स्वार्थी क्रांतीकारक!
X
जगाच्या नकाशावर जन आंदोलनांतून राज्यक्रांती घडवून आणणाऱ्या मूठभर नेत्यांपैकी एक माओ-त्से- तुंग. त्यांचा स्मृतीदिन. भारतीयांमध्ये उत्सुकता, प्रेम, तिरस्कार व संताप या सर्व भावना जागृत करणारा हा खऱ्या अर्थाने जन नेता. चीन या महाप्रचंड देशाला जागतिक नकाशावर आणणाऱ्या माओने चिनी सत्ता व जनता यांना एकाच वेळी जगापासून तोडलेसुद्धा.
कोणत्याही प्रचलीत सिद्धान्तापेक्षा वेगळा असा 'माओवाद' त्याने जगाला दिला. कम्युनिस्ट विचारसरणीचा उद्घाता कार्ल मार्क्स याने कामगाराला क्रांतीचा 'दूत' मानले. त्यानुसार रशियन क्रांती झाली. पण माओने साम्यवाद स्वीकारतानाच चीनमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आपल्या चळवळीची उभारणी केली. ही यशस्वीरित्या राबवली.
माओचा जन्म २६ डिसेंबर १८९३ रोजी चीनच्या हूनान प्रांतातील षाओषान या गावी झाला. त्यावेळी चीनमध्ये मांचू घराण्याची राजवट होती. मांचू घराण्याविरूद्ध चीनमध्ये लोकशाहीवादी चळवळीला सुरूवात झाली. १९११ मध्ये कुओमिंतांग पक्षाने राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही स्थापन करण्यास पुढाकार घेतला. त्या पक्षाचे एक सक्रिय सदस्य म्हणून माओ त्या काळात ओळखले जात.
Courtesy: Social Media
१ जानेवारी १९१२ रोजी सन्यत्सेन यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये नवे सरकार स्थापन करण्यात आले. त्यावेळी नव्या लोकशाही सरकार विरूद्ध लष्करी सत्ता उभी होण्याचा प्रयत्न करू लागली. सन्यत्सेनच्या मृत्यूनंतर चॅंग कै शेक हे पक्षप्रमुख झाले. तेव्हा मार्क्स-लेनिन यांच्या विचारांनी प्रभावित होवून माओंनी चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मात्र, चीनमध्ये कामगाराऐवजी शेतकर्याला महत्त्व देण्यात आले.
१९२० पासून माओ नव्या पक्षात सक्रिय झाले, तर चॅंग कै शेक हे आपल्या क्वोमिंतांग पक्षाशीच एकनिष्ठ राहिले. सरंजामशाहीविरूद्ध चळवळ उभी करणे. हेच माओ यांचे मुख्य ध्येय बनले. या कामासाठी जुन्या क्वोमिंतांग पक्षाचीही मदत घेण्याचे ठरले होते.
१९२७ येईपर्यंत क्वोमिंतांग-कम्युनिस्टांचे सख्य संपल्यावर क्वोमिंतांग पक्षाच्या लोकांची सर्रास कत्तल सुरू झाली. तर दुसरीकडे माओ आणि त्यांच्या समर्थकांनी जमीनदारांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेतकर्यांना वाटण्यास सुरूवात केली. यामुळे माओंना लोकांचा पाठिंबा मिळू लागला. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबर १९३० पासून चॅंग कै शेक यांच्या क्वोमिंतांग पक्षाविरूद्ध कम्युनिस्ट रेड आर्मीचे युद्ध् सुरू झाले. कम्युनिस्टांविरुद्ध काढण्यात आलेल्या चार मोहिमांमध्ये चॅंग कै शेकना अपयश आले. मात्र, पाचव्या मोहिमेत चॅंग कै शेकना यश आले. कम्युनिस्टांना युद्धातून माघार घ्यावी लागली.
