पत्रकारितेची चिंता...
X
पत्रकारितेचं काय होणार? याची सर्वांना चिंता लागली आहे, मला ही अशी चिंता वारंवार सतावते. सरकार दमन करते. म्हणून पत्रकारिता धोक्यात आहे असं म्हणणं मला धाडसाचं वाटतं. खर तर पत्रकारिता पत्रकारांमुळे सुद्धा धोक्यात आहे.
गेल्या काही वर्षांपासून मी नवोदीत तसंच वरिष्ठ पत्रकारांच्या नोकरीसाठी मुलाखती घेत आलोय. ओळख आहे म्हणून नोकरी मिळेलच अशा अपेक्षेने अनेक जण मुलाखत द्यायला येतात. मुलाखतींदरम्यान जे अनेक विषय माझ्या लक्षात आले ते थोडं संगतवार मांडण्याचा प्रयत्न करतो, मग पुढचा विषय मांडतो. मी सुद्धा नोकरीसाठी मुलाखती दिल्यायत. तो नर्वसनेस मी सुद्धा अनुभवलाय. काही ठिकाणी तर मला माझं प्रेझेंटेशनच करता आलं नाही.
मी काय करू शकतो हे सांगता आलं नाही, आणि मी नोकरी मिळवण्यात फेल झालो. माझं म्हणणं असायचं की मला संधी द्या, आणि मी काय करू शकतो ते एकदा बघा, पण केवळ इतक्या भांडवलावर नोकरी मिळू शकत नाही. हे मला टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसल्यानंतर समजायला लागलं.
कॉन्फीडन्स हा भाग वगळला तरी काही बेसिक गोष्टी असतात. ज्यावर पत्रकारांनी लक्ष दिलं पाहिजे. काम करता करता कॉन्फिडन्स येऊ शकतो. म्हणून मी कॉन्फिडन्स ला नेहमीच कमी मार्क ठेवायचो.
१) स्क्रीप्ट - आपल्याला चांगलं लिहिता यायला पाहिजे. मध्ये गॅप झाला म्हणून लिहायचं विसरलो-विसरले असं सांगणाऱ्यांनी पत्रकारितेत येऊ नये. अशा लोकांना पत्रकारिता प्रशिक्षण केंद्रांनी केवळ पैसे मिळतात. म्हणून पास ही करू नये. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचंय. त्या क्षेत्राचा पायाच चांगलं शैलीपूर्ण लिहिण्याचा आहे.
२) मांडणी आणि कल्पकता - आपल्याला जे मांडायचं आहे. ते किमान आपल्याला समजेल असं लिहिलं पाहिजे. ते जर समजलं असेल तर कल्पकतेने मांडता यायला पाहिजे.
३) शोधक वृत्ती - बातमी कशी शोधायची, त्यासाठी सोर्सेस कसे मिळवायचे, एखादी बातमी कन्फर्म करून कशी घ्यायची? याची हौस अंगभूत असणे गरजेचे आहे. जर जे दिसतंय ते सत्य मानून चाललं तर मग पत्रकारांची गरजच काय.
४) अभ्यास करण्याची वृत्ती - आपल्याला जितकं सांगितलंय तितकंच काम करायचं, किंवा जितका पगार तितकं काम अशी वृत्ती बाळगून पत्रकारितेत येऊ नका. जो विषय मांडायचा आहे. त्या विषयाचा किमान अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास करण्याची इच्छा असली पाहिजे. किती अभ्यास करायचा याचं गणित पगारावर अवलंबून असता कामा नये.
५) तंत्रज्ञानाची माहिती - अनेक लोकांना साध टायपिंगही करता येत नाही. सवयीने टायपिंग शिकता येऊ शकेल, पण हा शिकण्याचा भार जो नोकरी देणार आहे. त्यावर न टाकता आपापल्या शैक्षणिक संस्थांवर टाकायला हवा.
विद्यार्थी जीवनातच टायपिंग शिकून बाहेर पडायला हवं. पत्रकारितेतही आता नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अल्गोरिदम, ॲनॅलिटीक्स येत आहे. बातम्या लिहिताना आता याचा वापर केला जातो. चांगलं कंटेट असेल तर ते सर्व अल्गोरिदम आणि ॲनॅलिटिक्स मागे टाकतं, पण कंटेट जर सुमार असेल तर तुम्हाला असे टूल्स वापरावे लागतात.
