Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारत मातेच्या पोटातील धर्मनिरपेक्षतेचा गर्भ कोण नष्ट करतंय ?

भारत मातेच्या पोटातील धर्मनिरपेक्षतेचा गर्भ कोण नष्ट करतंय ?

भारताच्या मातीत रुजलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला कोण संपऊ पाहत आहे ? देशाला अराजकतेकडे घेउन जाणाऱ्या षडयंत्राला थोपवणारी ग्रामीण संस्कृतीतील धार्मिक एकात्मतेचे सखोल विश्लेषण करणारे मुक्त पत्रकार आकाश दौंडे यांचे सखोल विश्लेषण नक्की वाचा…

भारत मातेच्या पोटातील धर्मनिरपेक्षतेचा गर्भ कोण नष्ट करतंय ?
X

भारत मातेने आपल्या पोटात सर्वधर्म समभावाचा गर्भ सुरक्षितपणे वाढवला. यातूनच भारतात लोकशाहीच्या तत्वज्ञानाचा जन्म झाला. हे तत्त्व भारतातील विविधतेत एकता असणाऱ्या मातीत रुजले. भारत जगात बुद्ध आणि गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. राज्यघटनेतील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता देशाला एकत्र बांधून ठेवण्यास समर्थ आहेत. धर्मनिरपेक्षता हा शब्द धर्मांध विषमतावादी शक्तींना कायमच खटकला आहे. या देशात फक्त हिंदू लोक आहेत, इतरांना दुय्यम दर्जा दिला जावा अशी मागणी इथले काही आमदार,खासदार करतात. इथपर्यंत या शक्तींची मजल गेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून काही प्रतिगामी शक्तींनी भारत हा एक-धर्मीय देश अशी ओळख मिळावी म्हणून प्रयत्न केले जे आजही सुरु आहेत. त्यासाठी त्यांनी द्वेष, खोटा इतिहास, धार्मिक-जातीय दंगली, प्रभावी प्रचारतंत्र त्याबरोबर बहुमताचे सरकार, दडपशाही, महापुरुषांची बदनामी, नोटाबंदी अशी त्यांच्या परंपरेला साजेशी असंवैधानिक हत्यारे वापरली.

भारताच्या सर्व नागरिकांना भारतीय म्हणून संविधानाने ओळख दिलेली आहे. त्यातही एक धर्मीय ओळख असावी हा अट्टाहास संविधान विरोधी आहे. जास्तीत जास्त धर्माचा वापर करून दंगली घडविण्याचे, स्वतःचे राजकीय पक्ष वाढविण्याचे प्रकार शहरात सर्रास सुरु झाले आहेत. शहरात छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांनी जनतेमध्ये एकमेकांप्रती हिंदू-मुस्लीम धार्मिक द्वेष पेरून दंगलीचे, समाजाच्या ध्रुवीकरनाचे पीक उगविले त्यावर स्वतःच्या सत्तासंबंधाची पोळी शेकून घेतली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी छोट्या मोठ्या वादाला धार्मिक स्वरूप आणून रक्तपात घडवून आणला जात आहे. एकीकडे हे सगळं घडत असलं तरी ग्रामीण भागात हिंदू-मुस्लीम द्वेषाचा वणवा अजून तरी पोहोचला नाही त्याला काही कारणं आहेत, त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे इथल्या शेतकरी, कष्टकरी समाजाने सर्व धर्माच्या स्थळांना आपलं मानलं. प्रत्येक पंचक्रोशीत असे एखादे पीर स्थळ आहे ज्यावर सर्वधर्मीयांची श्रद्धा आहे. इथे मरीआई आहे आणि इंग्लिश माता पण आहे. इथल्या मातीतल्या काही श्रद्धास्थळांनी समाजाच्या एकजुटीला, शांततेला, भाईचाऱ्याला एकसंध ठेवले.

धार्मिकता हा ग्रामीण समाजात फुट पाडण्याचा, दंगली घडविण्याचा भाग कधीच राहिला नाही. त्याला अशाच काही श्रद्धास्थळांपैकी एक म्हणजे गैबीबाबा महाराज. कुणी गैबीबाबा म्हणतात तर कुणी गैबी महाराज म्हणतात. महाराष्ट्रातल्या अहमदनगर व भगवान गडाजवळचे गैबीबाबा महाराज हे हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माच्या श्रमिक, शेतकरी भाविकांचे भक्तीस्थळ आहे.