Courtesy: Social Media
हा पराभव माओ यांच्या जिव्हारी लागला. आपले ८५ हजारांच्या वर सैन्य, १५०० वर सैनिक घेऊन माओ चीनमधील ११ प्रांतांत वर्षभर फिरत राहिले. इतिहासात प्रसिद्ध झालेला हाच तो 'लॉगमार्च'. ही प्रदीर्घ पदयात्रा वर्षभराने षा'न्शी प्रांतात पोहोचली. माओंना त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविता आले होते, लोकांनी त्यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा दिला.
एकीकडे माओंचा हा 'लॉंग मार्च' सुरू असतांना जपानने चीनवर आक्रमण केले. यावेळी क्वोमिंतांग आणि कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन जपानी सेनेविरूद्ध लढा द्यावा. अशी भूमिका माओंनी घेतली. दोन्ही पक्षांत मतभेद दिसताच चॅंग कै शेकला अटक करण्यात आली. पण परक्या सेनेसमोर मतभेद उघड होऊ नये म्हणून लगेच चॅंग कै शेकची सुटका करण्यात आली.
१९३८ ते १९४५ या काळात माओंच्या नेतृत्वात दोन्ही पक्षांच्या सहकार्याने जपानशी युद्ध झाले. १९४५ साली दुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाल्यावर अमेरिकेने कम्युनिस्टांविरूद्ध चॅंग कै शेकला लष्करी मदत दिली. या मदतीमुळे १९४६ पासून क्वोमिंतांग विरूद्ध कम्युनिस्ट असे सरळ युद्ध सुरू झाले. अखेर १९४९ साली चॅंगच्या क्वोमिंतांग पक्षाचा दारूण पराभव झाला.
१ ऑक्टोबर १९४९ ला माओंच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जनता-प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या प्रजासत्ताकाचे सर्व कामकाज सोव्हियेत संघातील पद्धतीने करण्याचे ठरविले गेले. पण हळूहळू माओंच्या लक्षात आले. की, आपल्या देशातील कार्य पद्धती सोव्हियत संघासारखी न ठेवता सत्तेचे विकेंद्रीकरण करून शेतकर्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. लोकांकडून घेऊन लोकांना परत देणे. अशी पद्धत सुरू झाली. ही नवी पद्धत वापरून शेती, विज्ञान, उद्योग अशा सर्व क्षेत्रात चीनने प्रगती केली.
९ सप्टेंबर १९७६ला माओ यांचे निधन झाले. माओचे कलेवर आजही बीजिंगमधल्या तियानमेन चौकात जपून ठेवण्यात आले आहे. हजारो चिनी व परदेशी पर्यटक तिथे दररोज गर्दी करतात. माओ त्यांच्या देशांतल्या शेतकऱ्यांचा मित्र व नेता असला तरी भारताशी मात्र, त्याने गद्दारीच केली. पंडित नेहरूंच्या बरोबर एका बाजूला 'हिंदी-चिनी भाई-भाई'च्या घोषणा करत त्याने व चाऊ-एन-लायने नेहरूंना गाफील ठेवून ॲाक्टोबर १९६२ ला भारतावर हल्ला करून मोठा भूभाग ताब्यात घेतला.
Courtesy: Social Media
माओने चीनमध्ये अनेक जगावेगळे प्रयोग केले. त्यातले अनेक यशस्वी झाले. तर काही फसलेसुद्धा. पण अपयशांची पर्वा न करता माओ प्रयोग करतच राहीले. एक वर्षभर जन्मदर शून्यावर आणण्याचा प्रयोग त्यांनी केला तसेच देशांतील सर्व बुद्धीजीवींना नोकऱ्या सोडून शेतावर राबण्यास त्यांनी भाग पाडले. 'स्वार्थ' हाच माओचा स्वभाव व राजकारण यांचा स्थायीभाव होता. चिनी राजकारणाचा आजही तोच गाभा आहे.