Home > मॅक्स ब्लॉग्ज > जेव्हा मजूर आणि शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा व्यवस्था हादरते...

जेव्हा मजूर आणि शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा व्यवस्था हादरते...

जेव्हा मजूर आणि शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा व्यवस्था हादरते...
X

२०२० हे वर्ष अखेर सरलं आहे...संपूर्ण जगावर न भूतो... असे संकट आणणारे हे वर्ष कधी संपते आणि कधी नवीन वर्ष सुरू होते याची प्रतिक्षा सगळेच करत होते....नव्या कोरोनाचे संकट असले तरी नववर्षाच्या सुरूवातीला कोरोनावरील लस येईल आणि या संकटातून सुटका होईल अशी आशा आहे....

पण सरत्या वर्षाने आपल्याला शिकवलेला धडा कधीही विसरता येणार नाही असा आहे....सध्या दिल्लीच्या रस्त्यांवर भर थंडीत आंदोलन करणारे शेतकरी असो की एप्रिल - मेच्या भर उन्हात रस्त्यांवरुन शेकडो किलोमीटर पायी जाणारे स्थलांतरीत कामागार असो....प्रश्न संपलेले नाहीत. व्यवस्थेला जेव्हा निर्णय़ घ्यायची वेळ येते तेव्हा सर्वसामान्यांचा विचार होत नाही हेच लॉकडाऊनने आणि कृषी कायद्यांबाबत झालेल्या गोंधळाने दाखवून दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेने कोट्यवधी स्थलांतरीत कामगार, मजूर, हातावर पोट असणारे लोक अडकून पडले. हाताला काम नाही पोटाला अन्न नाही अशा परिस्थितीत अखेर लॉकडाऊनचे सर्व नियम छातीठोकपणे मोडत हे मजूर रस्त्यांवर उतरले आणि शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपापल्या घरांकडे निघाले....अखेर सरकारला याची दखल घेत या लोकांसाठी विशेष ट्रेन सोडाव्या लागल्या....

याचप्रमाणे मागे न हटण्याच्या इराद्याने दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांची दखल घेत सरकारला चर्चेसाठी बसावे लागले आणि काही मागण्याही मान्य कराव्या लागल्या आहेत.

एक समाज म्हणून आपण खूप चुकलोय आणि मोजक्या लोकांसाठी उभ्या केलेल्या व्यवस्था उपयोगाच्या नाहीत हे कोरोनाने दाखवून दिले आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या बळीराजाने सरकार तुम्ही चुकताय, सुधारा.... हे सांगण्याची धमक दाखवलीये...नवीन वर्षाच्या सुरूवातीला हे संकेत आश्वासक वाटत आहेत...शेतकरी आंदोलनाने केवळ सरकारला नाही तर या देशातील तमाम राजकारण्यांना आणि सामान्यांच्या जीवावर आपल्या नफ्याचे इमले उभे कऱणाऱ्या उद्योजकांना इशारा दिला आहे...शेतकरी आणि मजूर हा अर्थव्यवस्थेचा पाया आहे, कुणी कितीही विकासाचे दावे केले तरी या दोन घटकांना जेव्हा तुम्ही संकटात ढकलता तेव्हा ते त्याच ताकदीने उभे ठाकतात. जेव्हा सामान्यांच्या सहनशक्तीचा अंत होतो आणि त्यांना आपल्या शक्तीची जाणीव त्यांना होते तेव्हा व्यवस्था हादरते...म्हणूनच नवीन वर्षात आणखी सावध राहूया.....भान जपूया....

Updated : 1 Jan 2021 4:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top