आपण ज्या क्षेत्रात जाणार आहोत. त्या क्षेत्रात उद्या तंत्रज्ञानाने आपली नोकरी गटकावू नये. असं वाटत असेल तर भविष्यातील सर्व येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे, ते हाताळण्याची तयारी असली पाहिजे, खळखळ असता कामा नये.
६) गैरसमज - कॅमेरासमोर बोलता येतं म्हणजे पत्रकार असा समज सध्या पसरलाय. चांगली बातमी शोधता यायला पाहिजे, कॅमेरासमोर ती मांडता यायला पाहिजे. विश्लेषण बातमीवर होऊ शकतं, विश्लेषणासाठी चांगली इन-डेप्थ बातमी आवश्यक असते. रिपोर्टरच अर्धवट बातम्या देत असतील तर विश्लेषण ही अर्धवटच होईल. अनेक रिपोर्टर तर फिल्डवर बातमीदारी कमी आणि विश्लेषण जास्त करतात, कारण त्यांच्याकडे बातमीच नसते.
७) हे माझं काम नाही - हे माझं काम नाही. या भावनेतून बाहेर पडलं पाहिजे. कॅमेरामन ला बातमी लिहिता यायला पाहिजे, कॅमेरासमोर बोलता यायला पाहिजे. रिपोर्टर ला कॅमेरा वापरता यायला पाहिजे, एडीटींग करता यायला पाहिजे. संपूर्ण पॅकेजिंग करता यायला पाहिजे.
८) रिटायर्डमेंट ची भावना - अनेक वरिष्ठ पत्रकार नोकरी गेली म्हणून तक्रार करतात. जास्त पगार असणाऱ्याची जबाबदारी ही जास्त असते. पण अनेकदा सिनिअर झालो म्हणजे काम कमी केलं पाहिजे अशा भावनेत काही पत्रकार जातात. ते फिल्डवर जायचं टाळतात. मध्यंतरी एका वरिष्ठ पत्रकाराला मी कॅबिनेट मिटींग कव्हर करायला सांगितलं तर त्यांनी मला एखाद्या ज्युनिअर माणसाला पाठवा असा सल्ला दिला. म्हणजे ज्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ उपस्थित असतं. जिथे राज्याच्या कल्याणाचे किंवा काही लोकांना फायदा पोहोचण्याचे निर्णय घेतले जातात, ज्या बैठकीत बसण्यासाठी विरोधी पक्षातील नेते हयात घालवतात. त्या बातमीला पत्रकार किरकोळ मानायला लागतात. तेव्हा त्यांच्या गच्छंतीची तयारी ते स्वतःच करत असतात. जास्त पगार म्हणजे कमी काम असा अर्थ नाही तर तुमची जबाबदारी वाढलेली आहे, संस्थेच्या वाढीतलं तुमचं योगदान ही वाढलेलं आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा बातमीला, राज्याला व्हायला पाहिजे ही भावना विसरून चालणार नाही. असे लोक सतत नवीन लोकांच्या नाविन्यपूर्ण विचारांना-उपक्रमांना खोडा ही घालत असतात.
९) जो जे सांगेल ते सत्य - अनेक पत्रकार फक्त बाइट बेस्ड जर्नालिजम करतात. एखाद्याने बाइट दिला की, हंगामा करतात की माझ्याकडेच एक्स्लुसिव आहे, तरी कंपनी बाइट चालवत नाही. खरं तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ज्या बातमीत काही इम्पॅक्ट नाही. ती बातमीच नाही. अशा एका थिअरीवर तुमची स्टोरी खरी उतरते का..? आपल्या बातम्यांना हा निकष लावून बघा. अनेकदा अशा बाइटना ब्रेकींग स्टोरी समजण्याची गल्लत पण केली जाते.
१०) आपल्याला करायचं काय आहे? हे शेवटपर्यंत न समजणे - मी पत्रकारितेत का आलोय? किंवा आलो हेच अनेकांना माहित नसतं. बॉस सांगेल ती बातमी करणे. हाच अनेकांच्या नोकरीचा निकष आहे. तुमचं प्राविण्य कशात आहे हे शोधता आलं पाहिजे. स्वतःहून बातम्या शोधता आल्या पाहिजेत. त्या वर इम्पॅक्ट घेता यायला पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. अजूनही बरंच काही आहे. पण मिशन नसलेल्या पत्रकार, माध्यमं आणि मालकांमुळे खर तर पत्रकारिता धोक्यात आहे, सरकार आणि राज्यकर्त्यांचा नंबर फ़ार नंतर लागतो असं माझं प्रामाणिक मत आहे.