावले. थोडक्यात, चीन कोरोना प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठीचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आहे.

आज जगभरातील शास्रज्ञ कोरोना विषाणूवर प्रभावी ठरेल अशी लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाची बाब लागणार आहे. ती म्हणजे कोरोना विषाणूचा उगम झाला. त्याठिकाणचे नमुने. हे नमुने हाताळले जाणे आवश्यक आहे.

तसेच कोरोनासारखी महामारी भविष्यात येऊ द्यायची नसेल तर त्यासाठीची पूर्वतयारी करण्यासाठीही त्याच्या उगमस्थानाच्या भागातील माहिती अत्यंत गरजेची आहे. परंतु चीन ती देण्यास आजिबात तयार नाहीये. त्यामुळे जागतिक पातळीवर या विषाणूवर मात करण्यासाठीची औषधे, लस तयार करण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. फाईव्ह आईस सेक्युरिटी ऑलियन्स या संस्थेकडून प्रकाशित अहवालात चीन कोरोना बाबतच्या बातम्या दडपून टाकत आहे. या विषयी बोलणाऱ्या डॉक्टरांची मुस्कटदाबी करत आहे. लस विकसित करण्यासाठी आवश्यक live samples चीनकडून शाश्त्रज्ञांना मिळत नाहीत.

दुसरीकडे, चीनचे वागणे मात्र, अत्यंत गूढमय पद्धतीने सुरु आहे. जगभरातून अशा प्रकारच्या चौकशी मागणी होऊ लागली. तेव्हा चीनने अशी काही पावले उचलली ज्यांच्यामुळे चीनभोवतीचे संशयाचे ढग अधिक गडद होण्यास हातभार लागला.

1.वुहानमधील इन्स्टिट्युट ऑफ व्हायरालॉजीमधूनच कोरोनाचा जन्म झाला असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी तर ‘वुहानमधील या प्रयोगशाळेमध्ये एक अपघात होऊन हा विषाणू लीक झाला आहे’ असा थेट आरोपच केला आहे.

पण चीनने या लॅबच्या वेबसाईटवरील माहितीमध्ये अलीकडेच फेरफार केला आहे. या वेबसाईटवरुन काही महत्त्वाची छायाचित्रे चीनने काढून टाकली. चीनचे काही शास्रज्ञ वटवाघूळ पकडताहेत आणि ती पकडताना कोणत्याही पद्धतीची काळजी घेतली गेली नाहीये, असे या छायाचित्रांमधून दिसून येत होते. त्याचप्रमाणे या व्हायरालॅाजी लॅबच्या आतमध्ये नेमके काय काय आहे? यासंदर्भातील काही छायाचित्रे या वेबसाईटवर होती; पण तीही अचानकपणाने चीनने गायब केले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूबाबबत चीन नक्कीच काहीतरी लपवतो आहे हे आता स्पष्ट होत आहे.

2. या लॅबमध्ये काम करणार्‍या शास्रज्ञांवर आणि अन्य कर्मचार्‍यांवर चीनने प्रचंड बंधने आणली आहेत. या शास्रज्ञांच्या लिखाणावर आणि प्रकाशनावर निर्बंध आणले आहेत. आज चीनमध्ये एखाद्या अभ्यासकाला कोरोना कोविड 19 या विषाणूसंदर्भात एखादा लेख लिहायचा असेल किंवा प्रकाशन करायचे असेल तर त्याआधी चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते.

त्या पूर्ण लेखाची तपासणी सरकारकडून केली जाते आणि त्यानंतरच तो प्रकाशित करायचा की नाही? हे ठरवले जाते. याचे कारण यापूर्वी चीनच्या काही शास्रज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपर्समधून कोरोनाचा उगम वुहानमधील प्रयोगशाळेतूनच झाला आहे असा निष्कर्ष निघत होता. त्यामुळे चीन कमालीचा बिथरला आणि यापुढील काळात अशा संशोधनपर लेखांना पूर्वपरवानगीची अट घालण्यात आली.

फुडन विध्यापीठ आणि वूहान मधील चीन विद्यापीठानी आपल्या website वर प्रकाशित केलेले लेख त्यांना तात्काळ काढून घ्यावे लागले .

