Home > Election 2020 > भाजपा का हरतोय..

भाजपा का हरतोय..

भाजपा का हरतोय..
X

भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध सातत्याने अडखळतोय. गेल्या दीड वर्षात भाजपाच्या हातून सात राज्ये गेली तर कर्नाटक राज्य त्यांनी जुगाड करून आणलं. काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणाऱ्या भाजपासाठी आता पुढचा काळ अतिशय कठीण असणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुकीत बंपर बहुमत घेऊन आलेल्या भाजपाला अचानक लोकांनी का नाकारलं यावर विचार करायला सध्या वेळ दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या लहानमोठ्या निवडणुका लढल्या जातात. फारच अभावाने स्थानिक नेतृत्वाच्या हातात निवडणुक प्रचार किंवा निर्णयप्रक्रीयेची धुरा असते. जिंकण्याचा फॉर्म्युला सापडलेल्या मोदी-शहा यांच्यावर संपूर्ण पक्ष विसंबून आहे. आपण कसंही करून जिंकू शकतो हा दुर्दम्य आत्मविश्वास या दोघांना असल्यामुळे इतर कुणीही त्यांच्यासमोर तोंड उघडायला तयार नसतं. भाजपातील अंतर्गत लोकशाही हा आता विलुप्त होणाऱ्या प्रजातींसारखा विषय आहे. भाजपातील कुठल्याही नेत्याची या दोन नेत्यांना प्रश्न विचारायची हिंमत नाही.

हे ही वाचा..

देशातील अर्थव्यवस्था बसलेली आहे, बेरोजगारी वाढतेय, अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा निर्माण झालेला आहे, महिला-एससी,एसटी-अल्पसंख्यांक यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नवीन गुंतवणूक होत नाहीय. रस्त्यावर विद्यार्थी आंदोलनाला उतरेयत. ते काही ऐकायला तयार नाहीत. नोटबंदी, जीएसटी, त्यानंतर सातत्याने सुरू असलेली हिंदू-मुस्लीम, हिंदू-दलित चर्चा, 370 कलम, ट्रीपल तलाक, जम्मू कश्मीरचं त्रिभाजन, एनआरसी-सीएए, येऊ घातलेलं समान नागरी कायदा, पाकव्याप्त कश्मिरवर कब्जा इ इ झालेले आणि पाइपलाइन मधले असंख्य बिनकामाचे विषय उचलले गेले, यामुळे देशाची अर्थव्यवस्था सेटलच होऊ शकली नाही. या निर्णयांचे दूरगामी परिणाम होताना दिसतायत. या सर्व समस्यांवर उपाय शोधण्याएवजी सरकार सतत निवडणूक कँपेन मोडवर असलेलं दिसतंय. सातत्याने आक्रमक भाषणं, विरोधकांना शत्रू समजणं, घोडेबाजार यामुळे या जोडगोळीने अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवून टाकले. या गदारोळात भारतीय जनता पक्षाला सामान्य माणसाचा आवाज ऐकायची गरजच वाटली नाही. जनतेने निवढणुक निकालांच्या निमित्ताने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. त्यांना संदेश दिलाय. की वेळीच सुधारा.. ही जनता तुम्हाला गृहीत धरता येणार नाही.

– रवींद्र आंबेकर

Updated : 23 Dec 2019 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top