Home > मॅक्स ब्लॉग्ज > का होतंय अण्णांचे 2011चे आंदोलन बदनाम?

का होतंय अण्णांचे 2011चे आंदोलन बदनाम?

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक समर्थक 2011 च्या आंदोलनाला बदनाम करत आहेत.

या आंदोलनात बाबा, रविशंकर असे उजवे लोक होते तसंच स्वामी अग्निवेश, शांतीभूषण, अरूणा रॉय, मेधाताई, प्रशांतभूषण, योगेंद्र यादव, राजेंद्रसिंह, राजगोपाल अशी सेक्युलर मंडळीही होती. या मंडळींना महाराष्ट्रात जाती-धर्मवाद पोसणार्या लोकांकडून पुरोगिमित्वाच्या प्रमाणपत्राची अट अजून तरी भारतीय राज्यघटनेनं घातलेली नाही.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी योगेंद्र यादवांचं एक फार चपखल विधान उद्धृत केलं आहे, योगेंद्र म्हणतात की 'यह आंदोलन भारत का कुंभ है!' हेच खरं विश्लेषण आहे. निखीलजींनी अण्णांवर टीका केलेली आहे पण त्याच वेळी 'अण्णा संघाचे' हे स्पष्टपणे नाकारलंही आहे. शिवाय तशी टीका करण्याचा त्यांना अधिकारही आहे कारण 2011 सालीच नाही तर प्रत्येकच जनांदोलनाला त्यांनी पत्रकार म्हणूनच नाही पण त्यापुढे जाऊन कार्यकर्ता म्हणून साथ दिलेली आहे.

पण निखीलजींना अशी टिका करण्याचा नैतिक अधिकार आहे तो कॉंग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांना नक्कीच नाही. 'संघाचं आंदोलन' हा सिद्धांत महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादीच्या समर्थकांनी चालवला आहे. त्यांचे हेतू स्पष्ट आहेत. तो राजकारणात त्यांच्या सोयीचा प्रचार आहे.

त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की आंदोलन संघाचं होतं तर त्याची सांगता संसदेनं अण्णांना 'सॅल्यूट' करून का केली आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे खासदार त्या 'सॅल्यूट'मध्ये सहभागी कसे झाले? नवाब मलिकांनी आरोप करताच माफी मागण्याचा मनाचा मोठेपणा अजितदादांनी का दाखवला? कालच्या आंदोलनाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीनं पाठिंबा का दिला?

पुन्हा एकदा सांगतो. मी एक वर्षापूर्वी आंदोलनातून बाहेर पडलो. अण्णा आणि अरविंदवर टीका करण्याचा प्रत्येकाला हक्कही आहे हेही मला मान्य आहे पण त्यासाठी 2011 च्या आंदोलनाला, त्यातल्या कार्यकर्त्यांच्या तळमळीला, जनतेनं दिलेल्या पाठिंब्याला कमी लेखण्याचा, त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच माझं म्हणणं आहे.

आणि काहीच नव्हतं तरी आंदोलन केलं असा आव तर आणूच नका! सुरेश कलमाडी जेलमध्ये गेलेले लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. लवासावर झालेली कारवाईही लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलीय. फडणवीसांचं सरकार कोणाच्या आवाजी पाठिंब्यावर तगलं हाही प्रश्न स्वतःला विचारून बघा.

महाराष्ट्रात तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नसाल तर संघ-भाजपवाले आहात असा एक पद्धतशीर प्रचार गेली दोन वर्ष सुरू आहे. ही बायनरी कुठून आणि कोणी तयार केली हेही सगळ्यांना माहित आहे. भाजप पेक्षा काँग्रेस परवडली या न्यायानं आम्ही काँग्रेसला पाठिंबाही देत आहोत, 2019 साली देऊ. पण याचा अर्थ या पक्षांनं स्वतःला भारतीय जनतेपेक्षा श्रेष्ठ समजू नये. जनता सर्व काही पहात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुरोगामित्वाच्या सर्टिफिकेटची ज्यांना गरज नाही असे अनेक समूह (उदा. गांधीवादी, समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी इ.) देशात आणि महाराष्ट्रात आहेत आणि ते या दोन्ही पक्षांपेक्षा अधिक सेक्युलर आहेत हे लक्षात ठेवावं. आणि त्यांचा संघविरोध, मोदीविरोध तुमच्यापेक्षा प्रामाणिक आहे. तुम्ही अनेक जिल्हा परिषद, मनपात भाजपला पोषक भूमिका घेतली आहे हेही जगजाहीर आहे.

मोदींना विरोध करतांना सगळ्यांना एकत्र यावं लागेल हे खरं पण अशा ताकदींना तुमच्या टर्म्स वर 'गृहीत' धरू नका एवढंच सांगायचंय.

विश्वंभर चौधरी

Updated : 10 Feb 2019 2:39 AM GMT
Next Story
Share it
Top