3.चीनने कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर वुहानमधून देशांतर्गत होणारी विमान वाहतूक तात्काळ बंद करुन टाकली; पण वुहानमध्ये जगभरातून येणार्‍या विमानांना परवानगी कायम ठेवली. यामुळे कोरोनाचा प्रसार जगभर झाला; पण चीनमधील बीजिंग, शांघाईमध्ये झाला नाही. चीनची ही चाल जगाच्या नजरेसमोर आली आहे.

4. एकीकडे, वुहान लॅबसंदर्भातील माहितीची लपवालपव करणे, अंतर्गत चौकशीसाठी परवानगी नाकारणे हे करत असताना चीन इंग्लंड, भारत, युरोपियन देश व अमेरिकेसह अनेक देशांना धमकावत आहे. तसेच चीनने आपल्या दातृत्त्वाची महती सांगण्यासाठी प्रपोगोंडा विंग सक्रिय केली आहे. वास्तविक, कोरोनाचा विषाणू जर वुहान लॅबमधून लीक झालेला नसेल तर चीनला घाबरण्याचे कारणच काय?

5. कैक्सिन ग्लोबल या स्वतंत्र प्रकाशनाने स्पष्ट केल्या प्रमाणे डिसेंबर महिन्यातच चीनने इंटरनेट सह लॅब मधील सर्व पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले होते .

वस्तुतः, कोरोना प्रकरणामध्ये जर काही काळेबेरे नसेल किंवा चीनची काही चूक किंवा छुपा हेतू किंवा अजेंडा नसेल तर चीनने ठामपणाने चौकशीस सामोरे गेले पाहिजे. कारण रहस्यमय पद्धतीने वागत राहिल्यास चीन अधिक गोत्यात येण्याची आणि जगाचा त्यांच्यावर असणारा संशय वाढत जाण्याची शक्यता आहे. पण चीन सध्या कमालीचा बिथरला आहे. कारण जर्मनीने चीनला 20 ट्रिलियनचे बिल पाठवले आहे. जगभरातील अन्य राष्ट्रेही चीनकडून अशा स्वरुपाच्या नुकसानभरपाईची मागणी करु शकतात.

अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी इंटेलिजन्सने दिलेल्या एका अहवालानुसार, वुहानच्या लॅबमधून कोरोना लीक होण्याचा प्रकार नोव्हेंबर महिन्यातच घडला होता. हा विषाणू जगभरात थैमान घालू शकतो याची चीनला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच चीनने जगभरातून वैद्यकीय साधनसामग्रीची मोठ्या प्रमाणावर आयात करुन ठेवली.

अनेक देशांमधून मास्क, पीपीटी किटस्, विषाणूशी लढण्यासाठीची औषधे आयात केली. या सर्वांचा प्रचंड साठा चीनने करुन ठेवला. त्याचबरोबर चीनकडून औषधांसाठी लागणारा कच्चा माल व अन्य सामग्रीची होणारी निर्यात त्यांनी कमी केली. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार जगभरात झाल्यानंतर अनेक देशांत या सामग्रीचा तुटवडा निर्माण व्हावा आणि त्या देशांना चीनवरच अवलंबून राहावे लागावे! या अहवालामुळे चीनचे पितळच उघडे पडले आहे.

यासंदर्भात आणखी एक घडामोड दिसून आली आहे. ती म्हणजे जागतिक महासत्ता बनण्याच्या असुरी महत्वाकांक्षेपोटी चीनने कमालीचा पैसा खर्च केला. गरीब देशांना वारेमाप कर्जे देऊन त्यांची स्वायत्तता अधिग्रहित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आपल्या इशार्‍यावर नाचवण्यास सुरुवात केली. कर्जाच्या बोज्याखाली दाबून त्या देशांच्या समुद्रहद्दीत आपल्या युद्धनौका उतरवण्यापर्यंत चीनची मजल गेली. पण आता चीनचा हा डाव फसला आहे.

कारण या देशांनी आता चीनला आम्हाला दिलेले कर्ज फेडण्याची आता आमच्यात क्षमता नाही, त्यामुळे हे कर्ज आता माफ करुन टाका, ते परत मागू नका, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कोरोना महामारीचा काळ संपल्यानंतर अख्खे जग चीनविरोधात एकवटण्याची शक्यता आहे. म्हणूनच चीनने वुहानला पूर्णपणे संरक्षित केले आहे. तेथील कसलीही-कोणतीही माहिती देण्यास चीन नकार देत आहे.

Updated : 19 May 2020 2:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top