राजकीय भूकंप आणणारा तिशीचा तरुण
अमेरिकाच नव्हे तर जगभरातील प्रस्थापित राजकारण ढवळून काढणारा ३० वर्षांचा तरूण जोहरान ममदानी नेमका कोण आहे? त्याचे विचार आणि भूमिका सध्याच्या काळात किती महत्त्वाचे? जाणून घ्या लेखक डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडून…
X
जे घडणे कठीण वाटले होते ते अखेरीस झाले आहे. न्यूयॉर्कमधील सगळे अब्जपती ज्या तरुणाला पराभूत करण्यासाठी एकत्र आले ते अखेर हरले आणि जोहरान जिंकला. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी त्याने ट्विट केले होते,
"आमचा असा विश्वास आहे की, जगाच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत राष्ट्रातील, सर्वात श्रीमंत शहरात, कष्टकरी लोकांचे सन्मानाचं जगणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि ज्या अब्जाधीशांना वाटते की ही चळवळ म्हणजे ते लोकशाही सोबत करत असलेल्या भ्रष्टाचारासाठी मृत्यूघंटा आहे, होय, तुम्ही बरोबर आहात. येस, यू आर राइट ! "
आणि आज न्यूयॉर्क शहराचा नवा महापौर झालेला जोहरान ममदानी सांगतो आहे :
" Tonight, against all odds, we have grasped it. The future is in our hands. Tonight we have spoken in a clear voice, hope is alive." ... आणि जुलै महिन्यात महापौर पदाची प्राथमिक फेरी त्याने जिंकली तेव्हा मी लिहिलेले हे टिपण मला आठवते आहे...
जोहरान ममदानी वय वर्षे ३३. या तरुणाची सध्या अमेरिकेत आणि जगभर प्रचंड चर्चा सुरु आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये तो न्यूयॉर्क शहराचा महापौर होऊ शकतो. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी आवश्यक प्राथमिक फेरी त्याने मोठ्या फरकाने जिंकल्यात जमा आहे.
या प्रायमरीसाठी त्याने जी राजकीय मोहीम चालवली तिने निव्वळ न्यूयॉर्क शहरच नाही तर पूर्ण अमेरिकेचे राजकारण ढवळून काढले आहे. अमेरिकेच्या विद्वान अध्यक्षांना वेळ काढून त्याच्यावर टीका करणारे ट्विट करावे लागले यातच काय ते आले. ते तर या तरुणावर एवढे चिडले आहेत की त्यांना हा मुलगा पागल, कम्युनिस्ट अतिरेकी, दिसायला ऐकायला कसनुसा वाटतो पण त्यावर जोहरान अत्यंत सुस्पष्टपणे आपण कम्युनिस्ट नाही हे स्पष्ट करतो आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचं हे एक वाक्य म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा आहे असं सांगतो.
ते वाक्य म्हणजे , “Call it democracy, or call it democratic socialism, but there must be a better distribution of wealth within this country for all of God's children.”
या निवडणुकीने केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील प्रस्थापित राजकारण ढवळून निघाले आहे. या निमित्ताने त्याने शहरीकरणाने निर्माण केलेल्या अनेक प्रश्नांना हात घातला आहे. न्यूयॉर्क शहरात घरभाडी सर्वसामान्य लोकांच्या क्षमतेबाहेर गेली आहेत. त्यावर हा तोडगा घेऊन येतो.
रोज लागणाऱ्या घरगुती किराणा गोष्टी इतक्या महागल्या आहेत त्यावर तो सरकारी योग्य दरातील ग्रोसरी शॉप स्कीम मांडतो आहे. हे म्हणजे शासन व्यवस्थेला पुन्हा एकदा लोककल्याणकारी मार्गावर घेऊन जाणे, वेलफेअर स्टेटचे मोडीत निघालेले मॉडेल तो पुन्हा मांडतो आहे.
शहरातील बस सेवा पूर्ण मोफत करणे, मेट्रो दर कमी करणे, ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना. मोफत बाल आरोग्य सुविधा. अशा अनेक बाबींवर तो बोलतो आहे. खरे तर हे सारे प्रश्न आपल्याही शहरांसमोर आहेत. शहरातील सर्व स्तरातील लोकांशी बोलून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन तो हे बोलतो आहे. बंगाली, हिंदी, गुजराती, इंग्रजी अशा जवळपास बारा भाषांत तो लोकांशी संवाद साधतो आहे. डेमोक्रॅटिक सोशलिस्ट असोसिएशनचा सदस्य असणारा जोहरान अमेरिकन राजकारणाला समाजवादी दिशा देतो आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार यांच्या मुद्द्यावर बोलतो आहे.
राजकारणी म्हटलं की पॉप्युलिस्ट भूमिका घेणे, वेगवेगळ्या जात,धर्म वंशाच्या लोकांना काही क्लृप्त्या वापरून खुश करणे असले काहीच तो करत नाही आहे. स्वतः मुस्लिम असताना आणि अमेरिकेत, जगभर इस्लामोफोबिया वाढत असताना स्वतःची ओळख न लपवता हा तरुण पोर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर अगदी रोखठोक, प्रामाणिक भूमिका घेतो आहे.