अशा प्रत्येक धार्मिक स्थळाला एखाद्या विशिष्ट रंगाचा झेंडा असतो. विशेष म्हणजे गैबी महाराजांच्या चिंचेवर जो झेंडा आहे तो शुभ्र-पांढऱ्या रंगाचा आहे. शुभ्र पांढरा रंग नेहमीच युद्धानंतरच्या तहाचा, शांततेचा, पारदर्शकतेचा प्रतिक राहिलेला आहे. दरवर्षी दिवाळीनंतर वीस दिवसांनी शनिवारी जत्रा भरते. शुक्रवारी आजूबाजूच्या गावातील लोकांचे नवस फेडले जातात. बोकडाची कंदुरी केली जाते. आपल्या पाहुणे, नातेवाईक, सगे-सोयऱ्यांना तिखटाचे म्हणजे मांसाहारी जेवण दिले जाते.

पीर हे नेहमीच सुफी संप्रदायातील महत्वाचे संतपद राहिलेले आहे. सुफी ज्यांनी जगभर प्रेमाचा प्रसार केला. रुग्णांची सेवा केली, गरिबांना अन्न दिले. संगीत निर्माण केलं, प्रेमाचे तत्वज्ञान जगभर पोहोचवले. गैबी महाराजांचे हे स्थान नसून गहिनीनाथाचे स्थान आहे. आदिलशहाने इथे आक्रमण करून हिंदू देवस्थानाचे मुस्लीम पीर करून टाकले अशी अफवा पसरली. या अफवेला काही अर्थ नाही. धार्मिक वितुष्टीकरणाचे हे विष ग्रामीण भागात पोहोचवण्याचे काम ठराविक धर्मांध शक्ती करत आहेत. जगभरातील सर्वसामान्य जनता अशा अर्धसत्य प्रचारतंत्राच्या नेहमीच गळाला लागलेली दिसते. प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक पठाण गुरुजींनी त्यांच्या डोळ्यासमोर घडलेल्या धार्मिक आक्रमनाच्या काही घटना सांगितल्या.

बीड अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील कारेगावात असेच ‘जान पीर’ होते. वीस वर्षापूर्वी तिथे जातवर्चस्व असलेल्या मेहतरे समाजाने हे जान पीर नसून ‘जालिंदरनाथ’ असे केले. तिथे पूर्वी मस्जिद होती, तुरबत होती. त्याबरोबरच उन्हाळ्यात तिथे ३०-४० कंदूऱ्या व्हायच्या. कंदूरी म्हणजे बोकडाचा बळी देणे. मुस्लीम-हिंदू धर्मीय लोकांत तिथे भांडण होऊन शेवटी जालिंदरनाथची मूर्ती स्थापन केली. पाटोद्याच्या बोर्डरवरील एक गाव आहे. वामनभाऊ गडाच्या शेजारी ‘तारक पीर मालिक’ होते तिथे ‘तारकेश्वर’ देवाची स्थापना केली. हिंदू धर्मियांच्या मते इथे नाथ संप्रदायातील नवनाथ हे दूरदृष्टीचे होते. हिंदूंच्या म्हणण्यानुसार निजाम सत्तेने महादेव मंदिराच्या पिंडी बुजवल्या आणि तुरबती बांधल्या.

गैबी महाराजांच्या पीर स्थानावर गहीनीनाथाचे देवस्थान करण्याचे षडयंत्र होते, ते स्थानिकांनी हाणून पाडले. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ताम्रपत्र दाखवून शांत झाले. ग्रामीण भागात जातीयतेचे भीषण स्वरूप असले तरी धार्मिकतेवरून तणाव क्वचित होता त्याचे प्रमाण आता वाढत आहे. मात्र भारतीय ग्रामीण समाजमनाचा ठाव घेतला तर सर्वसमावेशकता हा इथल्या मातीचा स्वभावगुण आहे. ग्रामीण समाजजीवन नेहमी परस्परावलंबी असल्याने, सहकार्य आणि बंधुभाव या मानवी मूल्यांनी जोडला गेला आहे. भारतमातेच्या पवित्र उदरात आकारास आलेला धर्मनिरपेक्षतेचा गर्भ कायमचा संपविण्याचे षडयंत्र सातत्याने रचले जाते. परंतु भरताच्या मातीत रुजलेल्या अशा धार्मिक सहिष्णुतेच्या परंपरांनी हे षडयंत्र कायमच हाणून पाडले आहे. अशा परंपरा जोपर्यंत टिकून आहेत. भारतीय संविधानाचे तत्व जोपर्यंत इथल्या जनमाणसात रुजलेले आहे तोपर्यंत देशातील एकात्मतेला नख लावण्यात या शक्ती यशस्वी होणार नाहीत…

– आकाश दौंडे

(M.Sc. Media & Communication Studies, SPPU)

संपर्क – 7303025010

Updated : 6 Aug 2023 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top