न्यूयॉर्क शहरात ज्यू नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. इथले मोठे उद्योग त्यांच्या ताब्यात आहेत. आणि तरीही इस्त्राईल विरोधी भूमिका घ्यायला जोहरान अजिबात कचरत नाही. इस्त्राईल गाझामध्ये जे करते आहे तो वंशविच्छेद आहे आणि तेथील पंतप्रधान जर आमच्या शहरात आले तर आम्ही त्यांना अटक करु. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध खटला चालला पाहिजे, हे तो स्पष्टपणे बजावतो. आणि तरीही बरेच ज्यू नागरिक देखील त्याच्यासोबत उभे राहतात. अमेरिकेच्या वर्तमान अध्यक्षांना खुलेआम हुकुमशहा म्हणतो.
जे योग्य ते योग्य, जे चुकीचे ते चुकीचे. मतपेटी चुचकारण्यासाठी जोहरान कुठेही बोटचेपी भूमिका घेत नाही. त्याच्या सभांना जी गर्दी होते आहे तेवढी तर अध्यक्ष महोदयांच्या सभेलाही होत नाही, अशी अवस्था!
या तरुणाने अमेरिकेत राजकीय भूकंप आणला आहे, अशा शब्दांत द गार्डियन त्याचे कौतुक करते. ज्या उमेदवारांच्या पाठीमागे भांडवलशाही व्यवस्था उभी आहे, जो स्वतः प्रचंड श्रीमंत आहे अशा उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभूत करत हा पोरगा पुढे निघाला आहे.
भारतीयांच्या आनंदाची बाब म्हणजे जोहरान हा सलाम बॉम्बे, मिसिसिपी मसाला अशा चित्रपटांच्या प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर यांचा मुलगा आहे. त्याचे वडील मोहम्मद ममदानी हे गुजराती मूळ असणारे आणि युगांडामध्ये वाढलेले नामवंत अकॅडमिशीयन आहेत.
त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे आजच्या काळात जगभरातील अवघे राजकारण एकारलेलं, संकुचित, युद्धज्वर वाढविणारे असे होत असताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे नेमके भान ठेवत मानवकेंद्री, जमिनीवरील मुद्द्यांना आत्मीयतेने स्पर्श करणारे नवे राजकारण जोहरान ममदानीच्या रूपाने पुन्हा एकदा आकाराला येताना दिसत आहे. अनेकजण त्याला नवा ओबामा म्हणत आहेत. अनेकांना तो ओबामांच्याही दोन पावले पुढे आहे, हे जाणवते आहे.
अर्थात सगळेच अलबेल चालले आहे अशातला भाग नाही जोहरानच्या धर्मावरून त्याला ट्रोल करणारे खूप जण आहेत. कुणी त्याच्या कारवर बॉम्ब टाकून उडवू इच्छिते, कुणी त्याला छोटा मोहम्मद म्हणते, न्यूयॉर्कसाठी तो डेंजरस आहे म्हणते, त्याचे नागरिकत्व काढून घेऊन त्याला देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे, असे म्हणते. जोहरान निराश होत नाही आणि पण त्याला खूप वाईट वाटते. हा द्वेष मावळावा, म्हणून आपल्याला काम करावे लागेल असे सांगतानाच हे मूठभर लोक म्हणजे संपूर्ण अमेरिका नाही, हेही आपल्याला त्यांना दाखवून द्यावे लागेल. मला या धमक्यांची भीती वाटत नाही असे नाही कारण त्या धमक्या माझ्या प्रिय व्यक्तींसाठी देखील आहेत. पण माझे न्यूयॉर्क वर प्रेम आहे. इथे मी लहानाचा मोठा झालो आहे. हे शहर सर्वासाठी सुरक्षित, परवडणारे आणि आनंददायी व्हावे, यासाठी प्रयत्न करणे हेच या धर्मांधतेवर उत्तर आहे.
आपल्या जगण्याला अर्थ देणाऱ्या खऱ्याखुऱ्या राजकारणात सर्वांनी सहभागी होणे, हेच या सगळ्यावरील समाधान आहे. अवघ्या तिशीतील या तरुणाची परिपक्वता, समंजसपणा आपल्याला थक्क करतो. सोशल मीडिया वापरातील त्याची कल्पकता अफलातून आहे.
आपण आणि आपल्या तरुण पिढीने त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आपले शहर हे सर्वसामान्य कष्टकरी, कामकरी लोकांसाठी परवडणारे शहर व्हावे, यासाठी धडपडणारा जोहरान आपल्या शहरांनाही हवा आहे. आणि खरे म्हणजे आपल्या राजकारणात पूर्वीची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणारे असे नवतरुण का येऊ शकत नाहीत, याचाही विचार आपण गांभीर्याने करायला हवा.
प्रदीप आवटे
(लेखक)
(साभार - सदर लेख डॉ. प्रदीप आवटे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






